एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सवात सर्वपक्षीय दिग्गजांची मांदियाळी!

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



शरद पवारांकडून खडसेंच्या भाजप विस्तारातील योगदानाचे कौतुक; नाथाभाऊंनी जुन्या राजकीय आठवणींना दिला उजाळा

रावेर प्रतिनिधी : विजय एस. अवसरमल

कोथळी : ज्येष्ठ नेते तथा माजी महसूल मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कोथळी येथे आयोजित करण्यात आलेला भव्य सोहळा सर्वपक्षीय राजकीय दिग्गजांच्या उपस्थितीने ऐतिहासिक ठरला. राजकीय मतभेद बाजूला ठेवत विविध पक्षांचे नेते एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याने या सोहळ्याची राजकीय वर्तुळात विशेष चर्चा रंगली.

(ads)

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार होते. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे, अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, शेकापचे अध्यक्ष जयंत पाटील, रासपचे अध्यक्ष महादेवराव जानकर, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, अनिल देशमुख, हर्षवर्धन पाटील, राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे, गुलाबराव देवकर, दिलीप कांबळे, दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे, आमदार अभिजित पाटील, किशोर दराडे, माजी आमदार रमेशदादा चौधरी, शिरीषदादा चौधरी, डॉ. बी. एस. पाटील, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

(ads)

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, कैलास पाटील, प्रसन्नजीत पाटील, रोहिणीताई खडसे, मंदाताई खडसे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि खडसे परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिंडी सोहळ्याने मान्यवरांचे स्वागत

मान्यवरांचे आगमन होताच दिंडी सोहळ्याद्वारे त्यांना व्यासपीठाकडे नेण्यात आले. संत मुक्ताईच्या भूमीत पारंपरिक वातावरणात झालेल्या या स्वागतामुळे कार्यक्रमाला विशेष धार्मिक-सामाजिक रंग लाभला.

(ads)

कार्यक्रमाच्या प्रारंभी खडसे परिवार आणि लोकनेते एकनाथराव खडसे अमृत महोत्सव समितीतर्फे उपस्थित मान्यवरांचे संत मुक्ताईची प्रतिमा, शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते एकनाथराव खडसे यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

(ads)

‘महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये खडसेंचे योगदान महत्त्वाचे’ – शरद पवार

अध्यक्षीय भाषणात शरदचंद्र पवार यांनी एकनाथ खडसे यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीचा गौरव करताना महाराष्ट्रात भाजप रुजविण्यात त्यांच्या योगदानाचे विशेष कौतुक केले.

महाराष्ट्रात एकेकाळी भाजपचे अस्तित्व मर्यादित होते. मात्र पक्षाची संघटना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रमोद महाजन आणि एकनाथ खडसे यांनी सातत्याने मेहनत घेतली, असे पवार यांनी सांगितले.

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांची यादी प्रमोद महाजन आणि एकनाथ खडसे यांच्या नावांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असे स्पष्ट करत पवार यांनी खडसे यांच्या संघटनात्मक कार्यासह विधिमंडळातील अभ्यासपूर्ण कामगिरीचेही कौतुक केले.

(ads)

शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर विरोधी बाकावरून आक्रमकपणे भूमिका मांडणारे खडसे हे प्रभावी वक्ते होते. प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी आणि प्रभावी वक्तृत्वामुळे ते इतरांपेक्षा वेगळे ठरत असल्याचेही पवार यांनी नमूद केले.

राजकीय मतभेद बाजूला ठेवून शरद पवार यांनी खडसेंच्या भाजपमधील योगदानाचे केलेले कौतुक हा सोहळ्यातील सर्वाधिक चर्चेचा राजकीय क्षण ठरला.

‘नाथाभाऊंसारखा लोकनेता पुन्हा होणे शक्य नाही’ – जयंत पाटील


माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उत्तर महाराष्ट्रात भाजपचा विस्तार करण्यासाठी खडसे यांनी केलेल्या अथक परिश्रमांचा गौरव केला.

विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून खडसे यांनी अभ्यासपूर्ण भाषणातून प्रभावीपणे जनतेचे प्रश्न मांडले. उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी अनेक सिंचन योजना पूर्णत्वास नेल्या. माणसे जोडण्याची ताकद असलेल्या नाथाभाऊंनी ज्या पक्षात काम केले, तेथे निष्ठेने योगदान दिले, असे पाटील म्हणाले.

(ads)

‘नाथाभाऊंसारखा लोकनेता पुन्हा होणे शक्य नाही,’ असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.


दिलीप वळसे पाटलांनी सांगितल्या जुन्या आठवणी


माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही खडसे यांच्या संघर्षशील नेतृत्वाचा गौरव केला. १९९० मध्ये आपण आणि खडसे प्रथमच विधानसभेत एकत्र निवडून आलो, अशी आठवण त्यांनी सांगितली.


खडसे विरोधी पक्षनेते असताना सरकारवर जोरदार हल्ला चढवत जनतेचे प्रश्न आक्रमकपणे मांडत असत. पूर्वी राजकीय मतभेद तीव्र असले तरी वैयक्तिक वैमनस्य नसायचे, असे सांगत त्यांनी आजच्या बदललेल्या राजकीय वातावरणाबद्दलही भाष्य केले.


रक्षा खडसे आणि रोहिणी खडसे पुन्हा समाजकार्यात सक्रिय झाल्याचा उल्लेख करत वळसे पाटील यांनी नाथाभाऊंना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

(ads)

रामदास आठवलेंची कविता अन् राजकीय मैत्रीचा संदेश


केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत कविता सादर करत खडसे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. खडसे यांच्याशी जुने ऋणानुबंध असल्याचे सांगत त्यांनी मुक्ताईनगर, जळगाव जिल्हा आणि महाराष्ट्रासाठी खडसे यांनी केलेल्या कार्याचा गौरव केला.


