साकळी मंडळ अधिकारी, तलाठी यांची बेधडक कारवाई
यावल ( सुरेश पाटील ) बांधकाम उद्योग १२ महिने सुरू राहत असल्यामुळे वाळूला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे वाळू कोण कुठून आणि कशी कोणत्या पद्धतीने आणि कोणत्या वाहनातून वाहतूक करेल हे आज सांगणे,अंदाज लावणे कठीण झाले आहे आणि महसूल विभागासमोर एक मोठे आव्हान निर्माण झाले आहे.याच आव्हानातून आज गुरुवार दि ४ एप्रिल २०२४ चे मध्यरात्री नंदुरबार कडून भुसावळ कडे जाणारा साडेसहा ब्रास अवैध वाळू वाहतुकीचा ट्राला किनगाव जवळ साकळी मंडळ अधिकारी व तलाठी यांनी पकडून यावल तहसील कार्यालयात जमा केला.[ads id="ads1"]
याबाबतची सविस्तर माहिती अशी की रात्री १२ ते १२:३० वाजेच्या सुमारास यावल तालुक्यात अंकलेश्वर बऱ्हाणपूर या राष्ट्रीय महामार्गावर किनगाव जवळ नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील खनीकर्म शाखा यांनी नंदुरबार येथून भुसावळ येथे वाळू वाहतुकीचा दिलेला परवाना साकळी मंडळ अधिकारी यांनी प्रत्यक्ष बघितला असता परवान्याची छायांकित प्रत दिसून आली या वाळू वाहतूक परवान्याची मुदत वेळ मात्र काल बुधवार दि. 3 एप्रिल २०२४ संध्याकाळी १९:३० वाजेपर्यंत होती आणि आहे,ट्राला क्रमांक MH 15 MM 6060 मध्ये साडेसहा ब्रास वाळू असल्याने तसेच परवान्याची छायांकित प्रत व वेळेचा संशय या कारणावरून सदरचा ट्रॉला यावल तहसील कार्यालयात जमा करण्यात आला ही कारवाई तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली साकळी मंडळ अधिकारी जगताप व त्यांचे सहकारी तलाठी व महसूल कर्मचारी यांनी केली.[ads id="ads2"]
अवैध वाळू वाहतूकदारांनी नवीन पॅटर्न सुरू केला -वाळू वाहतुकीत आतापर्यंत साधारणपणे डंपर ट्रॅक्टर इत्यादी वाहनांचा वापर केला जात होता परंतु महसूल आणि पोलीस विभागाची दिशाभूल करण्यासाठी आणि अवैध वाहतुकीकडे दुर्लक्ष होण्यासाठी अवैध वाळू वाहतूकदारांनी आता छोटा हत्ती, बोलेरो या वाहनात व इतर काही वाहनांमध्ये बदल करून त्यातून वाळू वाहतुकीचा गोरख धंदा सुरू केला याकडे महसूल आणि पोलीस विभागाने आपले लक्ष केंद्रित करून अशा अवैध वाळू वाहतूक वाहनधारक मालक चालक यांच्यावर कडक कारवाई करावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.
अवैध वाळू वाहतुकीच्या या नवीन पॅटर्न आणि उद्योगात काही ठराविक तीन-चार तलाठी कर्मचाऱ्यांची भागीदारी असल्याचे सुद्धा बोलले जात असून काही जबाबदार अधिकारी,कर्मचारी यावल तहसीलदार यांची शुद्ध दिशाभूल करून आपला आर्थिक हेतू साध्य करून घेत असल्याचे सुद्धा अवैध वाळू वाहतूकदारांमध्ये बोलले जात आहे.
ज्या काही वाळू वाहतूकदारांकडे परवाना असतो त्या वाहन चालकाकडे वाळू वाहतुकीच्या परवान्याची छायांकित प्रत असते मूळ प्रत त्यांच्याकडे का नसते. परवान्याला वेळेचे बंधन असताना एका परवान्यावर दिवसातून किती वेळा आणि किती ब्रास वाळू वाहतूक केली जाते आणि वाहन कोणते असते याची खात्री सुद्धा महसूल विभागाने केल्यास मोठा घोळ उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही.



