यावल (सुरेश पाटील) यावल तहसील कार्यालयाच्या अभिलेख कक्षातून मागणी केलेला महत्वाचा नाहरकत दाखला आढळून आला नाही. तसेच दुसऱ्या एका प्रकरणात सुद्धा अभिलेख कक्षाची फेर तपासणी केली असता आपण मागणी केलेली माहिती आढळून आली नाही असे यावल तहसील कार्यालयातील शासकीय जन माहिती अधिकारी तथा निवासी नायब तहसीलदार एस.पी.विनंते यांनी तब्बल 5 महिने विलंब लावून लेखी उत्तर दि.6फेब्रुवारी 2023 रोजी दिले.
यामुळे अभिलेख कक्षातील इतर काही अनेक महत्त्वाची कागदपत्रे, दाखले,काही प्रकरणे, जन्म-मृत्यूच्या नोंदी,सातबारा उतारे,'ड' पत्रक सुद्धा आढळून येत नसल्याचे तथा गहाळ झाल्याचे संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे, यामुळे कर्तव्यदक्ष असे फैजपूर उपविभागीय तथा प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी यावल अभिलेख कक्षातील महत्त्वाचे जपून ठेवलेले रेकॉर्डच्या सविस्तर चौकशीसाठी आणि कार्यवाहीसाठी शासकीय स्तरावर समिती नियुक्त करून यावल अभिलेख कक्षाची तपासणी करून किती महत्त्वाचे प्रकरणे,दाखले,नाहरकत दाखले जन्म-मृत्यूच्या नोंदी आढळून येत नाही याची चौकशी व कार्यवाही करून आता पर्यंतच्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास जळगाव जिल्हा अध्यक्ष तथा पत्रकार सुरेश जगन्नाथ पाटील यांनी केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की शासकीय जन माहिती अधिकारी तथा निवासी नायब तहसीलदार यावल एस.पी.विनंते यांनी दि. 6/2/2023 रोजी संदर्भ क्र.1. मध्ये दि. 23/8/22 चा अर्ज प्राप्त.तसेच संदर्भ क्र.2 प्रथम अपिलिय अधिकारी यांच्या आदेशाचा संदर्भ देत म्हटले आहे की,आपण यावल तहसील कार्यालयातून दि.29/ 8/2008 रोजी ( तत्कालीन तहसीलदार राहुल मुंडके यांनी स्वाक्षरी केलेला )नाहरकत दाखला दिला आहे. त्या दाखल्याची छायांकित प्रत तसेच नाहरकत दाखल्यात नमूद असलेले वाचले 1 ते 6 या संपूर्ण कागदपत्रासह प्रकरणाच्या छायांकित प्रति माहिती मिळण्याबाबत विनंती केली आहे.
प्रस्तुत प्रकरणी उपरोक्त संदर्भ क्र.2 नुसार प्रथम अपिलीय अधिकारी तथा तहसीलदार यावल यांच्याकडील आदेशाप्रमाणे या कार्यालयाच्या अभिलेख कक्षाची फेर तपासणी केली असता आपण मागणी केलेली माहिती आढळून आली नाही. सबब आपणास मागणी केलेली माहिती उपलब्ध करून देता येत नाही.
तसेच आपणास याविरुद्ध द्वितीय अपील करावयाचे झाल्यास राज्य माहिती आयुक्त नाशिक खंडपीठ यांच्याकडे द्वितीय अपील दाखल करावे असा सल्ला सुद्धा दिला आहे.
असे लेखी उत्तर शासकीय जन माहिती अधिकारी तथा निवासी नायब तहसीलदार यावल एस.पी.विनंते यांनी दिल्याने माहितीचा अधिकार कायदा सन 2005 मधील कलम,तरतूदीनुसार उल्लंघन केल्याने तसेच मागितलेली माहिती आढळून आली नाही असे उत्तर दिल्याने ती माहिती अभिलेख कक्षातून कुठे गेली? आणि कोणी गहाळ केली? कोणाच्या पंटर,दलालाने 'तो' नाहरकत दाखला आणि प्रकरण चोरून त्याची विल्हेवाट लावली? आढळून येत नसल्याची नोंद शासन दप्तरी केव्हा नोंद झाली?यासह अभिलेख कक्षातून किती प्रकरणे आणि महत्त्वाचे दाखले,कागदपत्रे गहाळ झाले?आढळून येत नाही याची सखोल सविस्तर चौकशी करून पुढील कार्यवाही करण्यासाठी समिती नियुक्त करून कारवाई करावी अशी मागणी सुरेश जगन्नाथ पाटील पत्रकार यांनी केली आहे.
--------------------------------------
अभिलेख कक्षाचा कारभार शिपाई आणि कोतवालाकडे देणारा अधिकारी कोण...?
यावल तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षाचा कार्यभार, पदभार हा जबाबदार माहितगार लिपिक,कारकुन यांच्याकडे न देता शिपाई आणि कोतवालास त्या ठिकाणी नियुक्त करण्याचा आदेश कोणी व कोणत्या अधिकाऱ्यांने व कोणाच्या आदेशान्वये आणि का दिला? हा कायद्याचा व संशोधनाचा विषय ठरला असला तरी यावल तहसीलदार महेश पवार व निवासी नायब तहसीलदार एस.पी.विनंते यांच्या खास सोयीनुसार कामे होण्यासाठी अभिलेख कक्षात शिपाई आणि कोतवालाची नियुक्ती करण्यात आली असल्याचे संपूर्ण यावल तालुक्यासह महसूल क्षेत्रात बोलले जात आहे.याकडे सुद्धा प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी लक्ष केंद्रित करून तात्काळ जबाबदार शासकीय कर्मचाऱ्यांची अभिलेख कक्षात नियुक्ती करावी.