अंधारमळी, ता. रावेर (प्रतिनिधी) – नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंधारमळी येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. इयत्ता पहिलीच्या नवागत विद्यार्थ्यांचे आरती ओवाळून, गुलाबपुष्प देऊन तसेच आकर्षक सजविलेल्या बैलगाडीतून गावभर मिरवणूक काढून दिमाखात स्वागत करण्यात आले. या अनोख्या उपक्रमाची गावभर चर्चा रंगली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे पोलीस पाटील रमजान तडवी होते.
(ads)
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सलीम तडवी, समिती सदस्य, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. फुगे, फुले व प्रवेशोत्सवाच्या बॅनरने सजविलेल्या बैलगाडीमुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला. श्री. आरिफ गफूर तडवी यांनी स्वतः बैलगाडी हाकून विद्यार्थ्यांची मिरवणूक यशस्वी केली.शासनाकडून प्राप्त मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
(ads)
तसेच विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनांतर्गत गोड शिराचे वाटप करण्यात आले. पहिल्याच दिवशी मिळालेल्या प्रेमळ स्वागतामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक शेखर तडवी, उपशिक्षिका मीना तडवी, पालक आरिफ गफूर तडवी, स्वयंपाकी जोहराबाई तडवी तसेच मदतनीस सलीमा तडवी यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. नव्या शैक्षणिक वर्षाची अशी उत्साहपूर्ण सुरुवात सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरली



