श्रीक्षेत्र कोथळी (मुक्ताईनगर) येथे अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय सांगता; आदरणीय नाथाभाऊ खडसे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त भव्य लाडू तुला व महाप्रसाद सोहळा संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


मुक्ताईनगर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : श्रीक्षेत्र कोथळी (मुक्ताईनगर) येथे गेल्या आठवडाभरापासून अत्यंत भक्तिमय वातावरणात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह, संगीत श्री संत मुक्ताई चरित्र तसेच संगीत श्रीमद् भागवत कथा संकीर्तन ज्ञानयज्ञ सोहळ्याची आज, बुधवार दि. २ सप्टेंबर रोजी उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात सांगता झाली. महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ लोकनेते, माजी मंत्री तथा विद्यमान आमदार आदरणीय श्री. एकनाथरावजी खडसे (नाथाभाऊ) यांच्या अमृत महोत्सवानिमित्त, त्यांच्या ७५ व्या वर्षात पदार्पणाचा औचित्य साधून या भव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

(ads)

गेल्या सप्ताहभरापासून श्रीक्षेत्र कोथळी येथे विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांमुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. अखंड हरिनाम सप्ताह, संगीत श्री संत मुक्ताई चरित्र तसेच संगीत श्रीमद् भागवत कथा संकीर्तन ज्ञानयज्ञाच्या माध्यमातून संतपरंपरा, भक्ती, अध्यात्म आणि वारकरी संस्कृतीचा जागर करण्यात आला. या संपूर्ण सप्ताहात परिसरातील तसेच दूरवरून आलेल्या भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेतला.

(ads)

सांगता सोहळ्याच्या अंतिम दिवशी श्री संत मुक्ताई फडाचे गादीपती तथा श्री संत मुक्ताई दिंडी सोहळ्याचे प्रमुख ह.भ.प. श्री. रवींद्र महाराज हरणे, श्रीक्षेत्र मुक्ताईनगर, यांचे काल्याचे प्रबोधनात्मक व रसाळ कीर्तन संपन्न झाले. आपल्या कीर्तनातून त्यांनी भगवान श्रीकृष्णाच्या बाललीला, गोपाळकाला तसेच भक्ती, संस्कार आणि आध्यात्मिक मूल्यांचे प्रभावी निरूपण केले. त्यांच्या रसाळ व ओघवत्या वाणीने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. कीर्तनादरम्यान संपूर्ण कोथळी परिसर विठ्ठल-रखुमाई तसेच आई मुक्ताईच्या जयघोषाने दुमदुमून गेला.

(ads)

यावेळी ह.भ.प. रवींद्र महाराज हरणे यांनी आदरणीय नाथाभाऊ खडसे यांच्या श्री संत मुक्ताईप्रती असलेल्या निस्सीम भक्तीचा विशेष उल्लेख केला. नाथाभाऊ यांनी आपल्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात श्री संत मुक्ताईंची सेवा आणि कार्याला सदैव प्राधान्य दिले असून, त्यांच्या माध्यमातून मुक्ताईनगरच्या धार्मिक व सांस्कृतिक वैभवात मोलाची भर पडल्याचे त्यांनी सांगितले.

(ads)

आदिशक्ती संत मुक्ताई यांच्या अंतर्धान सोहळ्याच्या वेळी पंढरपूर येथून परमात्मा पांडुरंगाच्या पादुका दर्शनासाठी मुक्ताईनगर-कोथळी येथे येण्याची परंपरा सुरू होण्यामागे नाथाभाऊंचे प्रयत्न महत्त्वाचे ठरले. याशिवाय एदलाबादचे ‘मुक्ताईनगर’ असे नामकरण, संत मुक्ताई मंदिराचा जीर्णोद्धार तसेच श्रीक्षेत्र कोथळी-मुक्ताईनगरची चतुःसीमा निश्चित करण्यासह विविध धार्मिक व सामाजिक कार्यात त्यांनी योगदान दिल्याचे महाराजांनी नमूद केले. हे सर्व कार्य आदिशक्ती मुक्ताईप्रती असलेल्या त्यांच्या निस्सीम श्रद्धा व भक्तीचे प्रतीक असल्याचेही त्यांनी सांगितले.

(ads)

आदिशक्ती श्री संत मुक्ताई यांनी आदरणीय नाथाभाऊ खडसे यांना उदंड, निरोगी आणि दीर्घायुष्य प्रदान करावे तसेच त्यांच्या हातून सुरू असलेली आणि भविष्यातील समाजोपयोगी व धार्मिक कार्ये पूर्णत्वास जावीत, अशी मंगलकामना ह.भ.प. रवींद्र महाराज हरणे यांनी यावेळी व्यक्त केली.

(ads)

काल्याच्या कीर्तन सोहळ्यानंतर आदरणीय नाथाभाऊ खडसे यांच्या ७५ व्या वर्षात पदार्पणानिमित्त भव्य लाडू तुला सोहळा मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात संपन्न झाला. यावेळी भव्य तराजूच्या एका पारड्यात आदरणीय नाथाभाऊ खडसे विराजमान झाले, तर दुसऱ्या पारड्यात प्रसादाच्या लाडूंच्या पेट्या ठेवून त्यांची लाडू तुला करण्यात आली. या अनोख्या सोहळ्याला उपस्थित भाविकांनी मोठा प्रतिसाद दिला.

(ads)

या प्रसंगी माहूर येथील श्री रेणुका माता संस्थानच्या वतीने १५१ किलो म्हणजेच सुमारे दीड क्विंटल वजनाचा खारीक व खोबऱ्याचा विशेष हार आणून आदरणीय नाथाभाऊ खडसे यांना अर्पण करण्यात आला. या विशेष हारामुळे सोहळ्याला आणखी एक आगळेवेगळे धार्मिक आणि भक्तिमय स्वरूप प्राप्त झाले.

(ads)

या भव्य सोहळ्यास समस्त खडसे परिवार, सतपंथ आचार्य महामंडलेश्वर पूज्य स्वामी जनार्दन हरीजी महाराज तसेच ‘संगीत श्री संत मुक्ताई चरित्र’ कथेचे निरूपणकार ह.भ.प. विशाल महाराज खोले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याशिवाय वारकरी संप्रदायातील साधू-संत, विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील भाविक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(ads)

अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्यामुळे श्रीक्षेत्र कोथळी परिसरात दिवसभर भक्ती, अध्यात्म आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. टाळ-मृदंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि संतवाणीच्या मंगल स्वरांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने काल्याचे कीर्तन, लाडू तुला सोहळा तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेतला.

(ads)

काल्याचे कीर्तन आणि भव्य लाडू तुला सोहळा संपन्न झाल्यानंतर उपस्थित हजारो भाविक, ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांना काल्याचा तसेच लाडूंचा महाप्रसाद वितरित करण्यात आला. भक्तिभाव, सामाजिक एकोपा आणि संतपरंपरेचा जागर घडविणाऱ्या या सोहळ्याची सांगता अत्यंत उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात झाली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!