जयभीम हे एक मात्र अभिवादन नसून तो बुध्द, कबीर, फुले यांच्या विचारांचा प्रभावशाली वारसा आहे.क्रांती सुर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुल्यांना डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी गुरू मानले होते.ते महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले ज्यांचा उल्लेख राजर्षी शाहूमहाराज महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग म्हणून करतात तर बडोद्याचे सयाजीराव गायकवाड त्यांना भारताचे बुकरटी वॉशिंग्टन म्हणून त्यांचा गौरव करतात.[ads id="ads2"]
माधवराव बागलांच्यामते ते महाराष्ट्रचे कार्ल मार्क्स होते तर न्या.रानडे त्यांना महाराष्ट्रचे सॉक्रेटिस म्हणतात तर धनंजय कीर यांच्या म्हणण्यानुसार ते भारतीय समाज क्रांतीचे जनक होते.महात्मा फुल्यांच्या चळवळीतून आपल्याला प्रेरणा मिळाल्याचे बाबासाहेबांनी कृतज्ञतापूर्वक मान्य केलेले आहे. [ads id="ads1"]
बाबासाहेबांप्रमाणेच अनेक महापुरुषांना ज्या वांड्मयातून मार्गदर्शन लाभले ते फुले वाडमय समाजक्रांतीची व्यापक परिवर्तनाची, परिभाषा सांगणारे वाड्मय आहे. हे साहीत्य महाराष्ट्राला आणि भारतीय समाजजीवनाला समतेची दिशा देणारे साहीत्य आहे.भारतीय समाजक्रांतीचे जनक महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या जीवन कार्यावर आणि त्यांच्या एकूणच समग्र वाङ्मयावर आजवर भरपूर लिखाण झालेले आहे आणि पुढेही होत राहील कारण दररोज ऊगवणार्या सूर्याचे प्रकाश किरण जसे नवे तेज देतात अगदी त्याचप्रमाणे महात्मा फुले यांचे विचार नवनवा प्रखर प्रकाश देत राहतात म्हणूनच महात्मा फुल्यांना "क्रांतीसुर्य"असे आदराने म्हटले जाते.
असपृश्यता निवारण व स्त्रीशुद्रमुक्ती चळवळ समर्थ पणे चालवणारे,यशस्वी उद्योजक व बागायतदार, इतिहासकार, साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ राजकीय विचारवंत नगरसेवक अशी ओळख असलेले आणि आपल्या प्रत्यक्ष कृती व लिखाणाद्वारे १९ व्या शतकाच्याउत्तरार्धात सामाजिक क्रांतीची भूमिका मांडणारे कृतिशील विचारवंत क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव गोविंदराव फुले यांचा २८ नोव्हेंबर हा स्मृतिदिन.मृत्यूपूर्वी काही काळ महात्मा फुले पक्षाघातासारख्या आजाराने ग्रस्त होते. त्यांचा उजवा हात काम करीत नसूनही 'सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक’ महात्मा फुले यांनी धैर्याने डाव्या हाताने लिहून पूर्ण केले.
त्यांच्या अनुयायांनी ते त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित केले. आपल्या मृत्यूनंतर आपल्या देहावर कोणत्या प्रकारे संस्कार व्हावेत याचा स्पष्ट उल्लेख महात्मा फुले यांनी त्यांच्या मृत्युपत्रात केला होता. त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना त्यांच्या मृतदेहाचे 'दफन ' करायचे होते; परंतु ही गोष्ट त्यांच्या नातलगांस अथवा सहकाऱ्यांस माहीत होती की नाही, हे कळावयास मार्ग नाही. शेवटी त्यांच्या मृतदेहाचे ‘दहन' करण्यात आले.डॉ. विश्राम रामजी घोले, रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे, डॉ संतु रामजी लाड, रामय्या व्यंकय्या अय्यावारू, पंडीत घोंडीराम नामदेव, भाऊराव कोंडाजी पाटील ही सुशिक्षित मंडळी त्यांना यापूर्वीच येऊन मिळाली होती. आणि महात्मा फुले यांचे कार्य सतत अखंडपणे चालू ठेवण्याची या सर्व मंडळीची फार मनिषा होती व त्या दिशेने त्या सर्वांचे प्रयत्न जारी होते.
आपले कार्य पुढे चालवावयास आपल्या पाठीमागे बरीच मंडळी आहे, हे पाहून म. फुले यांना समाधान वाटत असे. असो, सन १८९० च्या नोव्हेंबर महिन्याचा तिसरा आठवडा पुरा लोटला. इतक्यात एके दिवशी त्यांना फार थकवा वाटला आणि आपला अंतःसमय आता अगदी नजीक आला असे त्यांना समजले, तेव्हा लगेच त्यांनी पुण्या-मुंबईच्या आपल्या सर्व मंडळीस भेटीस बोलाविले त्याप्रमाणे सर्व प्रमुख मंडळी त्यांना भेटावयास आली. तेव्हा महात्मा फुल्यांनी स्वतःलिहून ठेवलेले मृत्युपत्र या मंडळीच्या हवाली केले. त्यांच्या या अंतःसमई मुंबईचे रामस्वामी अय्यावारू, रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे, पुण्याचे रावबहादूर डॉक्टर विश्राम रामजी घोले, पंडित घोंडीराम नामदेव ही मंडळी उपस्थित होती.