राजकारणात वैचारिक मतभेद असले तरी वैयक्तिक संबंध आणि मैत्री जपली पाहिजे, असा संदेश आठवले यांनी दिला. लोकशाहीमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकत्र येऊन देशाचा कारभार चालवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

(ads)

नाथाभाऊ भावुक; १९७८ च्या एका मताच्या पराभवापासून राजकीय प्रवासाला उजाळा


सत्काराला उत्तर देताना एकनाथराव खडसे यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय प्रवासातील संघर्ष, चढ-उतार, मैत्री आणि कटू आठवणींना मनमोकळेपणाने उजाळा दिला.

संत मुक्ताईला वंदन करून भाषणाला सुरुवात करणाऱ्या खडसे यांनी १९७८ मधील पहिल्या निवडणुकीची आठवण सांगितली. अवघ्या एका मताने झालेल्या पराभवापासून सुरू झालेला प्रवास आज अमृत महोत्सवापर्यंत पोहोचल्याचे त्यांनी नमूद केले.

१९९० च्या दशकातील राजकीय वातावरणाचा संदर्भ देताना विरोधी पक्षात असतानाही जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील यांच्यासारख्या सत्ताधारी नेत्यांशी आपले चांगले संबंध होते, असे खडसे यांनी सांगितले.

‘पूर्वी राजकीय मतभेद असायचे; मात्र वैयक्तिक वैमनस्य नसायचे,’ अशी खंत व्यक्त करत त्यांनी आजच्या राजकारणातील बदलांवर भाष्य केले.

(ads)

‘शरद पवारांनी योग्य वेळी आसरा दिला’


भारतीय जनता पक्षासाठी अनेक दशके निष्ठेने काम केल्याचा उल्लेख करत खडसे यांनी आपल्या आयुष्यातील कठीण प्रसंगांची आठवण सांगितली.

शरदचंद्र पवार यांनी योग्य वेळी आशीर्वाद आणि आसरा दिला नसता, तर आपण राजकारणाच्या पडद्यामागे फेकले गेलो असतो. काही काळ आपण ‘ब्रेकवर’ होतो; मात्र पवारांनी पुन्हा राजकीय प्रवाहात आणले, अशा भावना खडसे यांनी व्यक्त केल्या.

प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांच्यासोबतच्या मैत्रीच्या आणि संघर्षाच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला.

(ads)

‘आजच्या राजकारणाकडे पाहून वेदना होतात’


२००० ते २०१४ या काळात महाराष्ट्रात भाजपची सत्ता नसतानाही प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि भाऊसाहेब फुंडकर यांनी पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी मोठे योगदान दिले. त्यांच्या मेहनतीमुळेच आज भाजपला चांगले दिवस पाहता येत आहेत, असे खडसे यांनी सांगितले.


महाजन-मुंडे यांच्या काळातील राजकारण आणि आजच्या राजकारणात मोठा फरक पडला आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहून वेदना होतात, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

(ads)

पुत्राच्या निधनाची आठवण सांगताना नाथाभाऊ भावुक

आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या दुःखाचा, म्हणजेच पुत्राच्या निधनाचा उल्लेख करताना खडसे भावुक झाले. या कठीण प्रसंगी कुटुंबीय, कार्यकर्ते आणि जनतेने दिलेल्या खंबीर साथीमुळेच आपण पुन्हा उभे राहू शकलो, असे त्यांनी सांगितले.

आजवर जनतेने दिलेल्या प्रेम, विश्वास आणि पाठिंब्याबद्दल त्यांनी मनापासून कृतज्ञता व्यक्त केली.

(ads)

पंकजा मुंडेंचा व्हिडिओ संदेश; भोरगाव लेवा पंचायतीतर्फे विशेष सत्कार


पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे एकनाथराव खडसे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

ह.भ.प. विशाल महाराज खोले यांनी अमृत महोत्सव समितीतर्फे देण्यात आलेल्या सन्मानचिन्हाचे वाचन केले.

भोरगाव लेवा पंचायत, ठाया पाडळसे यांच्या वतीने पंचायतीचे कुटुंबनायक ललित पाटील आणि इतर सदस्यांनी एकनाथराव खडसे यांचा विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरव केला.

माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा शुभेच्छा संदेश वाचून दाखविला.

(ads)

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी केले. खडसे यांच्या सुमारे चार दशकांच्या राजकीय आणि सामाजिक प्रवासाचा आढावा घेत हा सोहळा कोणत्याही राजकीय हेतूने नव्हे, तर त्यांच्या प्रदीर्घ कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या शेवटी अमृत महोत्सव समितीचे सचिव प्रा. डॉ. सुनील नेवे यांनी उपस्थित मान्यवर, नागरिक, कार्यकर्ते आणि खडसे समर्थकांचे आभार मानले.

(ads)

हजारोंच्या उपस्थितीने कोथळी दुमदुमले


या अमृत महोत्सव सोहळ्यास जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विविध भागांतून हजारो नागरिक, कार्यकर्ते, समर्थक आणि खडसेप्रेमी उपस्थित होते.

सर्वपक्षीय दिग्गजांची उपस्थिती, जुन्या राजकीय मैत्रीच्या आठवणी, शरद पवारांकडून झालेला खडसेंच्या योगदानाचा गौरव आणि नाथाभाऊंच्या भावनिक मनोगतामुळे कोथळी येथील अमृत महोत्सव सोहळा केवळ वाढदिवसाचा कार्यक्रम न राहता महाराष्ट्राच्या राजकीय प्रवासातील आठवणींना उजाळा देणारा ऐतिहासिक सोहळा ठरला.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!