माणूस किती वर्ष जगला याला महत्त्व नाही ,तो कसा जगला ? याला अधिक महत्त्व आहे . त्यामुळे समाज आणि राष्ट्रासाठी जगणाऱ्या व्यक्तिमत्वांची नोंद इतिहास घेत असतो. इतिहासाने ज्यांची नोंद घेतली आहे अशा व्यक्तींचे जीवन पुढच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा आणि ऊर्जा देत राहते.
जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्याच्या भूमीतून स्वकर्तृत्वाने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठे झालेले स्वर्गीय श्रद्धेय हरिभाऊ जावळे हे व्यक्तिमत्व होय. ०३ ऑक्टोंबर १९५३ रोजी ' भालोद ' येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात भाऊंचा जन्म झाला. बालपणापासूनच " शेती आणि मातीशी " संबंध आल्याने कृषीप्रधान संस्कृतीचे त्यांच्यावर संस्कार झालेत. शेतकऱ्याला ऊन, वारा, पाऊस यासोबत अस्मानी आणि सुलतानी संकटांशी सामना केल्याशिवाय आयुष्यात उभे राहता येत नाही. हा जीवनानुभव त्यांनी आपल्या कुटुंबातून घेतल्याने " परिश्रम आणि संयम " या दोन गोष्टींवर भाऊंनी नितांत प्रेम करून आपल्यासह अनेकांचे जीवन आनंददायी केले. कुटुंबाला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना आपल्या शांत, संयमी आणि संवेदनशील स्वभावाने त्यांनी जीवाभावाचा प्रचंड गोतावळा निर्माण केला. सामान्य कुटुंबातून भाऊ आलेले असल्याने सुख - दुःखाचे असंख्य अनुभव त्यांनी घेतलेले होते. त्यामुळे आपण अनेकांचे आधार झालो पाहिजे असे त्यांचे व्यक्तिमत्व घडले होते.
(ads)
घरातील ते मोठा मुलगा असल्याने वडिलांच्या आकस्मिक निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी त्यांच्याकडे आली. आई, भाऊ, बहिणी यासोबतच चुलत भाऊ , बहिणी असा मोठा परिवार त्यांचा असल्याने या परिवाराचे ते सर्वार्थाने पालक झाले. कुटुंबातील लहानांना प्रेम आणि मोठ्यांचा आदर करणाऱ्या त्यांच्या स्वभावाने ते सर्वांच्याच आवडीचे झालेत.
आपली वडीलोपार्जित शेती कसत त्यांनी विज्ञान शाखेची पदवी घेतली. आपल्या उच्च शिक्षणाचा अहंकार न बाळगता भाऊंनी काही दिवस भुसावळच्या रासायनिक कंपनीत कामगार म्हणून नोकरी केली .पुढे ' भालोद ' या आपल्या मूळ गावी कृषी साहित्याच्या विक्रीचे केंद्र सुरू केले. या केंद्राद्वारे भालोद परिसरातील असंख्य शेतकऱ्यांना वैज्ञानिक पद्धतीने शेती कसण्यासाठी त्यांनी प्रेरित करून रासायनिक बी बियाण्यांचा कसा शास्त्रशुद्ध पद्धतीने वापर करावा ? हे शेतकऱ्यांना सांगून वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा प्रसार आणि प्रचार केला. अल्पावधीतच त्यांचे 'अमोल ट्रेडर्स ' हे शेतकऱ्यांच्या आधाराचे एक महत्त्वाचे केंद्र झाले. नफेखोरीच्या मागे न लागता माझ्या परिसरातील शेतकऱ्यांना वैज्ञानिक तंत्रज्ञानाच्या साह्याने अधिक उत्पन्न कसे घेता येईल यावर त्यांनी भर दिला. त्यामुळे परिसरातील त्यांची प्रतिमा एक व्यावसायिक न होता शेतकऱ्यांचा मित्र म्हणूनच तयार झाली.
(ads)
१९९९-२००० महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका लागल्यात. स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून यावल विधानसभा क्षेत्रातून काही अपवाद वगळता सातत्याने काँग्रेस पक्षाचेच उमेदवार विजयी होत असत. जनमानसात त्यावेळेस काँग्रेस पक्षाचा फार मोठा प्रभाव होता. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचे यावल आणि रावेर या दोन तालुक्यात फार मोठे संघटन होते. त्यामुळे विरोधी पक्षाच्या उमेदवाराला विजयाची संधी मिळत नव्हती. तत्कालीन भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा निवडणूक समितीने आणि विशेषता आमदार एकनाथराव खडसे यांनी यावल तालुक्यातील मातब्बर उमेदवारांचा शोध घेत असता त्यांच्यासमोर स्वर्गीय हरिभाऊंचे नाव आले. संघ विचारांचा एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून हरिभाऊंची संघ परिवारात ओळख तर होतीच. परंतु त्याहीपेक्षा सर्व समाज घटकांना परिचित असलेला शांत आणि संवेदनशील मनाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख जनमानसात पसरलेली होती. स्वच्छ चारित्र्याचे, आणि शेतकऱ्यांप्रती प्रामाणिक असलेल्या हरिभाऊंना आपण भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारी दिल्यास निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला तुल्यबळ लढत देता येईल. या विचाराने तत्कालीन पक्षश्रेष्ठींनी श्रद्धेय हरिभाऊ सारख्या राजकीय पटलावर नवख्या असलेल्या उमेदवारास उमेदवारी दिली. पक्षनेतृत्वाचा अंदाज खरा ठरला. जनतेला हरिभाऊंची उमेदवारी नक्कीच आवडली आणि जनतेने त्यांना अत्यंत चुरशीच्या झालेल्या या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठविले. एक सामान्य शेतकरी कुटुंबातला आणि कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला उमेदवार या निवडणुकीत विजयी झाल्याने भल्याभल्यांची गणिते त्यावेळेस स्वर्गीय हरिभाऊंनी नापास केली.
