मैत्री फाऊंडेशन नाशिक ने समाजाप्रती दाखविलेले दातृत्व प्रेरणादायी :..... तुषार प्रधान

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 शिंदी जि. प. प्रा. शाळेस दोन लॅपटॉप, एक कम्प्युटर, बाल वाचनालयास पुस्तके, कपाट भेट......

शिंदी, ता. भुसावळ (वार्ताहर)--- भुसावळ सह परिसरातील मूळ रहिवाशी तथा नाशिक स्थित मैत्री फाऊंडेशन ने समाजाप्रती आपण काही देणे लागतो या निस्वार्थ भावनेतून शिंदी जि. प. प्रा.शाळेस डिजिटल शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून दाखविलेले दातृत्व प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन भुसावळ पं.स.चे शिक्षण विस्तार अधिकारी तुषार प्रधान यांनी केले. शिंदी जि.प. शाळेत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते .यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भुसावळ कृ. उ. बा. स. संचालक तथा उपसरपंच कैलास पाटील हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ .नीता किरण जाधव व पोलीस पाटील अतुल पाटील हे उपस्थित होते.

नाशिक येथे भुसावळ सह परिसरातील मूळ रहिवासी असलेल्यांनी मैत्री फाउंडेशनची स्थापना केलेली असून त्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यात मागासलेल्या भागात गाव दत्तक घेऊन विविध उपक्रम त्याठिकाणी राबविले. पण गावाकडे सुद्धा आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून प्रेरित होऊन मैत्री फाऊंडेशन नाशिक च्या माध्यमातून येथील जि. प. प्राथमिक शाळेची निवड करून या ठिकाणी विद्यार्थ्यांना आधुनिक युगात डिजिटल शिक्षणाची ओळख व्हावी यासाठी दोन लॅपटॉप ,एक कम्प्युटर, बाल वाचनालयात सुमारे पाचशे पुस्तके, डिजिटल वर्गखोली लायब्ररी व साहित्य भेट देण्यात आले. फाउंडेशनच्या माध्यमातून एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या गरीब होतकरू विद्यार्थिनी मीरा मोरे (अकलूद) व गावातील कोमल पाटील या विद्यार्थिनींना पुस्तके भेट देण्यात आली.

हा उपक्रम मैत्री फाऊंडेशन ने महेश सोनार यांच्या माध्यमातून त्यांचे वडील स्व. आर के सोनार यांचे स्मरणार्थ घेण्यात आला . फाउंडेशन च्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागात राबवीत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली व गावाकडे सुद्धा असेच उपक्रम यापुढे राबविण्याची ग्वाही दिली. भुसावळ येथील ऑप्टिक कम्प्युटर चे संचालक दिनेश पाटील यांनी साऊंड सिस्टिम देण्याचे जाहीर केले.

बालवाचनालय ,डिजिटल संगणक कक्षाचे मान्यवरांसह फाऊंडेशन पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर वृक्षारोपण करण्यात आले. मैत्री फाऊंडेशन च्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार जि. प. शाळा व ग्रा.पं. यांच्यावतीने करण्यात आला .शैक्षणिक स्तर उंचवावा वेळोवेळी फाउंडेशन मदतीसाठी तयार आहे असे आवाहन फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी बोलताना व्यक्त केले असता प्राथमिक शाळेच्या वतीने उपक्रम शील शिक्षक व जि.प. आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक समाधान जाधव यांनी डिजिटल शैक्षणिक साहित्याचा पुरेपूर उपयोग विद्यार्थ्यांसाठी करण्याची ग्वाही दिली. डाएट प्रा. शैलेश पाटील यांनी कार्यक्रमादरम्यान मनोगत व्यक्त केले .ग्रामपंचायतीला भारताचे संविधान पुस्तक रूपाने भेट देण्यात आले. सरपंच सौ .नीता किरण जाधव यांनी त्याचा स्वीकार केला. जिल्हा स्तरावरील सर फाउंडेशन जळगाव यांच्या वतीने उत्तेजनार्थ उत्कृष्ट कार्यक्रम सादर केल्याबद्दल विद्यार्थिनींना प्रमाणपत्र व ट्रॉफीचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. विद्यार्थिनींनी यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

सरपंच सौ .नीता किरण जाधव, पोलीस पाटील अतुल पाटील, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष कांचन परदेशी, ग्रा.पं सदस्या माया कोल्हे ,कविता चौधरी ,शालेय व्यवस्थापन समिती सदस्या तृप्ती वीरेंद्र कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते सुनील पाटील ,बन्सीलाल पाटील, म. रा. शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष गिरीश एस नेमाडे, भुसावळ पूर्व विभाग माध्य. शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतपेढी मा.मानद चिटणीस विकास तळेले तसेच मैत्री फाऊंडेशनचे सचिव अनिल पाटील ,संस्थापक अध्यक्ष प्रशांत हेडाव, महेश सोनार (जपानी कंपनी व्हाईस प्रेसिडेंट), राजेश चोपडे, अनिल इंगळे ,दिनेश पाटील ,महेश राऊळ, विलास बार्हे, गणेश पाटील, सनी चव्हाण, सुधीर उगले उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन माध्य.क्रीडा शिक्षक व्ही एस पाटील यांनी केले .सूत्रसंचालन समाधान जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक भगवान बडगुजर उपशिक्षिका प्रीती फेगडे यांनी परिश्रम घेतले. यावेळी शिक्षणप्रेमी ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!