जयभीम हा मनुचा मुडदा गाडून मनुस्मृतीचा ईमला पाडून स्वातंत्र्य समता बंधूता आणि न्यायावर आधारित भीमस्मृती अर्थात जगद्विख्यात भारतीय संविधानाचा मान सन्मान अभिमान आहे समस्त महिला मुक्तीचा आणि भारतीय नारीच्या उत्थानाचा तोच खरा मार्ग आहे.या मार्गावर आरूढ नारी कधीही देवदासी होत नाही,मुरळी होत नाही.[ads id="ads1"]
तिला डाकीण अथवा हडळ सुध्दा कोणीच ठरवू शकत नाहीत. कारण हाच खरा ज्योति-सावित्रीचा वारसाआहे.बा भिमाने २५ डिसेंबर १९२७ ला रायगडाच्या पायथ्याशी स्री शूद्रांना नीच मानणारी मनुस्मृतीचे जाहीररीत्या दहन करून समस्त स्रीशुद्रांना मुक्त केले.खरे म्हणजे स्री मुक्तीच्या लढ्याची सुरुवात सावित्रीमाईंनीच केली.[ads id="ads2"]
दारिद्र्य अज्ञान आणि निच रूढी परंपराचा अंधकार नाहीसा करण्यासाठी आद्यसमाजक्रांतीकारक ज्योतिबा फुल्यांनी ज्ञानाचा दिवा लावला.या दिव्याने पहिल्या शाळेच्या रूपाने प्रकाशाचा पहिला किरण स्री-शुद्रांच्या जीवनात आणला.१९ व्या शतकाच्या दुसर्या दशकात स्त्री-जीवन खुप भयानक होते.
मराठी राज्य बुडालेले, शेवटच्या पेशव्याच्या आणि सरदारांच्या चंगीभंगी चाळ्यांनी स्त्रियांना समाजात वावरणेही अशक्य झालेले होते.मुलामुलींच्या पाळण्यातच लग्ने लावून देणारे आईबाप, लग्न म्हणजे काय हे कळायच्या आतच मुलीचा नवरा गेला तर जन्मभर काबाडकष्ट, अपमान सोसत एकत्र कुटुंबात या कोवळ्या वालविधवेने पिचत पडायचे. अशा स्थितीतच कुण्या पुरुष नातेवाईकाच्या वाकड्या नजरेची शिकार बनून गर्भ राहिला तर त्याचा सारा दोष पुन्हा या निष्पाप पोरीच्याच माथी मारायचा.
मग काळे तोंड लपविण्यासाठी त्या कोवळ्या पोरींना नदी-विहिरीत जीव देण्यापलीकडे दुसरा मार्गच नसे, हे हाल कमी म्हणूनच की काय, ब्राह्मण समाजात या अशा मुलींचे सुंदर केस कापून तिचे गोजिरवाणे रूप तिला सोवळी करून विद्रूप करून टाकीत पती मेल्यावर तिला सती जायला भाग पाडत.शूद्र-अतिशूद्रांची स्थितीही अशीच भयानक होती. आपली सावली ब्राह्मणांवर पडू नये म्हणून त्यांना अंग दुमडून चालावे लागे. थुंकीचा विटाळ सोवळ्या ब्राह्मणांना होऊ नये म्हणून गळ्यात मडके अडकवून फिरावे लागे. स्वतःच्या पावलांचे ठसे पुसून टाकण्यासाठी कमरेला झाडाची फांदी बांधून फिरावे लागे. अज्ञान व उपासमार तर पाचवीलाच पुजलेली,
इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही स्त्रियांचा आणि शूद्रातिशूद्रांचा कैवार घेणारे एक जोडपे पुढे आले. इ.स. १८२७ मध्ये महात्मा जोतीबा फुल्यांचा जन्म झाला उत्तम शिक्षण घेतल्यावर मिळणाऱ्या गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीवर लाथ मारून १ जानेवारी १८४८ रोजी मुलींसाठी आणि १५ मे १८४८ रोजी शूद्रांसाठी ज्योतिबांनी ज्ञानाचा दीप लावला.
