जयभीम म्हणजे अभिवादन नसून ते समस्त भारतीयांच्या स्वातंत्र्याची पहाट आहे- होय नुसत्याच अस्पृश्य, आदिवासी शुद्रातीशुद्र, महिला- पुरुषांच्याच नव्हे तर संपूर्ण भारतीय बौद्ध, मुस्लिम, हिंदू, ख्रिश्चन, शिख, जीव, जैन, पारशी, येहुदी, लिंगायत,आदी सर्व तसेच डोंगर,पहाड नदी-तलाव, दगड- धोंडे झाडे झुडपे पशु पक्षी जीव- जंतूआदी सर्वांचेच पूर्ण स्वातंत्र्य म्हणजे जयभीम होय . डॉ . बाबासाहेब आबेडकर नसते तर गांधीजीनी करेंगे या मरेंगे" या नाऱ्यासोबत बालीशपणे चालविलेल्या क्वीट इंडिया मुव्हमेन्टच्या आधारावर भारताला स्वातंत्र्य मिळणे कदापी शक्य नव्हते. दूसरे असे. की,२४ सप्टेंबर १९३२ ला डॉ.बाबासाहेबआंबेडकरांनी पुणे करारावर जर सही केलीच नसती तर गांधीजींना स्वातंत्र्याचा सुर्य कधीच पाहता आला नसता . म्हणून भारतीय स्वातंत्र्याचे पाहिले मानकरी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच ठरतात .पण असे म्हणतात ना, कि,राजाचा आदर केवळ आपल्याच देशात होतो,मात्र बुद्धी मानाची पूजा सर्वत्र होते . मात्र विविधतेने नटलेला आपला जातिप्रधान भारत देश याला अपवाद आहे . येथे बुद्धीमानाचाआदर तर होतोच पण एका अटीवर, तो बुद्धिमान तर असावा पण अस्पृश्य अथवा शुद्रातीशुद्र , भटक्या विमुक्त आदिवासी जाती जमातीचा नसावा . पण दुर्दैवाची गोष्ट हीच कि, या जातिप्रधान भारत देशाची जनसंख्या अधिकांश आदिवासी, शुद्र आणि अस्पृश्यच आहे.
असो पण इथे आपण प्रामुख्याने चर्चा करणार आहोत ती महामानव बाबासाहेब डॉ. भीमराव रामजी आंबेडकर हेच भारतीय स्वातंत्र्याचे पहिले मानकरी आहेत या विषयावर
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे पूर्ण स्वराज्यवादी होते आणि स्वातंत्र्य लढयाला देखील त्यांचे पूर्ण समर्थन असे स्वातंत्र्यासाठी अनेकवेळा त्यांनी ब्रिटिश सरकारचा खरपुस समाचार घेतला , एवढे असूनही महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य लढयात भाग घेतला नाही स्वार्थासाठी त्यांनी इंग्रजांना सहकार्य केले . ते ब्रिटिश धार्जिणे होते . असे दुषणं लावून त्यांना देशद्रोही ठरविणे म्हणजेच सुर्यावर थुंकण्यासारखाच प्रकार म्हणावा लागेल अरुण शौरी नामक पंजाबचा ब्राम्हण याने " वर्शिपिंग फॉल्स गॉड" नावाचा बदनामीकारक ग्रंथ लिहुन असाच एक सुर्यावर थुंकण्याचा केविलवाणा प्रयोग करून स्वतःची थुंकी स्वतःच्याच तोंडावर उडवून घेतली याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचच एक ह्रदयस्पर्शी वाक्य आठवते ते म्हणतात की, मी जर मनावर घेतले असते तर पाच वर्षांच्या आत या देशाचं वाटोळं केलं असतं परंतु या देशाच्या ईतिहासात मला माझ्या . नावाची विध्वंसक म्हणून नोंद करून घ्यावयाची नाही . स्वातंत्र्य पूर्व भारताची परिस्थिती पाहता भारतातील अस्पृश्यांवर दुहेरी गुलामगिरी होती , एक इंग्रजांची तर दुसरी सवर्ण हिंदूची इंग्रजांची गुलामगिरी ही दीडशे वर्षांपासूनची होती, तर सवर्ण हिंदूची गुलामगिरी ही हजारो वर्षांपासूनची होती . डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्याच शब्दांत सांगायचे झाले तर ज्याप्रमाणे कोणात्याही एका राष्ट्राला दुस-या राष्ट्रावर राज्य करण्याचा अधिकार नाही, त्याप्रमाणेच कोणत्याही एका विशिष्ट वर्गाला दुसऱ्या वर्गावर अधिपत्य गाजविण्याचा अधिकार नाही . सामाजिक गुलामगिरी ही राजकीय स्वातंत्र्याला मारक ठरते . तेव्हा जोपर्यंत सामाजिक गुलामगिरी नष्ट होत नाही तोपर्यंत राजकीय स्वातंत्र्याला काहीच अर्थ उरत नाही . डॉ . बाबासाहेब आंबेडकर म्हणतात या देशाने अनेक वेळा स्वातंत्र्य गमाविले आहे . हा देश राष्ट्र म्हणून कधीच जगला नाही . जर एखाद्या इमारतीचा पाया मजबूत नसेल तर ती इमारत केव्हा कोलमडून पडेल याचा भरवसा नाही या मताचे होते महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकर आणि म्हणूनच त्यांना आधि भारत देशाचा पाया मजबूत करावयाचा होता जेणेकरून पुन्हा या देशाला स्वातंत्र्यगमाविण्याची वेळ येऊ नये . डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला नाही परंतू ऐन युद्धाचे वेळी समयसुचकता दाखवून लष्कर आणि हुकूमशहां पासून या देशाचे रक्षण केले . म्हणूनच भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले . अन्यथा हा देश लष्कर व हुकुमशहांच्या घशात जाऊन पुन्हा या देशाला दिडशे वर्षे लढा द्यावा लागला असता . आणि भारताला लोकशाहीची फळे चाखताच आली नसती, अरुण शौरी सारख्या शुद्र बुद्धिच्या माणसाला महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुरदृष्टीचा अंदाजा येणेच अशक्यप्राय गोष्ट आहे .
मध्यकालीन युग म्हणजे इसवीसना नंतर लिहीलेली मनुस्मृती ही त्याकाळची भारताची राज्यघटनाच होती . ती अस्पृश्य आदिवासी, बहुजनसमाज व स्त्रीयांकरिता अन्यायकारक होती. ब्राम्हण निर्मित वर्णाश्रम व जाती व्यवस्थेमुळे एकसुत्रीपणा नष्ट झाला व राष्ट्र एकसंध राहीले नव्हते . डॉ . बाबासाहेब आंबेडकर म्हणतात "हिंदू समाजाची शक्ती जातीभेदामुळे व अस्पृश्यतेमुळे क्षय पावली होती व त्यामुळेच परकीयांची अनेक आक्रमणे झाली.
सामाजिकदृष्ट्या भारत आणि परदेशात खुप तफावत पाहायला मिळते. परदेशात एक दोन जाती असतात त्यामुळे तेथे प्रथम राजकीय स्वातंत्र्य व नंतर सामाजिक स्वातंत्र्य असू शकते परंतू भारतात वर्ण व्यवस्थेवर आधारित हजारो जाती उपजाती कालबाहाय परंपरा आणि अंधश्रद्धा आहेत . त्यामुळे अस्पृश्य आदिवासी व बहुजनसमाज शिक्षणापासून वंचित राहिल्यामुळे त्यांचेमध्ये अज्ञानपणा आला व त्यामुळेच ते मुख्य प्रवाहापासून आलिप्त राहीले . आणि द्रारिद्रय, लाचारीने त्यांना पछाडलेले असून ते पशुतुल्य जीवन जगत आहेत . अशा परिस्थितित ते कसे देशकार्य करु शकतील मग परकीय राज्य आले काय? नी गेले काय? याच्याशी त्यांचे काहीएक सोयर सुतक नसते . त्यांना दोन वेळच्या भाकरी मिळाल्या की पुरे .
वेद प्रामाण्यवादी भटाब्राम्हणांच्या. आदेशाप्रमाणे जाती ह्या ईश्वर निर्मित असून . ते पूर्वजन्मीचे पाप आहे. जातीयतेमुळे हिंदूंमध्ये सहजीवन व संघटन अशक्य आहे व त्यामुळे राष्ट्रीय भावना मरुन गेलेली होती,त्यामुळे टिळकांनी सुरु केलेल्या स्वातंत्र्य लढ्याला प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून त्यांना गणेश उत्सवाच्या नावाखाली धार्मिक भावनेतून लोकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करावा लागल .गांधीजींनी सुद्धा १९२० मध्ये इंग्रजांविरुध्द आंदोलन करायचा प्रयत्न केला परंतु त्यांनाही प्रतिसाद निळाला नाही, पहिल्या असहकार चळवळीला काहीच साध्य करता आले नाही तेव्हा ती स्थगित करावी लागली . या चळवळीचे घोषित उदिदष्ट पूर्णतः अससफल होते . याच्या उलट डॉ .बासाहेब आंबेडकर यांनी या देशात ठिकठिकाणी सभा सम्मेलने घेऊन जाती ह्या ईश्वर निर्मित नसून मानवनिर्मित आहेत हे ठासून सांगितले आणि समाजाच्या उन्नती साठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही असा उपदेश त्यांनी केला. म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले यांचाच आदर्श डोळयांसमोर ठेऊन डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला विषेश प्राधान्य देत इंग्रज शासनाला विनंती केली की, ज्या सनातनी संस्थेत अस्पृश्य समाजाच्या मुलांना प्रवेश नाकारण्यात येत असेल त्या संस्थांच्या शासकीय सवलती बंद करण्यात याव्यात. त्याप्रमाणे शासनाने कार्यवाही सुरु केली. त्यानंतर अस्पृश्य मुलांना हळूहळू शाळेत प्रवेश मिळू लागला. आणि फुले आंबेडकरांची मेहनत फळाला आली व बघता बघता सारा समाज जागृत झाला. डॉ. बाबासाहब आंबेडकरांनी दि.२० मार्च १९२७ ला ऐतिहासिक महाडचा सत्याग्रह घडवून आणला या सत्याग्रहात अस्पृश्य समाज पेटून उठला. बहुजन समाजातील व ब्राम्हण समाजातील सुध्दा काही पुरोगामी विचारांच्या बुद्धिवादी लोकांनी या सत्याग्रहात भाग घेतला. दि. २ मार्च १९३० रोजी नाशिकच्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह झाला तेथेही पंधरा हजाराचा मोर्चा निघाला. गांधी खळबळून जागे झाले व लगेच दि. १२ मार्च १९३० रोजी गांधीजींनी मीठाचा सत्याग्रह केला तो यशस्वी होऊ शकला. अशा प्रकारे डॉ . बाबासाहेब आबेडकरांच्याच अथक परिश्रमातून भारतीय- समाज जागृत झाला व त्याचबरोबर राष्ट्रीय भावनाही जागृत झाली . याचाच अर्थ असा की डॉ .बाबासाहे आंबेडकर यांच्या कार्यामुळे जशी अस्पृश्य वर्गात स्फूर्ती निर्माण झाली तशीच स्पृश्य हिंदूच्या मनातही त्यांनी जागृती निर्माण केली .