त्यांनी आपली पत्नी सावित्रीबाई व चिरंजीव यशवंतराव फुले यांना मंडळींच्या हवाली करून त्यांचा योग्य सांभाळ करण्याचे सांगितले आणि त्यानंतर त्यांनी मंडळीस आपला अखेरचा उपदेश करून ता. २७ माहे नोव्हेंबर १८९० रोजी गुरुवारी रात्रीचे बरोबर २ वाजून २० मिनिटांनी या आधुनिक भारताच्या एकमेव महात्म्याने इहलोकाचा त्याग केला क्रांतीसुर्य मावळला त्यावेळी महाराष्ट्रातील सारी सूज्ञ ब्राह्मण-ब्राह्मणेतर जनता हळहळली, महात्मा फुले यांचा अंत्यविधी केला त्याप्रसंगी यशवंतराव फुले यांनी जी ईश्वरप्रार्थना केली होती ती त्यावेळच्या दीनबंधु पत्रामधून प्रसिद्ध झाली होती. महात्मा फुले यांच्या निधनानंतर तारा केल्यामुळे मुंबई वगैरे ठिकाणची मंडळी आली होती.
महात्मा फुले यांच्या निधनाची बातमी कळली तेव्हा अनेक गोरगरीबांच्या व महारमांगाच्य दुःखाची टिपे पडली अबलांचा वाली, दीनदुबळ्यांचा कैवारी व पुणे नगरीचा हीरा आज गमावला गेल्यामुळे सार्या नगरीत उदासीनता पसरली होती. महात्मा फुले यांचे शत्रु व भिक्षुकशाहीचे पुरस्कर्ते ते देखील मनात य महात्म्याचे गुण आठवत होते. या महात्म्याच्या अंतरात्म्याबरोबर लगेच मागोमाग ता. २८ शुक्रवारी सकाळी ८ वाजता या महात्म्याच्या कायेनेही पुणे शहरास अंत्य दर्शन देऊन शेवटचा निरोप दिला. या पुण्यपुरुषाचे जीवन सर्व जातींकरिता सारखे खर्च झाले होते म्हणून त्यांच्या पवित्र कायेला सर्व जातीच्या लोकांनी खांदा दिला. स्मशानयात्रेला महारांगापासून ब्राह्मणांपर्यंत सर्व जातीचे नव्हे तर मुसलमान धर्माचे देखील लोक हजर होते. नियोजित स्थळी पोहोचल्यावर तेथे रा. कृष्णराव भालेकर, रा. बा डॉ. घोले, श्री. (सुबोध पत्रिकेचे संपादक ). रा. व. नारायणराव लोखंडे, जे. पी. रामम्या व्यंकप्पा अय्यावारू ग्यानोबा कृष्णाजी ससाणे, पंडित धोंडीराम व यशवंतराव फुले यांची या महात्म्याविषयी गुणगौरवपूर्ण भाषणे होऊन या पुण्यपुरुषाच्या पवित्र कायेचे सर्वांनी अखेरचे दर्शन घेतले व तेथेच दुपारचे बारा वाजता महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले अनंतात विलीन झाले असे म्हणतात कोणत्यही यशस्वी पुरूषामागे एका महीलेचा हात असतो,हे विधान महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांना देखील तंतोतंत लागू होते.उभ्या आयुष्यात या महात्म्याला जगाने अनेकवेळा दूर लोटले, पण जगातील एका जीवाने मात्र त्यांना प्रथमपासून तो त्यांच्या अखेरच्या घडीपर्यंत साथ दिली.
त्यांना सोसाव्या लागलेल्या अपमानाचा व हाल अपेष्टांचा काही भार आपल्या शिरावर घेऊन त्यांना वेळोवेळी सुखाचा, आनंदाचा, प्रीतीचा व औदार्याचा हात दिला ती व्यक्ती म्हणजेच त्यांची तपस्वी पत्नी सावित्रीमाई फुले होय.त्यांच्या जन्माची सोबतीण त्यांच्यासोबत होती. ती साध्वी होती, ती वीरपत्नी होती व ती सत्यवती होती ज्योतिरावांचे सारे तेज, त्यांचे सारे धेय्य त्यांचे सारे कर्तृत्व आणि त्यांचे सारे महात्म्य हे सावित्रीमाईंच्या तपामुळेच खरेखुरे चमकले महात्मा ज्योतिराव फुल्यांना या माऊलीने एका शब्दाने कधीही न दुखविता त्यांना प्रत्येक कामात परोपरीने मदत केली. ज्योतिरावांच्या संसाराचा सारा भार सावित्रीबाईंवर होता. अतिथीसत्कार,म.ज्योतिबांनी पाळलेल्या पोरक्या मुलांचा प्रतिपाळ, म. ज्योतिरावांनी दुष्काळात काढलेल्या अन्न छात्रालयातील कार्याचा भार त्यांच्या शेतातील मालाची देखरेख, त्यांनी काढलेल्या पुणे अनाथ विद्यार्थी वसतीगृहाची व्यवस्था इत्यादी त्यांच्या प्रत्येक कार्याची धुरा आपल्या पतीबरोबर त्या अखंडपणे वाहात होत्या.सावित्रीमाईला पोटी संतान नव्हते, पण त्याबद्दल त्यांना कधी दुःखाचा आव झाला नाही.