२५ डिसेंबर हा मनुस्मृती दहन दिन म्हणून ओळखतात तसेच भारतीय महिला मुक्ती दिन म्हणूनही ओळखतात याला एका अर्थाने मानवतेचा दिन असे देखील म्हटले तर ते चूक ठरणार नाही कारण आजच्या दिवशी दोन महत्वाच्या गोष्टी घडल्या पहिली म्हणजे जगाला विश्वशांती आणि मानवतेचा संदेश देणारे ख्रिश्चन धर्मसंस्थापक येशू ख्रिस्त यांचा जन्म दिन आणि दुसरी म्हणजे तमाम भारतीय स्त्रियांना आणि ब्राम्हणेतरांना ब्राम्हणी गुलामगिरीतुन मुक्त करण्यासाठी मनुस्मृतीच दहन करुन बाबासाहेबांनी दिलेला मानवतेचा संदेश. मनुस्मृती विषयी सांगायचेच झाले तर याच मनुस्मृतीने शुद्र म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला महात्मा ज्योतिराव फुलेंचा अपमान करून ब्राह्मण मित्राच्या वरातीमधून हाकलून दिले.छत्रपती शाहूमहाराज वेदोक्त,पुराणोक्त प्रकरण याच मनुस्मृतीमुळे घडले.डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा पदोपदी अपमान याच मनुस्मृतीमुळे झाला.म्हणूनच दि.२५ डिसेंबर १९२७ रोजी भारतरत्न विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे सहकारी सहस्रबुध्दे' यांच्या हातुन विषमतावादी, जातीवादी, कर्मकांडवादी, वर्णवादी, व्यवस्थेला धरून चालणारी "मनुस्मृती"चे महाड येथे जाहीररीत्या दहन केले आणी बहूजनांना जातीवादी समाजरचनेतून मुक्त केले.
स्त्री आणि मनुस्मृती :-
मनुस्मृतीनुसार स्री ही पतिता आहे.(मनुस्मृती, द्वितीय अध्याय) "सहज शृंगार चेष्टेने मोहीत करून पुरूषांस दूषित करणे हा स्त्रियांचा स्वभावच आहे. यास्तव ज्ञानी पुरुष स्त्रियांविषयी कधी बेसावध रहात नाहीत श्लोक १३. देहधर्मामुळे कामक्रोधाच्या अधीन होणाऱ्या अविद्वान व विद्वान पुरुषासही स्त्रिया उन्मार्गी बनविण्यास समर्थ आहेत.श्लोक २१४".
(मनुस्मृती, अध्याय ९वा.) ह्या सुंदर रूप पहात नाहीत व यांचा यौवनादी वयाविषयीही आदर नसतो तर सुरूप किंवा कुरूप कसाही जरी असला तरी तो पुरुष आहे एवढ्याच कारणाने त्या त्यांचा भोग घेतात श्लोक १४. पुरुषास पाहताच संभोगाविषयी अभिलाषा उत्पन्न होणे त्यांचा स्वभावच असल्यामुळे, त्यांचे चित्त स्थिर नसल्यामुळे व स्वभावत:त्या स्नेहशून्य असल्यामुळे त्यांचे मोठ्या प्रयत्नाने जरी रक्षण केले तरी व्यभिचाराचा आश्रय करून त्या पतीच्या विरूद्ध जातात श्लोक १५ ,हा त्यांचा स्वभाव ईश्वरसृष्ट जगाच्या आरंभापासून सिद्ध होऊन राहिला आहे असे जाणून पुरुषाने त्यांच्या संरक्षणाकरिता फार मोठा प्रयत्न करावा श्लोक १६. (पुष्कळ झोप), आसन (बसून (राहणे), अलंकार (घालणे)काम,क्रोध, सरळपणा नसणे, परहिंसा व निंद्य आचारी मनुने सृष्टीच्या आरंभी स्रीयांस दिली आहेत श्लोक१७.स्रीयांच्या जातकर्मादी क्रिया मंत्राच्या योगाने करू नये अशी शास्त्राची मर्यादा आहे. श्रुती व समृती ही धर्माची प्रमाणे असून त्यांचा स्रियांस अधिकार नसल्यामुळे त्या धर्मज्ञ नसतात पापांचा नाश करणारा जो मंत्रांचा जप तो त्यास करिता येत नसल्यामुळे पाप झाले तरी त्यास घालविण्यास त्या असमर्थ व असत्याप्रमाणे अशुभ असतात अशी शास्त्रीय स्थिती आहे. (यास्तव त्यांचे प्रयत्नाने रक्षण करावे) श्लोक१८. (व्यभिचार शीलत्व हा स्त्रीयांना स्वभावच आहे या म्हणण्यास श्रृती प्रमाण देतात) तशाप्रकारच्या अनेक श्रुती वेदांमध्ये आढळतात. (म्हणजे स्रियांच्या व्यभिचारशीलत्वाचे ज्ञान व्हावे म्हणून वेदांमध्ये अनेक श्रुतिवाक्ये पठित आहेत.)
(मनुस्मृतीअध्याय ५ वा.)