महणजेच डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी प्रथम तळातील दगड हलविण्याचे काम केले. ते म्हणतात तळातील दगड आपल्या जागेवरून हलतो तेव्हा त्या दगडावरील दुसरे दगडही आपोआप हालताता एकंदरीत डोंगर-पहाड, दऱ्या खोऱ्या दगड-धोंडे काटेरी झुडपांनी पडीक व नापिक झालेली भारत भुमी सुपिक करण्याचे काम हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच केले . ती जमीन नांगरुन वखरून भूस भूषित केली ती डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी तर त्या भुसभुषित आयत्या जमीनीत बीज पेरण्याचे काम गांधीजींनी केले . यावरून स्वातंत्र्याची पूर्व मशागत डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनीच केली, असे दिसते
दि .८ ऑगस्ट १९३० रोजी नागपुर येथे अखिल भारतीय बहिष्कृत वर्गार्ची परिषद् भरली अध्यक्ष पदावरुन डॉ . बाबासाहेब 'आंबेडकर म्हणाले महायुद्धा नंतर लॅटव्हिया, , लिथुआनिया, युगोस्लाव्हिया, झकोस्लाव्हिया या देशांत काय परिस्थिती उत्पन्न झाली आहे ते पहा. युरोपातील राष्ट्रांत भीन्न वंशांचे, भिन्न भाषांचे भीन्न धर्मपंथाचे लोक असूनही ती राष्ट्रे स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगू शकतात. तेव्हा हिंदूस्थान स्वतंत्र व स्वयंशासित राष्ट्र म्हणून जगण्यास हरकत नाही. हिंदूस्थानातील धार्मिक व सामाजिक गोंधळ त्याहुन जास्त आहे असे मला वाटत नाही. मात्र हिंदूस्थानातल्या परिस्थितीतील भिन्नता लक्षात घेऊनच राज्यघटना तयार केली पाहिजे. ज्याप्रमाणे कोणत्याही एका राष्ट्राला दुस-या राष्ट्रावर राज्य करण्याचा अधिकार नाही त्याचप्रमाणे कोणत्याही एका विशिष्ट वर्गाला दुसऱ्या वर्गावर अधिसत्ता गाजविण्याचा अधिकार नाही. मानवी मुल्य मान्य करणे आणि प्रत्येक व्यक्तीला आयुष्य एकदाच जगायचे असत्यामुळे त्याच जीवनात त्याला आपला उत्कर्ष साधण्याची जास्तीत जास्त संधी दिली पाहिजे अशी श्रध्दा बाळगणे हाच आधुनिक लोकशाही राज्यपध्दतीचा मूलभुत सिध्दांत आहे परंतु वरिष्ठ हिंदू वर्गाची धर्मश्रद्धा व वर्तणूक ही हया मुलभूत सिद्धांताला प्रत्यक्षात प्रतिकुल आहेत. नागपुर येथे भरलेल्या परिषदेच्या भाषणात बाबासाहेबांनी ब्रिटिश सत्तेच्या अंतरंगाचे दर्शन घडविण्यास मागे पुढे पाहिले नाही. ते हणाले "स्वराज्य का हवे ह्याचे इतर कोणतेही कारण तुम्हासा पटले नाही, तरी दारिद्रय हे कारण तुम्हास पटण्यासारखे आहे, हिंदुस्थानातील दारिद्र्याशी तुलना करण्यासारखे दारिद्रय पृथ्वीच्या पाठीवर कोठेतरी सापडेल काय? ते पुढे म्हणाले ब्रिटिश सत्ता स्थिरावल्यापासून भारतात गेल्या शतकात एकंदर एकतीस दुष्काळ पडले व त्यात सुमारे अडीच ते तीन कोटी लोक भुकेने मेले. याचे कारण असे की, आपल्या देशात उद्योगधंदे व व्यापार यांची वाढ होऊ दयावयाची नाही व " हिंदुस्थानांतील व्यापारपेठ सदैव खुली रहावी असेच ब्रिटिश राज्य कारभाराचे बुद्धिपुरस्सर धोरण आहे .
ब्रिटिशांनी सुधारलेली विधी पद्धती आणि सुव्यवस्था ह्यांची देणगी हिंदुस्थानास दिली ही गोष्ट खरी तथापी मनुष्य केवळ .विधी वर व सुव्यवस्थेचर जगत नाही, तर तो अन्नावर जगतो हे आपण लक्षात घेतले पाहिजे आपल्या दैन्यावस्थेचा शेवट ब्रिटिशांच्या राज्यात होणार नाही तर तो स्वराज्याच्या घटने द्वारा आपल्या हाती राजकीय अधिकार आल्यानेच होऊ शकेल . त्यानंतरच लोकांचे कल्याण होऊ शकेल . तेव्हा आपल्या गतकाळातील घटनांचा आता विचार करून घाबरू नका स्वराज्य हेच ध्येय माना असा संदेश त्यांनी आपल्या लोकांना दिला .
ब्रिटिश सरकारने भारतीयांना राजकीय सत्ता देऊ नये अशीच प्रार्थना अस्पृश्यांचे पुढारी आजवर करित आले होते पण डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं नेतृत्व स्वीकारल्यापासून त्यांनी सामाजिक समता आणि राजकीय समता यांविषयी झगडा सुरु केला आपला समाज स्वराज्यवादी आहे. असे सांगून देशास स्वराज्य मिळालेच पाहिजे अशी त्यांनी संदिग्ध घोषणा केली...
आंबेडकरांनी ब्रिटिश सरकारवर केलेला हल्ला पाहून केसरी ने आंबेडकरांना असा टोमना मारला की जसा सीझर त्याचा मित्र बृटस वर उलटला तसे ब्रिटिशांवर आंबेडकर उलटले असे ब्रिटिशांना वाटेल .
याच संधीस पोलंडच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर युरोपमध्ये दुसरे जागतिक युद्ध पेटले. ब्रिटिश महाराज्यपालांच्या एका घोषणेने जर्मनीविरुद्ध हिंदुस्थानास युद्धात गुंतविण्यात आले. प्रमुख भारतीय नेत्यांनी जागतिक युद्धासंबंधी आपली मते व्यक्त केली. हिंदी उदारमतवादी पक्षातील नेत्यांनी सरकारला युद्धकार्यात विनाअट साहाय्य करावे असे मत दिले. मुसलमानांच्या मुस्लीम लीग ह्या प्रमुख राजकीय संस्थेचे नेते जिना म्हणाले की, ब्रिटिशांनी हिंदी मुसलमानांच्या मनात सुरक्षितता नि मुक्ती यांची भावना निर्माण करावी. महायुद्धारंभी सरदार वल्लभभाई पटेलांसह सर्व काँग्रेसनेत्यांनी आणि चंग के शेक ह्यांना भेटून उल्हसित मनाने भारतात परत आलेले पंडित नेहरू ह्यांनी, महायुद्धात ब्रिटिशांना विनाअट सहाय्य करावे अशीच घोषणा केली. महायुद्धाच्या त्या आणीबाणीच्या काळात सौद्याची भाषा बोलावयास त्यांचे मन होईना.
