धरणगाव प्रतिनिधी - पी.डी.पाटील सर
धरणगाव येथील समस्त कुणबी पाटील समाजाच्या वतीने आयोजित जगद्गुरू तुकाराम महाराज बिजनिमित पालखी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.[ads id="ads1"]
याबाबत अधिक माहिती अशी की, लहान माळी वाडा परीसरातील समस्त कुणबी पाटील समाजाच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी देखील अखंड हरिनाम किर्तन सप्ताह साजरा झाला. सप्ताहाची समाप्ती झाल्यानंतर सायंकाळी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पालखीत विठू माऊली - आई रखुमाई यांच्या मूर्ती तसेच जगद्गुरू तुकाराम महाराज यांची प्रतिमा होती. पालखीच्या समोर गावातील व परिसरातील असंख्य युवक तसेच भाविकांनी सवाद्य लेझीम पथकातून सहभाग नोंदवला.[ads id="ads2"]
लेझीम च्या माध्यमातून विविध प्रकारचे लेझीम प्रकार शिस्तबद्ध रीतीने खेळून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यामध्ये युवकांचा उत्साह, शिस्त, आनंद अवर्णनीय होता. यासोबतच महिला भगिनींची देखील लक्षणीय उपस्थिती पहायला मिळाली. महिला व युवतींनी फुगड्या खेळून तसेच ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष करून पालखी सोहळ्याची शोभा वाढवली. जेष्ठ मंडळी, पंच मंडळातील सदस्य, युवक तसेच परिसरातील सर्व समाज बांधवांनी हातात टाळ घेऊन भक्तिमय वातावरण निर्माण केले. "ज्ञानोबा माऊली तुकाराम, तुकाराम - तुकाराम - तुकाराम - तुकाराम" अशा नामस्मरणाने परिसरात मांगल्य व चैतन्य निर्माण झाले. लहान माळी वाडा परिसरात पालखी मिरवणूक काढण्यात आली.
तद्नंतर सिद्धि हनुमान मंदिरात पालखी मिरवणुकीचा समारोप झाला. परतीच्या प्रवासात समस्त पाटील समाज मढी मध्ये येऊन पांडुरंग - ज्ञानोबा - तुकोबांच्या आरतीने तसेच जयघोषाने परिसर दणाणून निघाला. पालखी सोहळ्यात लहान माळी वाडा परिसरातील समाज बांधव, महिला भगिनी, युवक - युवती तसेच बालगोपालांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे आयोजन समस्त पाटील समाज पंच मंडळ धरणगाव यांच्या वतीने करण्यात आले होते.