(ads)
यानंतर भाऊंनी मागे वळून पाहिले नाही. पहिल्या दिवसापासून ज्या जनतेने आपल्याला मोठ्या विश्वासाने निवडून दिले आहे त्या जनतेची आपल्या वीस वर्षांच्या राजकीय जीवनात भाऊंनी कधीच प्रतारणा केली नाही. जनतेचा विश्वास घात केला नाही. ज्या पक्षाने उमेदवारी दिली त्या पक्षाला आपल्या वर्तनातून ठेच पोहोचेल अशी कृती केली नाही.
पुढे जळगाव लोकसभा क्षेत्रातून खासदार झालेत. मतदार संघ पुनर्रचनेनंतर रावेर लोकसभा क्षेत्रातून पुन्हा खासदार झालेत. नंतर रावेर विधानसभा क्षेत्रातून पुन्हा आमदार झालेत. दोन वेळेस आमदारकी आणि दोन वेळेस खासदारकी भोगलेल्या हरिभाऊंच्या आयुष्यात गर्व, अहंकार, ऊद्दामपणा , किंवा मी पणाची बाधा हरिभाऊंच्या व्यक्तिमत्वाला कधीच स्पर्श करू शकली नाही. राजसत्तेतील अत्यंत महत्त्वाची पदे उपभोगूनही भाऊ अत्यंत साधे आणि सामान्यच जीवन जगत होते. त्यांच्या त्या सामान्य जीवनशैलीने सर्व समाजातील सामान्य माणसाला त्यांच्याशी संपर्क साधायला कुठलीही अडचण येत नव्हती. समोरच्या व्यक्तीचे नीट ऐकून घेणे. समस्या लक्षात आल्यानंतर ती सोडवण्याचा सत्य आणि प्रामाणिक प्रयत्न करणे. आणि त्याला लवकरात लवकर मदत आणि आधार कसा मिळेल ही आदर्श लोकनेत्याची भूमिका भाऊंनी यशस्वीपणे साकार केली.
(ads)
मोठ्यांचा सन्मान आणि लहानांचा आदर करणाऱ्या स्वर्गीय भाऊंनी आपल्या वीस वर्षांच्या राजकीय जीवनात कधीही कुठल्याही गोष्टीने वादंग निर्माण होईल अशी एकही गोष्ट किंवा कृती केलेले नाही. वर्तमान राजकारणात स्वच्छ चारित्र्याचे नेते किती ? असे वारंवार प्रश्न जनता आणि विविध माध्यमातून विचारले जातात. आम्ही अभिमानाने सांगू शकतो की हो रावेर यावेलच्या जनतेने वीस वर्ष असा लोकप्रतिनिधी पाहिला आहे की, ज्यांचे केवळ लोकप्रतिनिधित्वच नाही तर व्यक्तिगत जीवनही शुद्ध चारित्र्याचे आणि विचारांचे अनेकांनी अनुभवले आहे. आईला आई, ताईला ताई, काकूला काकू, मावशीला मावशी, आणि एखाद्या विधवा भगिनीला मी तुझा भाऊ आहे हे सांगणारे हरिभाऊ आजही हजारोंच्या मनात आहेत. शब्दातून माणसे कळतात. भाऊंच्या हासऱ्या चेहऱ्यात आणि मुखातून पडणाऱ्या प्रेमळ भाषेत जो आपुलकीचा गोडवा होता तो लाख मोलाचा होता. त्यामुळेच अनेकांच्या खांद्यावर त्यांचा पडलेला हात आणि त्या हातांचा स्पर्श आजही मोठ्या भावाच्या प्रेमाचा आनंद आणि अनुभव देत असतो.
(ads)
१९९९ ते १९१९ या वीस वर्षाच्या कालखंडात लोकप्रतिनिधीच्या विविध जबाबदाऱ्या यशस्वी सांभाळून स्वर्गीय हरिभाऊंनी रावेर - यावलच्या भूमितील जनतेची सेवा केली. शेती आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या संदर्भात त्यांनी दीर्घकालीन परिणाम करणाऱ्या विकास योजनांची पायाभरणी करून मुहूर्तमेढ रोवली. त्यातील काही योजना त्यांच्या काळात पूर्णत्वाला गेल्यात तर काही योजना प्रगतीपथावर आहेत. ' कृषीमित्र ' ही जनतेने भाऊंना दिलेली ही सन्मानाची उपाधी त्यांच्या एकूणच कार्याची पावती आहे.
शुद्ध विचारांचा आणि सर्व जाती धर्मांचा आदर करून खऱ्या अर्थाने समतेने आणि ममतेने वागवणाऱ्या या लोकनेत्याचे २० जून २०२० रोजी झालेले दुःखद निधन त्यांच्या तमाम प्रेमींना आजही अस्वस्थ करणारे आहे.
(ads)
राजकीय क्षितिजावर वीस वर्ष राजकीय नेतृत्व करून आपल्या व्यक्तिमत्त्व आणि चारित्र्यावर एक लहानसाही कलंकित करणारा डाग भाऊंनी आपल्या कर्तृत्वातून कधीही लागू दिला नाही. आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने भाऊंच्या असंख्य पवित्र आठवणींना आणि कर्तुत्वाला अभिवादन करताना मन भरून येत आहे....
असे शुद्ध चारित्र्याचे लोकनेते पुन्हा होणे नाही.....!
- प्रा डॉ.जतिन मेढे/भुसावळ
(९५४५०७२६००)