गांधीजी तर दुःखात चूर होऊन गेले ! ते ब्रिटिश महाराज्यपालांना म्हणाले की, 'ब्रिटिश लोकसभागृह नि वेस्ट मिन्स्टर अँबे यांचा नाश झाला तर आपणास अत्यंत दुःख होईल.' हिंदुमहासभेचे नेते सावरकर म्हणाले, 'जोपर्यंत ब्रिटन हिंदुस्थानला पारतंत्र्यात खितपत ठेवीत आहे तोपर्यंत ब्रिटन मानवजातीच्या स्वातंत्र्याशी निगडित असणाऱ्या उच्च तत्त्वांच्या संरक्षणासाठी महायुद्धात उतरले आहे ही त्यांची घोषणा एक शुद्ध बनवेगिरी मानण्यात येई
स्वतंत्र मजूर पक्षाच्या वतीने काढलेल्या आपल्या पत्रकात आंबेडकर म्हणाले, 'पोलंडच्या बाजूला विशेष न्याय आहे असे नाही. कारण ज्यूंचा पोलंडनेही छळ केला आहे. पोलंडचा प्रश्न हा केवळ ह्या युद्धातील एक घटना आहे एवढेच. परंतु आपल्याशी ते सहमत होणार नाहीत, त्यांच्यावर आपले मत आपण लादणारच हा जर्मनीचा दावा हे सर्व जगावर कोसळलेले मोठे अरिष्ट आहे. ब्रिटिशांची अडचण ती आपली संधी आहे असे मानणाऱ्या भारतीयाचे मत आंबेडकरांना मान्य नव्हते. ज्या योगे भारतीय लोक पुन्हा नवीन गुलामगिरीत जातील अशा मागनि त्यांनी जाऊ नये, असा त्यांनी अभिप्राय व्यक्त केला डॉ . बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणाले की, भारताला आपल्या परराष्ट्रीय धोरणात वृद्धिं किंवा तह करणे यासंबंधी मत देण्याचा अधिकार असू नये ही गोष्ट अन्यायाची आहे. भारताने ब्रिटिश राष्ट्रकुलात राहून इतर घटकांच्या बरोबरीने आपणास दर्जा प्राप्त करून घेण्यासाठी झगडावे, हे बरे. ब्रिटिशांनी हिंदी लोकांना आपले आत्म संरक्षण करण्यास समर्थ करण्याच्या दृष्टीने काही योजना आखावी असे त्यांनी सांगितले. गोलमेज परिषदेच्या वेळी भारताचे संरक्षण भारतीयांनीच करावे हे तत्त्व ब्रिटिशांनी मान्य केले होते. त्याची त्यांना आंबेडकरांनी आठवण करून दिली. आपल्या पत्रकाच्या शेवटी आंबेडकर म्हणाले की, 'युद्ध संपल्यावर भारतास ब्रिटिश साम्राज्यात कोणता दर्जा प्राप्त होईल याविषयी ब्रिटनने आश्वासन देणे ब्रिटनचे कर्तव्य आहे. युद्धकालानंतर भारताला ज्या तत्त्वांपासून काही फायदा होण्यासारखा नसेल त्या तत्त्वांसाठी भारत स्वखुशीने मनःपूर्वक लढणार नाही.'
चौदा सप्टेंबर १९३९ रोजी काँग्रेस नेत्यांनी जागतिक युद्धाविषयीचे आपले धोरण बदलले. त्यांनी असे घोषित केले की, स्वतंत्र लोकशाहीप्रधान भारत इतर स्वतंत्र देशांशी एकमेकांच्या संरक्षणासाठी सहकार करील. ब्रिटिश साम्राज्यवाद नि लोकशाही यांच्या संदर्भात, आणि विशेषतः हिंदुस्थानच्या दृष्टीने ब्रिटिश सरकारने आपले युद्धविषयक धोरण जाहीर करावे अशी विनंती केली.
काँग्रेस पक्षाच्या ह्या अनिश्चित धोरणाशी आंबेडकर सहमत नव्हते. काँग्रेस ही सर्व भारताची प्रतिनिधी आहे हा गांधीजींचा दावा काँग्रेसेतर नेत्यांना मुळीच मान्य नव्हता. 'तो दावा फॅसिस्ट वृत्तीचा आहे आणि तो हिंदी लोकशाहीस प्राणघातक ठरेल,' असे पत्रक वीर सावरकर, न. चिं. केळकर, जमनादास मेथा, चिमणलाल सेटलवाड, सर कावसजी जहांगीर आणि सर विठ्ठलराव चंदावरकर ह्यांनी काढले. आंबेडकरांनीही त्याच्यावर सही केली. हे सात नेत्यांच्या सहीचे पत्रक त्या वेळी बरेच गाजले
त्याच समयी ब्रिटिश महाराज्यपाल लॉर्ड लिनलिथगो यांनी राजेंद्रप्रसाद, सुभाषचंद्र बोस , आंबेडकर आदींसहीत सुमारे बावन्न भारतीय नेत्यांशी चर्चा केल्यानंतर एक पत्रक प्रसिद्ध करून हिंदी लोकांच्या आशा नि आकांक्षा ह्यांविषयी ब्रिटिश सरकार चे काय म्हणणे आहे ते त्यात विशद केले. त्यातील एक महत्त्वाचे विधान असे होते की, युद्धसमाप्तीनंतर सर्व प्रमुख पक्षांच्या संमतीने हिंदुस्थान सरकारच्या शासनाविषयी कायद्यात दुरुस्ती घडवून आणू. आणि कोणतीही महत्त्वाची राजकीय सुधारणा घडवून आणीत असता ती अल्पसंख्याकांच्या संमतीशिवाय केली जाणार नाही. युद्धकाळात सर्व पक्षांच्या प्रतिनिधींचे एक सल्लागार मंडळ नेमण्यात येईल असे त्यांनी जाहीर केले. काँग्रेसच्या कार्यकारिणीने महाराज्यपालांचे निवेदन संपूर्णतया असमाधानकारक आहे आणि ब्रिटनला दिलेल्या सहाय्याचा अर्थ ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी धोरणाला आपली संमती आहे असा होईल असे म्हटले. ह्यासाठी काँग्रेसने सर्व प्रांतिक मंत्रिमंडळांना राजीनामा देण्याचा आदेश दिला. असे करण्यात काँग्रेसने ज्या धोरणाचा तिला तिटकारा वाटत होता ते धोरण सोईस्कररीत्या पुढे चालविण्यास ब्रिटनला नकळत मुभा दिली.