निराश्रित व पोरकी अर्भके हेच त्यांचे खरेखुरे संतान होते. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी पूर्वी काढलेल्या बालहत्या प्रतिबंधक गृहात जी काही पोरकी मुले आली होती त्यांत काशीबाई नामक ब्राह्मण विधवेच्या पोटी जन्मलेला यशवंत तेवढा वाचला होता. म.ज्योतिराव आणि सावित्रीमाई यांच्यासारख्या प्रेमळ व दयाळू हुतात्म्यांनी यशवंताला आपला पुत्र मानले होते. आता यशवंत कॉलेजमध्ये जाऊन डॉक्टरकीचा अभ्यास करीत होता.आपल्या जन्माच्या सोबत्याला पक्षघाताच्या आजाराने ग्रासले तेव्हापासूनच सावित्रीमाईला पुढे दुःखाचे काळे ढग दिसू लागले होते. तिने यशवंताच्या दोन हाताचे चार हात करण्याची गोष्ट महात्मा फुल्यांजवळ काढली व आपल्या धर्मपत्नीची साक्ष घेऊन त्यांनी यशवंताचा विचार घेतला आणि नंतर लगेच हडपसर येथील रावबहादूर ग्यानबा कृष्णाजी ससाणे यांची सुविद्य व सुशील कन्या लक्ष्मीबाई या कुलवधुबरोबर यशवंताचे लग्न उरकविले हा विवाह समारंभ ता. ४ फेब्रुवारी सन १८८९ रोजी सोमवारी सकाळी ९ वाजता मोठ्या आनंदाने पार पडला.
या लग्नसमारंभाची हकीकत ता. १० फेब्रुवारी १८८९ च्या दीनबंधूने सविस्तर दिली आहे. त्यात विशेष हे की, निष्फळ धर्मविधींना या समारंभात फाटा दिला होता व वधुवरांनी आपल्या जन्मातील कर्तव्यावर निबंध वाचून पंचांच्या सहानुभूतीचा त्यांनी आशिर्वाद मागितला व तसा तो पंचांनी त्यांना दिला, अशाप्रकारे महात्मा फुल्यांच्या आयुष्यातील हे पहिले आणि शेवटचे असे एकच एक राहिलेले कार्य त्यांच्या डोळ्यादेखत एकदाचे संपले.महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या मृत्युनंतर त्यांच्या
समकालीनांनी त्यांच्या जीवनकार्याचे मूल्यमापन केले होते."केसरी"व "सुधारक "या त्याकाळच्या विख्यात साप्ताहिकांनी ज्योतिरावांच्या मृत्युची दखलही घेतली नव्हती मुंबईच्या ईंदूप्रकाशने जोतीरावांच्या मृत्युनंतर काही आठवड्यांनी एक "स्फुटलेख" लिहिला."बडोदावत्सल" हे सत्यशोधक विचारसरणीचे साप्ताहिक होते. त्यातील तसेच ज्ञानोदयातील मृत्युलेखात जोतीरावांच्या कार्याचा गौरव केलेला आहे.ज्योतिरावांचे स्नेही बाबा पदमनजी यांनी जोतीराव फुले पक्षघाताने आजारी असतांना त्याची भेट घेतली होती. त्या भेटीची आठवण त्यांनी मृत्युलेखात सांगितली आहे.जन्मास येऊन महात्मा ज्योतिबा फुल्यांना जे कार्य करावयाचे होते ते त्यांनी केले होते.महात्मा फुले आज हयात नसले तरी हयातभर त्यांनी क्रांतिकारक विचारांची पेरणी केलेली असुन ते विचार मात्र कायम शाबुत असून ते चिरस्थायी आहेत.तेव्हा महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार जीवंत ठेवून त्यांनी सांगितलेल्या कल्याणकारी मार्गावर चालत राहणे ही आपली जबाबदारी आहे.
महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या पावन स्मृतीस कोटी कोटी वंदन... जयभीम जय ज्योति जय क्रांती.
संदर्भ:- महात्मा फुले समग्र वाङ्मय संपादक य.दि.फडके
भारतीय समाज क्रांतीचे जनक महात्मा फुले (प्रा.ना.ग.पवार/अविनाश वरोकर)
सावित्रीबाई फुले:अष्टपैलू व्यक्तिमत्त्व (प्रा.ना.ग.पवार)
महात्मा फुले लेखक :-पं.सि.पाटील
संकलन - राजेश वसंत रायमळे ९७६४७४२०७९