प्रा.सचिन पाटील बिनविरोध, प्रवीण कोल्हे, रेखा पाटील, हसीनाबी शेख यांचाही विजय
जळगाव - महानगरपालिका प्रभाग समिती सभापतिपद निवडीची प्रक्रिया आज सोमवार, दि.12 जुलै 2021 रोजी पीठासीन अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्री.अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. लोकशाही पद्धतीने झालेल्या या निवडणुकीत चारही प्रभाग समिती सभापतिपदांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. भाजपने प्रभाग समिती क्र.1 ची निवडणूक लढविली नाही. उर्वरित प्रभाग क्र.2, 3 व 4 च्या निवडणुकीत त्यांच्या उमेदवारांचा पराभव झाला. प्रभाग समिती क्र. 1 ची निवडणूक बिनविरोध झाली.
[ads id='ads1]
यावेळी महापालिका प्रशासनातर्फे अतिरिक्त आयुक्त श्रीमती विद्या गायकवाड, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त श्री.श्याम गोसावी, सहाय्यक आयुक्त श्री.आकाश डोईफोडे, आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री.पवन पाटील, नगरसचिव श्री.सुनील गोराणे उपस्थित होते. महापालिकेत गेल्या मार्चमध्ये सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेतर्फे प्रथमच लढविण्यात आलेल्या प्रभाग समिती सभापतिपदांसाठी आज लोकशाही पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पडली.
यात शिवसेनेतर्फे प्रभाग समिती क्र.1 मध्ये प्रा. सचिन भीमराव पाटील हे बिनविरोध निवडून आले, तर प्रभाग समिती क्र.2, 3 व 4 साठी निवडणूक झाली. यात प्रभाग समिती क्र.2 मध्ये शिवसेनेतर्फे श्री.प्रवीण रामदास कोल्हे व भाजपतर्फे श्री.मुकुंद भागवत सोनवणे यांच्यात निवडणूक होऊन श्री.प्रवीण कोल्हे यांना 13, तर श्री.मुकुंद सोनवणे यांना 7 मते मिळाली. प्रभाग क्र.3 मध्ये शिवसेनेतर्फे श्रीमती रेखा चुडामण पाटील व भाजपतर्फे श्री.धीरज मुरलीधर सोनवणे यांच्यात निवडणूक होऊन श्रीमती रेखा पाटील यांना 10, तर श्री.धीरज सोनवणे यांना 9 मते मिळाली. प्रभाग क्र.4 मध्ये शिवसेनेतर्फे हसीनाबी शरीफ शेख व भाजपतर्फे श्रीमती उषा संतोष पाटील यांच्यात निवडणूक होऊन हसीनाबी शेख यांना 10, तर श्रीमती उषा पाटील यांना 6 मते मिळाली.
[ads id='ads2]
त्यामुळे चारही प्रभाग समिती सभापतिपदांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून आल्याचे पीठासीन अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित राऊत यांनी जाहीर केले. प्रभाग क्र.3 साठी झालेल्या निवडणुकीत ‘एमआयएम’च्या उमेदवार सईदा युसूफ शेख यांचा अर्ज काही तांत्रिक कारणामुळे पीठासीन अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित राऊत यांनी अवैध ठरवला.
महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात राजकीय समीकरणे बदलली. त्यामुळे अडीच वर्षे सत्ता भोगलेल्या भाजपला संख्याबळाअभावी निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. तर शिवसेनेला भाजप बंडखोरांच्या मदतीने सुरूवातीला महापौरपद आणि आता चारही प्रभाग समिती सभापतिपदे मिळविता आली.
प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत चार जागांवर भाजपच्या बंडखोरांना उमेदवारी दिल्यामुळे ही निवडणूक जिंकणे शिवसेनेला सहज साध्य झाले. निवडणूक निकालानंतर महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन, उपमहापौर श्री.कुलभूषण पाटील व महापालिकेतील विरोधी पक्षनेते श्री.सुनिल महाजन यांच्यासह शिवसेना व भाजप बंडखोर नगरसेवकांनी नवनिर्वाचित प्रभाग समिती सभापतींचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तसेच महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी उपमहापौर श्री.कुलभूषण पाटील तसेच आपल्या सहकारी नगरसेवकांसमवेत महापालिका प्रवेशद्वारात फटाक्यांच्या आतषबाजीसह जल्लोष करीत नवनिर्वाचित प्रभाग समिती सभापतिपदे मिळाल्याचा आनंदोत्सव साजरा केला. तसेच महापौर व उपमहापौरांनी नवनिर्वाचित प्रभाग समिती सभापतींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.