आंबेडकरांनी दिल्लीहून एक जाहीर निवेदन प्रसिद्ध केले. त्यात त्यांनी म्हटले होते 'गांधी नि काँग्रेस ह्यांनी काँग्रेसच्या बाहेरील व्यक्ती नि पक्ष यांच्या बाबतीतला आपला अहं मान्य नि अहंकारी दृष्टिकोन टाकून दिल्याशिवाय अल्पसंख्याकांचा प्रश्न सुटू शकणार नाही. देशभक्ती ही काही एकट्या काँग्रेसवाल्यांची मिरास नव्हे; म्हणून काँग्रेसच्या मतप्रणालीपेक्षा वेगळी मतप्रणाली असणाऱ्या व्यक्तींना ती तशी बाळगण्याचा हक्क आहे. तसेच तिला मान्यता मिळविण्याचा हक्कही त्यांना आहे.' मुस्लीम लीगने काँग्रेस मंत्रिमंडळावर केलेल्या आरोपांचा उल्लेख करून ते म्हणाले की, त्या आरोपांवर आपला विश्वास नाही. मुसलमानांचा काँग्रेस राजवटीत छळ होतो आहे किंवा ते त्रस्त झाले आहेत यावर आपला विश्वास नाही. इतर अल्पसंख्याकांप्रमाणे त्यांनाही राज्यकारभारात आपला भाग असावा असे वाटते . शेवटी ते म्हणाले की," जर मुस्लिम लिगच्या भारतविच्छेदनाच्या मागणीने मुसलमानांच्या मनाची पकड घेतली, तर भारत अखंड राहण्याची आशाच बाळगायला नको . अस्पृश्य वर्गाने जर अन्य धर्म स्वीकारला तर त्याचे सर्व दायित्व काँग्रेसवरच पडेल . कांग्रेसचे युद्धसमितीचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुद्धाआबेडकरांशी दोन दिवस चर्चा केली . ही पहिली आंबेडकर नेहरु भेट होती नेहरुंना डॉ . बाबासाहेब आंबेडकर आपल्या खाजगी संभाषणात चौथ्या इयत्तेतला शाळकरी मुलगा म्हणत .डॉ . बाबासाहेब आंबेडकर म्हणत माझी भुमिका काय आहे, ते या देशात यथार्थ पणे समजली नाही , हे मला माहित आहे . परंतु मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो की,जेव्हा जेव्हा माझे वैयक्तिक हित नि सर्व देशाचे हित यांत संघर्ष निर्माण झाला तेव्हा तेव्हा मी देशाच्या हिताला प्राधान्य , दिले व स्वतःच्या हिताला दुय्यम मानले . जर मी आपल्या शक्तीचा नि परिस्थितीचा स्वतःसाठी उपयोग केला असता, तर आज मी दुसऱ्याच एखादया स्थानी असतो . देशाच्या मागण्यांचा जेव्हा जेव्हा प्रश्न आला,तेव्हा तेव्हा मी इतरांच्या पाठीमागे तसूभरही नव्हतो . याविषयी गोलमेज परिषदे वेळचे माझे सहकारी माझ्या म्हणण्याला पृष्टी देतील अशी मला खात्री आहे .गोलमेज परिषदेतील ब्रिटिश मुत्सद्दी तर माझा पवित्रा पाहून गोंधळून गेले होते . त्यांच्या मतांप्रमाणे गोलमेज परिषदेत नको ते प्रश्न विचारणारा मी एक भयंकर कारटा ठरलो होतो . 'परंतु या देशातील जनतेच्या मनात मी नसती शंका राहू देणार नाही.मी दुसऱ्या एका अशा काही निष्ठेला बांधला गेलो आहे की, तिला मी कधीही अंतर देऊ शकणार नाही. ती निष्ठा म्हणजे माझा अस्पृश्य वर्ग. त्यांच्यात मी जन्मास आलो. त्यांचा मी आहे. जिवांत जीव असेपर्यंत मी त्यांना अंतर देणार नाही. यास्तव मी दृढनिश्चयपूर्वक सांगतो की जेव्हा अस्पृश्यांचे हित व देशाचे हित यांमध्ये संघर्ष निर्माण होईल त्या वेळी माझ्यापुरते मी सांगतो, की अस्पृश्यांच्या हितालाच मी प्राधान्य देईन. जी छळ करणारी बहुसंख्याक जमात आहे, ती देशाच्या नावाने बोलत असली तरी तिला मी पाठिंबा देणार नाही. ही माझी भूमिका प्रत्येकाने नि प्रत्येक ठिकाणी समजून घ्यावी. देशाचे हित आधी की माझे हित आधी असा प्रश्न उद्भवला तर मी आधी देशाचेच हित पाहीन. तसेच माझ्या समाजाचे हित आधी की देशाचे हित आधी असा जेव्ह प्रश्न उपस्थित होईल, तेव्हा मी अस्पृश्य वर्गाच्या हिताच्याच बाजूने उभा राहीन अशा परखड मताचे होते डॉ . बाबासाहेब आंबेडकर . साम्राज्यशाही , भांडवलशाही, जमीनदारशाही आणि मध्यमवर्गीय हिंदी व्यापारी यांच्या दडपणातून राष्ट्राला मुक्त करणे हेच संपूर्ण स्वातंत्र्य आहे असे त्यांचे म्हणणे होते .
स्वतंत्र मजूर पक्षाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची सभा ता. २१ मार्च १९३९ रोजी मुंबई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरली होती. यावेळी पक्षाचे ध्येय संपूर्ण स्वातंत्र्य असल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी भाषण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
आमचा पक्ष श्रमजिवी वर्गाचा आहे. परकीय साम्राज्यशाही, हिंदी भांडवलशाही व जमीनदारशाही आणि मध्यमवर्गीय हिंदी व्यापारी यांच्या दडपणाखाली श्रमजिवी वर्ग दबला आहे. त्याची या बिकट परिस्थितीतून मुक्तता करणे हिंदी राष्ट्राला संपूर्ण स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय अशक्य आहे. संपूर्ण स्वातंत्र्याचे आमचे ध्येय शुद्ध स्वरूपाचे आहे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सुरू झालेल्या कोणत्याही लढ्यात आपला पक्ष प्रामुख्याने भाग घेईल. तोपर्यंत गोरगरीब बहुजन समाजाची पिळवणूक करणाऱ्या आमच्याच देशबांधवांशी आम्ही आमचे निशाण उभारू.
