आदिवासी विकास विभाग नाशिक पुन्हा चर्चेत ; लाचखोर अभियंता एसीबीच्या जाळ्यात; २९ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

अनामित

नाशिक : काही महिन्यांपूर्वीच जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाच्या भरतीप्रक्रियेत घोटाळा झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. जुलै २०१४ ते एप्रिल २०१६ या काळात राबवण्यात आलेल्या भरतीप्रक्रियेत घोळ झाल्याची माहिती पुढे आली होती. आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तब्बल ५८४ पदांसाठी झालेल्या या नोकरभरतीत सुमारे ३०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा केला जातो आहे. या विभागात भ्रष्टाचाराची छोटी-मोठी प्रकरणे सातत्याने पुढे येत असताना आता बड्या अधिकाऱ्यावर लाचखोरीची मोठी कारवाई झाल्याने हा विभाग पुन्हा चर्चेत आला आहे आदिवासी विकास विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला त्याच्याच निवासस्थानात तब्बल २८ लाख ८० हजार रुपयांची लाच स्वीकारताना गुरुवारी पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दुपारी चारच्या सुमारास ही कारवाई केली गैरप्रकारांमुळे नेहमीच चर्चेत राहणारा आदिवासी विकास विभागातील भ्रष्टाचार या प्रकरणामुळे चव्हाट्यावर आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर अधीक्षक नारायण न्याहाळदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेशकुमार बुधा बागूल (वय वर्षे ५०) असे अटक केलेल्या अभियंत्याचे नाव आहे. आर. के. इन्फ्रा कॉन्स्ट्रो प्रायव्हेट लिमिटेड या फर्ममध्ये कार्यरत एका ३९ वर्षीय तक्रारदाराने या प्रकरणी तक्रार दिली आहे. या फर्मला हरसूल येथील मुले आणि मुलींच्या वसतिगृहात सेंट्रल किचनचे काम देण्यात आले होते. याकरिता राबविण्यात आलेल्या निविदाप्रक्रियेतून त्यांची निविदा मंजूर झाली होती. संबंधित फर्मला २ कोटी ४० लाख रुपयांचे कंत्राट मिळाले होते. या सेंट्रल किचनचे बांधकाम सुरू करावयाचे असल्याने त्यांना कार्यारंभ आदेश हवा होता. हा आदेश मिळावा यासाठी तक्रारदार अभियंता बागूल यांच्याकडे पाठपुरावा करीत होते. ते १९ ऑगस्ट रोजी बागूल यांना भेटण्यासाठी गेले. कार्यारंभ आदेश मिळावा अशी विनंती केली. मात्र, निविदेत मंजूर रकमेच्या १२ टक्के म्हणजेच २८ लाख ८० हजार रुपये रकमेची मागणी बागूल यांनी तक्रारदाराकडे केली. याबाबत कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती दिली. तक्रारीची शहानिशा करून कारवाईसाठी पथक नेमण्यात आले. त्यानुसार गुरुवारी बागूल राहत असलेल्या तिडके कॉलनीतील निवासस्थानामध्ये दुपारी सापळा रचण्यात आला. संबंधितांकडून २८ लाख ८० हजारांची रक्कम स्वीकारताना बागूल याला पथकाने ताब्यात घेतले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सुनील कडासने, अप्पर अधीक्षक नारायण न्याहाळदे, उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अनिल बागूल, पोलिस कर्मचारी किरण अहिरराव, अजय गरूड, नितीन कराड, संतोष गांगुर्डे यांनी ही कारवाई केली. पथकाकडून बागूल यांच्या निवासस्थानाची झडती घेतली जाणार असून, मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. आदिवासी विकास विभागाकडून करण्यात येणाऱ्या कामांच्या मोबदल्यात अधिकारी मोठ्या प्रमाणात टक्केवारी घेत असतात. टक्केवारी शिवाय तेथे कोणतेही काम होत नाही. प्रत्येक कामाची टक्केवारी ठरलेली आहे. यामुळे काम कोणालाही मिळाले तरी टक्केवारीतून सुटका नाही, असे चित्र आहे. हा सापळा यशस्वी झाल्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आदिवासी विकास विभागातील टक्केवारीची साफसफाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!