चिनावल (प्रतिनिधी):
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुरोगामी आणि वैज्ञानिक विचारधारेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करत रावेर तालुक्यातील चिनावल नगरीत एक अत्यंत ऐतिहासिक आणि प्रबोधनात्मक घटना घडली आहे. येथील प्रसिद्ध समाजसेवक श्री. संजय मधुकर भालेराव यांच्या कुटुंबाने वर्षानुवर्षे चालत आलेली 'मुंजे' बसवण्याची परंपरा कायमची बंद केली आहे. कुटुंबाने घरातील देवारा पूजनीय भदंत नागवंश महाथेरो यांच्या स्वाधीन करत, त्यातील सोन्या-चांदीचे दागिने मोडून आलेली १४,५०० रुपयांची संपूर्ण रक्कम बुद्ध विहाराला दान केली.
(ads)
वर्षावासाने घडवले वैचारिक परिवर्तन
भालेराव कुटुंबात २०१० पासूनच संजय भालेराव व त्यांच्या पत्नी सौ. ज्योती भालेराव यांनी कर्मकांडाला विरोध दर्शवला होता. २०२२ मध्ये चिनावल येथे संजय भालेराव यांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या बुद्ध विहारात पूजनीय भदंत नागवंश महाथेरो (नागपूर) यांच्या उपस्थितीत पहिला वर्षावास संपन्न झाला. या वर्षावासामुळे संपूर्ण परिसरात धम्ममय वातावरण तयार झाले. लहान बंधू संतोष भालेराव यांच्या पत्नी सौ. मीनाताई भालेराव यांनीही उपवास व देव-देवतांच्या भ्रामक संकल्पना सोडून स्वतःला धम्मकार्यात झोकून दिले.
(ads)
'परित्राण पाठ' कार्यक्रमात ऐतिहासिक निर्णय
शुक्रवार, ११ सप्टेंबर २०२६ रोजी लहान बंधू संतोष भालेराव यांच्या घरी आयोजित 'परित्राण पाठ' प्रसंगी संजय भालेराव यांच्या आग्रहास्तव वडील श्री. मधुकर काशीराम भालेराव व आई सौ. सुपडाबाई भालेराव यांनी विचारांची नवी दिशा स्वीकारत देवारा भंतेजींच्या स्वाधीन केला. भंतेजींच्या सूचनेनुसार शनिवार, १२ सप्टेंबर रोजी सौ. ज्योती भालेराव व सौ. सारिका भालेराव यांनी ते दागिने सोनाराकडे मोडून मिळालेली १४,५०० रुपयांची रक्कम बुद्ध विहाराच्या बांधकामासाठी व धम्मप्रचारासाठी सुपूर्द केली.
(ads)
परिसरात परिवर्तनाची लाट
या क्रांतिकारी निर्णयाची प्रेरणा घेत शेजारी राहणाऱ्या सौ. कमलाबाई भालेराव यांनीही तात्काळ घरातील देव काढून भंतेजींकडे सोपवले व त्याचीही मोड विहाराला दान केली. बुद्ध विहारामध्ये संपूर्ण भालेराव कुटुंबाचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला व भंतेजींनी त्यांना पंचशील दिले.
"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला समाज हाच आहे, जो अंधश्रद्धा व रूढी-परंपरांचा त्याग करून बुद्ध धम्माच्या प्रज्ञा आणि विज्ञानाच्या मार्गावर चालतो. भालेराव कुटुंबाचे हे पाऊल संपूर्ण समाजासाठी दिशादर्शक आहे."
> — पुजनीय भदंत नागवंश महाथेरो
(ads)
"आमच्या पंचक्रोशीत असे परिवर्तन पहिल्यांदाच घडले आहे. भदंत नागवंश महाथेरो यांच्या वर्षावासामुळे आमचा परिसर धम्ममय झाला असून, आज खऱ्या अर्थाने बौद्ध झाल्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटत आहे."
> — संजय मधुकर भालेराव (समाजसेवक, चिनावल)
भालेराव कुटुंबाच्या या धाडसी आणि सामाजिक क्रांती घडवणाऱ्या निर्णयाचे चिनावलसह संपूर्ण रावेर तालुक्यात जोरदार स्वागत व कौतुक होत आहे.