मजूर मंत्री आंबेडकर यांनी १३ नोव्हेंबर १९४२ या दिवशी मुंबईहुन आकाशवाणीवर 'भारतीय मजूर आणि महायुद्ध' या विषयावर भाषण केले. आपल्या भाषणात ते म्हणाले, 'हे युद्ध केवळ पृथ्वीवरील प्रदेश वाटून घेण्यासाठी सुरू झालेले नाही, तर ते माणसामाणसांत नि राष्ट्राराष्ट्रांत सहजीवनाचे कसे नाते असावे या विषयी मूलभूत फरक घडवून आणण्यासाठी घडत आहे. सहजीवनाच्या अटीच्या फेरतपासणीची मागणी करणारी ही क्रांती आहे. सामाजिक पुनर्रचनेची ही मागणी आहे. म्हणून नाझीवादाचा जय झाला तर नाझी समाजरचनेखाली स्वातंत्र्याची गळचेपी होईल, समता नाकारण्यात येईल आणि एक अनिष्ट मत म्हणून बंधुता समूळ उखडून टाकण्यात येईल, स्वातंत्र्य नि नवीन समाजरचना ही फळे लोकशाहीच्या विजयामुळे लाभतील, तथापि, निव्वळ स्वातंत्र्य मिळून पुरेसे कार्य होत नाही. स्वातंत्र्याचे मूल्य तुम्ही कोणत्या तऱ्हेची समाजरचना नि राज्यघटना उभारू पाहता यांवर अवलंबून आहे. म्हणून कामगारांनी आपली सर्व शक्ती एकवटून 'छोडो भारत' ही मागणी करण्यापेक्षा नवीन भारताची मागणी करावी. हिंसेच्या शक्तीला शरण जाऊन मिळविलेली शांतता ही खरी शांतता नव्हे. ती आत्महत्या होय; तसे करणे म्हणजे सुखी, सुंदर अन् स्वास्थ्यपूर्ण जीवन जगण्यासाठी जे काही उदात्त नि आवश्यक असते त्याची होळी करून रानटीपणाला आणि अनाचारीपणाला शरण जाण्यासारखे आहे. हल्ला झाला असता केवळ लढण्याचे नाकारून युद्धाचा नायनाट होणार नाही. युद्धाचा नायनाट करावयाचा असेल, तर युद्ध जिंकून न्यायाने तह प्रस्थापित केला पाहिजे . एकंदरीत डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनला विनाअट पाठिंबा दिला ते म्हणाले,' हे महायुद्ध झोटिंगशाही आणि लोकशाही यामध्ये जुंपले आहे . ही झोटिंगशाही कोणत्याही नैतिक पायावर आधारलेली नाही . ती वांशिकअभिमानावर आधारलेली आहे . नाझीवादाने मनुष्यमात्राच्या भाविष्याला मोठा धोका निर्माण केला आहे . या जगाच्या पाठिवरुन माणसा माणसांमध्ये मनुष्याचे नाते जोडणारी लोकशाही नष्ट होऊ नये म्हणून तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे . म्हणून अस्पृश्य समाजाने जगातील इतर लोकशाह्यांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे
अशा स्वराज्यवादी नि देशभक्त आंबेडकरांनी इंग्रज सरकार विरुध्द लढून काँग्रेस सत्याग्रहींचा सुद्धा बचाव केला दि. २५ सप्टेंबर १९३० रोजी काँग्रेसच्या जंगल सत्याग्रहामुळे एक मामलेदार आणि कांही सरकारी नोकर ठार झाले होते. या खटल्यात ४७ काँग्रेस सात्याग्रही अडले होते . हा सत्याग्रह पनवेल जवळील चिरनेर खेड्यात झाला होता ., ठाणे येथील न्यायालयात तो खटला चालू घ होता . या खटल्याचे स्वरूप सरकार विरुद्ध जनता असे असल्यामुळे ह्या खटल्याचे प्रतिध्वनी सर्व देशभर उठले होते. म्हणून हा खटला न्यायालयात चालविण्यासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिध्द वकील दादासाहेब करंदीकर, डॉ. आंबेडकर, के.ना. धारप आणि रेंगे यांना वकीलपत्र देण्यात आले.
सरकारी साक्षीदारांची उलट तपासणी डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी चातुर्याने आणि बारकाईने केली . मंगळवार दि. २० जून रोजी आंबेडकरांनी आरोपी नं. ८, ९ व १० ह्यांच्या वतीने मुद्देसूद आणि परिणामकारक असे बचावाचे *भाषण केले. न्यायमंडळ व न्यायधिशाकडे पाहून ते मोठ्या आर्त स्वरात म्हणाले 'हया खटल्यास एक विशिष्ट स्वरुप प्राप्त झाले आहे. जनता विरूध्द सरकार अशा स्वरूपाचा हा खटला आहे असे मानले जाते. या खटल्यात अंतर्भूत झालेले प्रश्न म्हणजे सरकारचे स्थैर्य ह्या विरुद्ध लोकांचे स्वातंत्र्य म्हणून ज्यूरी मंडळाला माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी लोकांचे न्याय्यहक्क आणि स्वातंत्र यांना सरकारच्या स्थैर्यापेक्षा अधिक महत्व द्यावे." गुंतागुंतीच्या आणि प्रदीर्घप चाललेल्या हया अभियोगाचा निकाल २ जुलै १९३१ रोजी लागला . २९ आरोपींना निरनिराळ्या मुदतीची शिक्षा झाली व उरलेले १७ जण निर्दोष सुटले.हया खटल्यामध्ये काही सत्याग्रहींना फाशीची शिक्षा होऊ शकत होती. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकांचे न्याय्यहक्क आणि स्वातंत्र्य याकरिता लढणा-या सत्याग्रहींचा बचाव केला. तेव्हा स्वातंत्र्याचे पहिले मानकरी खरे म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरच ठरतात डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीजींना सुद्धा जेलमध्ये जाण्यापासून परावृत्त केले होते .१९४२ मध्ये 'चलेजाव चळवळ' काँग्रेसने सुरू केली. तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे मजूरमंत्री होते. गांधीजी व नेहरूजी यांना जेलमध्ये पाठवायचे ठरले. सर्व कागदपत्र तयार झाले. परतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रज सरकारला विरोध केला व बजावून सांगिले की गांधीजींबरोबर माझे राजकीय मतभेद असले तरी ते एक राष्ट्रधुरीण आहेत तेव्हा त्यांना जेलमध्ये टाकण्यात येऊ नये. इंग्रज सरकारनी जेलचा बेत बदलवून गांधीजींना पुण्याच्या आगाखान पॅलेसमध्ये ठेवण्यात आले. १९५६ च्या नाशिकच्या सभेत आचार्य अत्रेनी ही आठवण करून दिली .