"बाल्यावस्थेतील मुलीने, तरुण स्रीने किंवा वृध्द बाईनेही गृहातील एकादे लहानसे कार्यही स्वतंत्रपणे करू नये श्लोक१४७. बाल्यावस्थेत पित्याच्या अधीन होऊन रहावे तरूणपणी पतीच्या आज्ञेत असावे व पती मरण पावल्यावर पुत्राच्या संमतीने चालावे; पण स्रीने कधीही स्वतंत्र होऊ नये श्लोक १४८
२५डिसेंबर १९२७ रोजी प्रतीकात्मक पद्धतीने डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले. महाडच्या चवदार तळ्याचा खुला वापर आणि काळाराम मंदिर प्रवेशाचा संदर्भ यामागे होता.तसेच एकाच वेळी जातिभेद आणि स्त्रीदास्य या दोहोंच्या अंतासाठी संघर्ष करण्याचा निर्धार होता.त्यातूनच स्वातंत्र्य, समता, बंधूता आणि न्यायावर आधारित समाज रचना तयार होईल हे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जाणून होते. त्या वेळी भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, ‘ज्ञान ही पुरुषांची किंवा कोण्या एका जातीची मक्तेदारी नाही. सर्व जातीतील स्त्री-पुरुषांना ते उपलब्ध असायला हवे...’ स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरही समतेच्या आंदोलनाला यातून पाठबळ मिळाले आहे
खरीखुरी विद्देची देवता सावित्रीमाई फुले यांनी शेणमाती,दगडधोंड्यांचा मारा सहन करून महीलांना शिक्षित केले,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत तरतूद करून महीलांना शिक्षणाचा मार्ग मोकळा करून दिला.परिणामी आज भारतात असे कुठलेच पद नाही जे महिलेने भुषवलेले नाही. म्हणूनच महात्मा ज्योतिराव फुले,सावित्रीमाई फुले आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हेच स्री आणि शुद्रांचे खरे मुक्तीदाते आणि उद्धारक आहेत.आणि त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच भारत देशात ज्या ज्या महिला राष्ट्रपती झाल्या,प्रधान मंत्री झाल्या,हाय कोर्ट, सुप्रीम कोर्ट लोअर कोर्टात न्यायाधीश झाल्या वकील, बॅरीस्टर, अर्थ तज्ञ,यशस्वी उद्योजक,आमदार खासदार,मंत्री ,अर्थमंत्री,मुख्यमंत्री,राज्यपाल,कुलगुरू,प्राचार्य,प्राध्यापक,अध्यापक,मुख्याध्यापक, मॅनेजर, चेअरमन, लोकसभा राज्यसभा विधानसभा,स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती झाल्या,डाॅक्टर,इंजिनिअर,संस्थेच्या संस्थापक,संचालक, प्रकाशक,संपादक, पत्रकार,लेखिका झाल्या, आयएएस,आयआरएस,आयपीएस कलेक्टर तहसिलदार झाल्या,एसपी,डीएसपी,डीवायएसपी,पीआय झाल्या,पायलेट लोकोपायलेट झाल्या,नेता झाल्या,गायिका,नायिका झाल्या,पद्मश्री घेऊन सुध्दा खलनायिका झाल्या,ड्रायव्हर,कंडक्टर झाल्या,विविध कार्यालयांमधून अधिकारी कर्मचारी झाल्या,विरमरण पत्कारलेल्या अंतराळवीरही झाल्या,संविधानाच्याच तरतुदीसार ग्रामपातळीवर पन्नास टक्के समांतर आरक्षण घेवून गावाचा कारभार सांभाळणाऱ्या सरपंच मेंबर झाल्या,आंगणवाडीच्या सेविका, मदतनिस, आशावर्कर झाल्या आणि पोलिस पाटीलही झाल्या.....!!! झाल्या आणि आपल्य मुक्ती दात्यांना ऊध्दारकर्त्यांनाच विसरून गेल्या (अर्थात याला काही माताभगीणी अपवाद देखील आहेत,ज्या आपल्या ऊध्दारकर्त्यांना अद्याप विसरलेल्या नाहीत. )आणि पुन्हा त्याच निच,खुळचट रूढी परंपरांमध्ये गुरफटून त्याच रूढी परंपरांना कवटाळू लागल्या त्या सर्व यशस्वी माता भगिनींना महिला मुक्ती दिनाच्या हार्दिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा.....जयभीम. जय ज्योति जय क्रांती....!
संदर्भ:- १) सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक प्रकाशकीय प्रकाशक प्रदीप गायकवाड.
२) सावित्रीबाई जोतीबा फुले जीवन कार्य
शांता रानडे.
लेखक:-अॅड.राजेश वसंत रायमळे (एम.ए.एल. एल. बी.)
भ्रमण ध्वनी:-९७६४७४२०७९