चिनावल ता.रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा)
येथील भीम ज्योती बुद्ध विहार येथे भाद्रपद पौर्णिमेच्या पावन पर्वावर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे अत्यंत मंगलमय वातावरणात आयोजन करण्यात आले. याप्रसंगी सकाळी सूत्रपठण, अष्टशील ग्रहण ध्वजारोहण, तर संध्याकाळी परित्रान पाठ, खीरदान आणि धम्मदेशना असे विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले.
कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून नागपूर येथील पूजनीय भदंत नागवंश महाथेरो यांची वंदनीय उपस्थिती लाभली. त्यांनी उपस्थितांना अत्यंत सुंदर आणि सविस्तर धम्मदेशना दिली. भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व सांगताना ते म्हणाले की, बुद्ध धम्म ही केवळ कर्मकांडाची पद्धत नसून मानवी जीवनाला सन्मार्गावर नेणारी आचारसंहिता आहे. या कार्यक्रमाला चिनावल व परिसरातील धम्म उपासक आणि उपासिकांची अथांग उपस्थिती लाभली होती.
समाजात वैचारिक परिवर्तन
चिनावल येथील धम्म उपासक व उपासिकांमध्ये आज मोठे वैचारिक परिवर्तन घडताना दिसत आहे. संपूर्ण समाज धम्माच्या मार्गावर आरूढ होत असून घरोघरी परित्रान पाठ, मंगल कार्ये आणि तथागत बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची सहर्ष प्रतिष्ठापना केली जात आहे.
उपासाकांना विहारात उपस्थित राहण्याचे आवाहन
पवित्र वर्षावासाचे आता केवळ ३० दिवस शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर भीम ज्योती बुद्ध विहाराचे अध्यक्ष आयुष्यमान संजय भालेराव, समिती सदस्य व उपासक-उपासिका संघाच्या वतीने सर्व धम्मप्रेमींना आग्रहाचे आवाहन करण्यात आले आहे. उरलेल्या दिवसांत दररोज सकाळी ६:०० वाजता वंदनेसाठी आणि सायंकाळी ठीक ७:०० वाजता धम्मदेशनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने बुद्ध विहारात उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