गांधीजींची ' चलेजाव चळवळ ही ऐन युद्धाच्या वेळेस असमर्थनीय ठरली होती .६जुलै १९४२ रोजी वर्धेला झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत 'चलेजाव चळवळ' एकमताने पास झाली. हिंदुमहासभा व अस्पृश्य गटांनी विरोध दर्शविला. एरव्ही काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या ब्रिटिश मजूर पक्षाने याबाबतीत काँग्रेसवर विशेषतः गांधीजींवर टीकेची झोड उडविली.
गांधींनी तर ह्या वेळची चळवळ उघड बंडाच्या स्वरूपाची राहिल असे म्हटले होते आणि 'करेंगे या मरेंगे' असा संदेशही दिला होता. मध्येच चळवळ स्थगित केली जाणार नाही. स्वातंत्र्यासाठी दोन-चार लाखांची आहुती द्यावी लागली तरी ती स्वातंत्र्याची किंमत फारशी मोठी ठरणार नाही, असेही त्यांनी प्रतिपादन केले होते.
२७ जुलै १९४२ रोजी दिल्ली येथे सायंकाळी डॉ. आंबेडकरांनी टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राच्या प्रतिनिधीला मुलाखत दिली त्या वेळी ते म्हणाले गांधीजींचा करेंगे या मरेंगे' हा आदेश बेजवाबदारपणाचा नि मुर्खपणाचा आहे. त्यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीचे दिवाळे निघाल्याचे ते द्योतक आहे महायुद्ध सुरू झाल्यापासून काँग्रेसची घसरलेली पत सावरण्याचा तो प्रयत्न आहे . रानटी लोक भारतावर अधिपत्य स्थापण्यासाठी भारताच्या वेशीपाशी उभे ठाकले असता देशातील कायदा नि सुव्यवस्था ही कमजोर करणे हा वेडेपणा आहे .भारतीयांच्या संबंधात बोलायचे तर ब्रिटिश आता शेवटच्या खंदकात लढत आहेत .
जर लोकशाहीचा विजय झाला तर भारतीय स्वातंत्र्याच्या आड कोणी येऊ शकणार नाही, पुढे ते म्हणाले की गांधीजी वृध्द झाल्यामुळे ते उतावळीने ग्रासले आहेत 'चलेजाव' व 'करेंगे या मरेंगे' चळवळ ऑगस्ट १९४२ रोजी सुरू झाली देशातील इतर राजकीय गट मात्र चळवळीपासून अधिकृतरीत्या अलिप्त राहल्याचेच दृश्य दिसत होते. भारतीय साम्यवादी व रॉयिस्ट गट यांना ब्रिटिश विरोधी लढा नको होता. कारण रशिया व इंग्लंड एकत्र येऊन नाझी विरुद्ध लढत असतांनाच चलेजाव आंदोलनांमुळे दोस्तांच्या युद्ध कार्यात अडथळा आणणे त्यांना योग्य वाटत नव्हते .हिंदुमहासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व मवाळ उदारमतवादी गट हे चळवळीपासून अलिप्त राहिले. डॉ. आंबेडकरांनी चळवळीला विरोध केला. प्रचलित परिस्थितीत कायदे भंग करणे हा गुन्हा आहे, म्हणजे हे शत्रूला आमंत्रण आहे. म्हणून देशाविषयी प्रेम असणा-यांनी चळवळीला विरोध करावा असे त्यांनी ठामपणे प्रतिपादन केले. अखील शीख परिषदेनीही सहभाग घेतला नाही. पूर्व तयारी न करता आणि स्पष्ट आदेश न देता काँग्रेसने सुरू केलेली 'ऑगस्ट क्रांती' काही आठवडे दंगे, बंडाळी, मोडतोड अन विध्वंस करून शेवटी थंडावली. अशारीतीने त्या क्रांतीयुध्दाचा शेवट झाला.
विशेष बाब म्हणजे दुसऱ्या महायुध्दाच्या वेळी अमेरिका-ब्रिटन यांची रशियाबरोबर जर्मनीविरूध्द झालेली युती होय; रशियाची लाल सेना प्राणपणाने इंच-इंच भूमी लढत होती. शेवटी १९४३ च्या फेब्रुवारीमध्ये ९० हजार जर्मन सैनिक ठार झाले. नाझी फौजांना प्रचंड तडाखा बसला. या लढ्याने युद्धाचे पारडे एकदम फिरले. अन्यथा आज जगाचे चित्र वेगळेच दिसले असते व भारताला लोकशाही पाहता आलीच नसती.
युरोपात जर्मनीचा पराभव झाल्यानंतरही आशिया खंडातील युद्ध आणखी चालूच होते. पण जपान शरणागती पत्करण्यास तयार नव्हता, तेव्हा अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा या लष्करी केन्द्रावर व नागासाकी या शहरावर अटमबॉम्ब टाकले. शेवटी जपानने शरणागती पत्करली आणि दुसरे महायुध्द समाप्त झाले.
