संभाव्य पाणी टंचाईचे संकट यावल नगराध्यक्षांचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला साकडे

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


पाणीपुरवठा योजनेचे ५० टक्के काम पूर्ण उर्वरित निधीसाठी नगराध्यक्षांचा पाठपुरावा सुरू

यावल  (सुरेश पाटील)

यावल शहरातील नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी सुरू असलेल्या शेळगाव बॅरेज येथून यावल शहराला पाणीपुरवठा करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेचे उर्वरित काम तातडीने पूर्ण होणे आवश्यक आहे.मात्र या योजनेचे काम सुमारे ५० टक्के पूर्ण झाले असून उर्वरित कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध होण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

भविष्यात उद्भवणारी संभाव्य पाणीटंचाई आणि राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता यावल नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. छायाताई अतुल पाटील यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे.

(ads)

यासंदर्भात त्यांनी दि. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी जळगाव यांना अधिकृत पत्र देऊन महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत सुरू असलेल्या शेळगाव बॅरेज पाणीपुरवठा योजनेचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासनाकडे सकारात्मक शिफारस करण्याची मागणी केली आहे.

(ads)

पाणीटंचाईचे संभाव्य संकट ओळखून आतापासूनच खबरदारी समयसूचकता बाळगून यावल नगराध्यक्षांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, यावल शहरातील नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा करणे ही नगरपरिषदेची महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत शेळ गाव बॅरेज येथून पाणीपुरवठा करण्याची योजना सुरू करण्यात आली आहे.सदर योजनेचे काम सध्या सुमारे ५० टक्के पूर्ण झाले असून उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध होणे अत्यंत गरजेचे आहे.

(ads)

राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आगामी काळात यावल शहरातही पाणीटंचाईचे गंभीर संकट निर्माण होण्याची शक्यता दिलेल्या पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे.सध्या शहराचा पाणीपुरवठा हतनूर धरणातील उपलब्ध पाणीसाठ्यावर अवलंबून असल्याने भविष्यातील पाणी उपलब्धतेबाबत अनिश्चितता निर्माण होऊ शकते, अशी चिंता नगराध्यक्षांनी व्यक्त केली आहे.


विशेष म्हणजे,धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करता आगामी काळात पाण्याचे आवर्तन मिळण्याबाबत अनिश्चितता निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत यावल शहरातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.त्यामुळे पर्यायी आणि अधिक सक्षम पाणीपुरवठा व्यवस्था निर्माण करण्यासाठी शेळगाव बॅरेज येथून सुरू असलेली योजना लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे असल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

(ads)

५० टक्के काम पूर्ण; उर्वरित कामासाठी निधीचा प्रश्न महत्त्वाचा --

यावल शहराच्या दीर्घकालीन पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने ही योजना महत्त्वपूर्ण मानली जात आहे.मात्र योजनेचे अर्धे काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध होणे हा आता महत्त्वाचा विषय बनला आहे. ही योजना वेळेत पूर्ण झाल्यास यावल शहराच्या पाणीपुरवठ्यावरील विद्यमान ताण कमी होण्यास मदत होईल. तसेच भविष्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या काळात नागरिकांना दिलासा मिळू शकतो,असा विश्वास नगराध्यक्षांनी व्यक्त केला आहे.

त्यामुळे या योजनेचे उर्वरित काम तांत्रिक व प्रशासकीय कारणांमुळे रखडू नये,यासाठी शासनस्तरावर आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही तातडीने व्हावी,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

(ads)

जिल्हाधिकाऱ्यांकडे सकारात्मक शिफारशीची मागणी

नगराध्यक्ष सौ.छायाताई अतुल पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात यावल शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाईचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य शासनाकडे आवश्यक निधीसाठी सकारात्मक व तातडीची शिफारस करण्याची विनंती केली आहे.


योजनेसाठी आवश्यक निधी वेळेत उपलब्ध झाल्यास उर्वरित काम पूर्ण करून यावल शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची पुरेशी उपलब्धता करून देणे शक्य होईल. त्यामुळे भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी या योजनेला प्राधान्य देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

(ads)

आता जिल्हा प्रशासन आणि शासन काय भूमिका घेणार?

यावल शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न हा केवळ आजचा विषय नसून आगामी अनेक वर्षांच्या नागरी गरजांशी निगडित आहे. वाढती लोकसंख्या,पाण्याची वाढती मागणी आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे पाणीपुरवठ्याचे नियोजन अधिक सक्षम करणे आवश्यक झाले आहे.

अशा परिस्थितीत शेळगाव बॅरेज पाणीपुरवठा योजना अर्धवट राहणे परवडणारे नाही. नगराध्यक्षांनी निधीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकृत पत्राद्वारे मागणी केली असताना जिल्हा प्रशासन या विषयाला किती गांभीर्याने घेते आणि राज्य शासनाकडे किती तत्परतेने पाठपुरावा केला जाईल किंवा राजकारणामुळे कडे दुर्लक्ष होईल का.? याकडे आता यावलकरांचे लक्ष लागले आहे.

(ads)

यावलकरांचा थेट सवाल असा की,पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत प्रश्नासाठी नागरिकांनी आणखी किती काळ प्रतीक्षा करायची ? ५० टक्के काम पूर्ण झालेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेचे उर्वरित काम निधीअभावी रखडणार तर नाही ना ? संभाव्य पाणीटंचाईचे संकट येण्यापूर्वीच शासन आणि प्रशासन आवश्यक निधी उपलब्ध करून देणार का ?

आता केवळ पत्रव्यवहार न होता प्रत्यक्ष निधी उपलब्ध होऊन योजनेचे उर्वरित काम वेगाने पूर्ण होणे हीच यावलकरांची अपेक्षा आहे.

पाणीप्रश्नावर वेळीच उपाययोजना झाली तरच भविष्यातील संभाव्य संकट टाळता येईल.त्यामुळे शेलगाव बॅरेज पाणीपुरवठा योजनेला निधी देऊन ती लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शासनाने ठोस निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे.