यावल तालुक्यात तणावाचे वातावरण, निष्पक्ष चौकशीच्या मागणीसाठी मोठ्या जनसमर्थनाचे आवाहन
यावल ( सुरेश पाटील)
यावल तालुक्यातील किनगाव येथे २५ ऑक्टोबर रोजी घडलेल्या दंगल प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणात अन्याय झालेल्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली असून, यावल पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या शमीभा पाटील तडवी यांनी या आंदोलनाचा पुढाकार घेतला आहे.त्यांच्या वतीने तालुक्यातील सर्व सामाजिक कार्यकर्ते, मुस्लिम बांधव,आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अनुयायी यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आज सकाळी यावल पोलीस स्टेशन समोर झालेल्या छोटेखानी सभेत या आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली.
आंदोलनाच्या प्रमुख तीन मागण्या १) न्याय मिळावा: किनगाव प्रकरणात अन्याय झालेल्या आदिवासी, मुस्लिम व इतर समाजातील पीडित व्यक्तींना तात्काळ न्याय मिळावा.
२) निष्पापांवर कारवाई नको: कोणत्याही निष्पाप व्यक्तीवर खोटा गुन्हा दाखल होऊ नये आणि कोणावरही अन्याय होऊ नये.
३) पारदर्शक चौकशी: संपूर्ण दंगल प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी.
या उपोषणासाठी डॉ.चांद तडवी यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत. हे आंदोलन पूर्णपणे शांततेच्या, सामाजिक सलोख्याच्या आणि कायद्याचा सन्मान राखत लोकशाही मार्गाने होणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, दि.२५ ऑक्टोबर रोजी किनगाव येथे RSS च्या मिरवणुकीला विरोध झाल्यानंतर वाद निर्माण झाला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला होता. तेव्हापासून या घटनेने तालुक्यात मोठी चर्चा निर्माण झाली असून, आता या घटनेचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत.
वंचित बहुजन आघाडीच्या या आक्रमक पवित्र्यामुळे यावल तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता या आमरण उपोषणाच्या आवाहनाला तालुक्यातून किती प्रतिसाद मिळतो आणि पोलीस प्रशासन काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण यावल तालुक्याचे लक्ष लागले आहे.