१ फेब्रुवारी १९४३ रोजी लार्ड लिनलिथगो यांनी 'काँग्रेस रिस्पान्सिबिलीटी फॉर डिस्टरबन्सेस' या शिर्षकाखाली पृष्ट-८६ पानाची पुस्तिका प्रकाशित केली आणि त्यात देशातील हिंसाचारामागे गांधींची प्रेरणा आहे, सरकारला अडचणीत टाकून जपानला भारत देशात आमंत्रित करण्याचा त्यांचा मनोदय आहे असे आरोप करण्यात आले होते . ३० नोव्हेबर १९४५ रोजी अहमदाबाद नगरपालिकेने डॉ . बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र दिले त्यावेळी ते म्हणाले "जर हिंदी सरकारने ऑगस्ट १९४२ मध्ये कडक उपाय योजले नसते तर जर्मन किंवा जपानी सैनिकांनी सारा देश व्यापून टाकला असता भारताची दुर्दशा केली असती. भाषणाच्या शेवटी ते म्हणाले देशाला स्वराज्य नको असे कोणीतरी. कधीतरी म्हणू शकेल काय? मला संपूर्ण स्वराज्य हवे आहे. स्वराज्य आपल्या दृष्टीपथास आहे. ब्रिटिश सरकार आता फार काळ राहू शकणार नाही. अशाप्रकारे सर्व राजकीय पक्ष किंवा गट व राष्ट्रीय नेते यांचा 'चलेजाव / छोडो भारत', 'करेंगे या मरेंगे' या चळवळीला विरोध होता असे दिसून येते. यावरून ऐन युद्धाच्या भरात चलेजाव चळवळ ही असमर्थनीय ठरली होती हेच सिद्ध होते .
याचाच अर्थ असा की, भारताला स्वातंत्र्य चलेजाव चळवळी मुळे मिळालेलेच नसून ते डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या दुरदृष्टी आणि भारतातील काँग्रेसेतर संघटनांच्या समय सुचकतेमुळेच मिळालेले आहे .दुस-या महायुध्दाच्या समाप्तीनंतर जगातील परतंत्र देश स्वातंत्र्याच मागणी करू लागले.जवळजवळ सहा वर्षाच्या प्रचंड युद्धकाळात इंग्लंडचा झालेला शक्तीक्षय व अर्थव्यवस्थेवर झालेला विलक्षण परिणाम.हिंदी जनतेने व हिंदी सेनेने युध्दाच्या वेळी दिलेले सहकार्य.
ब्रिटीश प्रधानमंत्री ॲटली व माजी प्रधानमंत्री चर्चिल यांची यापूर्वीच मिळालेली स्वातंत्र्याची मान्यता अमलात आली .
त्यानुसार हिंदी जनतेचा भारताची घटना बनवण्याचा हक्क मान्य करण्यात आला. पुढे भारतात निवडणुका झाल्या व २९ जून १९४६ रोजी काळजीवाहू सरकार जाहीर झाले. भारताच्या स्वातंत्र्याचे व विभाजनाचे विधेयक ॲटली सरकारने ४ जुलै रोजी पार्लमेन्टपुढे सादर केले. व फाळणीच्या योजनेला विन्स्टन चर्चिल ह्या कट्टर साम्राज्यवादी कंझर्वेटिव नेत्याची अगोदरच मान्यता मिळाली असल्यामुळे स्वातंत्र्याच्या या विधेयकावर फारशी साधकबाधक चर्चा न होता संसदेच्या दोन्ही सभागृहात विधेयक सुरळीतपणे पारित झाले. १८ जुलै १९४७ रोजी त्यावर ब्रिटिश साम्राज्याची स्वाक्षरी झाली व भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा १४-१५ ऑगस्टच्या मध्यरात्री दिल्ली येथील संसद सदनाच्या मुख्य सभागृहात भरलेल्या भारताच्या घटना समितीच्या बैठकीत केली गेली. ज्याप्रमाणे भारताला स्वातंत्र्य मिळाले त्याचे एक वर्षाआधी म्हणजे १९४६ मध्ये फिलिपाईन्स स्वतंत्र झाला. १९४७ मध्ये ब्रह्मदेश स्वतंत्र प्रजासत्ताक झाला .१९४९ रोजी इंडोनेशिया स्वतंत्र झाला. अशा प्रकारे अनेक आशियन व युरोपीय राष्ट्र स्वतंत्र झाली. १९५६ मध्ये श्रीलंका स्वतंत्र झाली. मग गांधीजींनी स्वातंत्र्य मिळविले कसे? व डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रद्रोही कसे? जर लष्कर व हुकूमशहा राष्ट्रांचा विजय होऊन स्वातंत्र्य मिळाले असते तर गांधीजी स्वातंत्र्याचे मानकरी ठरले असते. परंतु रानटीलोकांपासून देशाला वाचविले आणि लोकशाहीवादी -मित्र राष्ट्रांचा विजय होऊन स्वातंत्र्य मिळाले तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच स्वातंत्र्याचे खरे मानकरी ठरतात.
शेवटी एकच सांगतो आपण इंग्रजांच्या गुलामीतून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य झालो परंतु प्रत्येक व्यक्तीला खरंच स्वातंत्र्य संविधानाने दिलं.
नाहीतर हा देश पुन्हा एकदा राजे राजवाड्यांचा धन दांडग्यांचा किंवा लष्कर शहांचा गुलाम झाला असता.
लोकशाही संविधानाने दिलेले स्वातंत्र्य खरं स्वातंत्र्य.
संविधानिक दृष्टिकोनातून स्वातंत्र्य समजून घ्या.
फक्त ब्रिटिश या देशातून जाणे म्हणजे स्वातंत्र्य नाही.
तर ब्रिटिश गेल्यानंतर माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी संविधानाने समता बंधुता न्यायावर आधारित मानवतावादी दृष्टिकोनातून दिलेले हक्क अधिकार म्हणजे स्वातंत्र्य होय .
तेव्हा पुन्हा एकदा सांगतो भारतीय स्वातंत्र्याचे पहिले मानकरी हे डॉ . बाबासाहेब आंबेडकरच आहेत . डॉ .बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की *आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत स्वातंत्र्यासाठी लढा.*आणि त्याचे रक्षण करा, जयभीम .
***** ॲड . राजेश वसंत रायमळे *****
( एम . ए .एल एल बी .)
भ्रमण ध्वनी क्र .९७६४७४२०७९
सदर्भ--- * डॉ . बाबासाहेब आंबेडकर--
धनंजय कीर
* डॉ . बाबासाहेब आंबेडकर लेखन
आणि भाषणे खंड१८ भाग२
* मानवतेचे कैवारी
डॉ . बाबासाहेब आंबेडकर---
आचार्य प्र . के . अत्रे
* भारतीय स्वातंत्र्य मिळविण्यात
डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा
सहभाग --- म वा . दहिवले
* यदी बाबा न होते!---
डॉ . भदन्त आनंद कौसल्यायन