रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे) रावेर नगरपालिका हद्दवाढीनंतर येथील नगरपालिकेतर्फे शहरातील सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू झाले आहे. मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर हद्दवाढ झालेल्या भागातील मालमत्तांवर सध्या तरी कोणताही कर आकारण्यात येणार नसून जुन्या भागात केलेल्या करात कोणतीही वाढ होणार नसल्याने नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
[ads id='ads1]
पालिकेच्या कार्यक्षेत्राची दीड वर्षांपूर्वी हद्दवाढ झालेली आहे मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने इतर नियोजनाची व विकास कामे होऊ शकली नाही. कोरोनाचा प्रभाव संपुष्टात आल्याने पालिका प्रशासनाने शहराच्या विकासाच्या दृष्टीने नियोजित कामांना सुरूवात केली आहे.
मालमत्तांचे सर्वेक्षणास सुरूवात शहराची हद्दवाढ झाल्याने सुमारे 10 हजार लोकवस्तीच्या कॉलन्या व रहिवासी भागाचा पालिकेच्या कार्यक्षेत्रात समावेश झाला आहे. शासकीय नियमानुसार दर चार वर्षातून मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात येते मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने हे सर्वेक्षण गेल्या वर्षी करता आले नव्हते. गत जून महिन्यापासून शहरातील मालमत्तांच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. सर्वेक्षण होणार्या मालमत्तांना क्रमांक देण्यात येत आहे.
शहरातील सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यासाठी नागपूरच्या एका एजन्सीला ठेका देण्यात आला आहे. या एजन्सीचे 10 जणांचे पथक गेल्या महिनापासून सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण करीत आहे. यात रहिवासी घरे, बंद स्थितीतील घरे, व्यावसायीक मालमत्ता व इतर प्रयोजनासाठी वापरल्या जाणार्या मालमत्तांचा समावेश आहे. आतापर्यंत 13 हजार 517 मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले असल्याचे रावेर नगर पालिकेचे मुख्यधिकारी रवींद्र लांडे यांनी सांगितले.