मोहराळ्यात अवैध दारूधंद्यावर संतप्त ग्रामस्थांचा एल्गार; कारवाई न झाल्यास भीम आर्मीतर्फे आंदोलनाचा इशारा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल प्रतिनिधी : राहुल जयकर

मौजे मोहराळा ता. यावल येथे राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध दारूधंद्याविरोधात अखेर ग्रामस्थांचा संताप उफाळून आला आहे. गावातील अवैध दारूधंदा तात्काळ आणि कायमस्वरूपी बंद करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा यावल पोलीस स्टेशनसमोर धरणे आंदोलन, आमरण उपोषण तसेच तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा समस्त ग्रामस्थांनी दिला आहे.

(ads)

यासंदर्भात ग्रामस्थांच्या वतीने यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मोहराळा गावात अनेक ठिकाणी सर्रासपणे अवैध दारूची विक्री सुरू असून त्यामुळे गावातील कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दारूच्या व्यसनामुळे युवक भरकटत असून अनेक कुटुंबे आर्थिक व सामाजिकदृष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून गावातील शांतता आणि सामाजिक सलोख्यालाही तडा जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

(ads)

या गंभीर प्रकाराबाबत वारंवार तोंडी तक्रारी करूनही प्रभावी कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गावातील सर्व अवैध दारू अड्ड्यांवर विशेष पथकाच्या माध्यमातून धडक कारवाई करून संबंधित आरोपींना तात्काळ अटक करावी. तसेच या अवैध धंद्याला संरक्षण देणाऱ्या व्यक्तींची निष्पक्ष चौकशी करून त्यांच्यावरही कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

(ads)

यावेळी गौरव सोनवणे (भीम आर्मी भारत एकता मिशन, यावल तालुका सचिव), सतीश अडकमोल (ऑल इंडिया पँथर सेना, यावल तालुका अध्यक्ष), विनोद अडकमोल, गोविंदा सोनवणे, सचिन वानखेडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

(ads)

निवेदनानंतरही तातडीने आणि प्रभावी कारवाई न झाल्यास भीम आर्मी भारत एकता मिशनच्या नेतृत्वाखाली यावल पोलीस स्टेशनसमोर धरणे आंदोलन, आमरण उपोषण, मोर्चा तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रारी करून व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला. "मोहराळा दारूमुक्त झाल्याशिवाय आमचा लढा थांबणार नाही," असा निर्धार ग्रामस्थांसह भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!