यावलमध्ये अंत्ययात्रा अडवून जातीवाचक शिवीगाळ व धमकल्याप्रकरणी कठोर कायदेशीर कारवाईची मागणी; मेहतर समाज आक्रमक

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल (सुरेश पाटील) :

यावल शहरातील श्रीराम नगर परिसरातील अनुसूचित जातीतील मेहेतर समाजाच्या महिलेच्या अंत्ययात्रेला नगीना परिसरातील मुख्य रस्त्यावर अडथळा निर्माण करून वाद्य बंद करण्यास भाग पाडल्याचा तसेच जातिवाचक शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे यावल शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधितांवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह भारतीय न्याय संहितेतील कठोर कलमांनुसार तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी मेहतर समाजाकडून करण्यात आली आहे.

(ads)

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, १७ नोव्हेंबर २०२६ रोजी श्रीराम नगर, यावल येथील स्वर्गीय कमलाबाई सुधाकर घारू यांचे निधन झाले. त्यानंतर १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता धार्मिक परंपरेनुसार वाजतगाजत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. ही अंत्ययात्रा नगीना परिसरातील मुख्य रस्त्यावर पोहोचली असता, मशिदीच्या ट्रस्टचे अध्यक्ष, सभासद तसेच परिसरातील १० ते १५ जणांच्या समूहाने अंत्ययात्रा अडविल्याचा आरोप करण्यात आला आहे.

(ads)

यावेळी "वाद्य बंद करा, तरच पुढे जा," असे सांगून अंत्ययात्रा रोखण्यात आली व वाद्य बंद करण्यास भाग पाडण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच संबंधितांकडून जातिवाचक अपशब्द वापरण्यात आल्याचा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे अंत्ययात्रेत सहभागी कुटुंबीय, नातेवाईक आणि समाजबांधवांना मानसिक त्रास व अपमान सहन करावा लागल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे.

(ads)

ॲट्रॉसिटी कायद्यासह BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

याप्रकरणी तक्रारदार शितलकुमार युवराज घारू यांनी यावल पोलीस स्टेशनमध्ये सविस्तर अर्ज सादर केला आहे. संबंधितांवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ मधील कलम ३(१)(r), ३(१)(s), ३(१)(za)(A) तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२६ आणि ३५१ अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

(ads)

याशिवाय, घटनास्थळी उपस्थित असलेल्या सर्व व्यक्तींची ओळख पटवून त्यांची भूमिका तपासावी, मशिदी परिसरातील दुकाने तसेच नगरपालिकेचे सीसीटीव्ही फुटेज तातडीने ताब्यात घेऊन पुरावे संकलित करावेत, अशी मागणीही अर्जाद्वारे करण्यात आली आहे.

अंत्ययात्रा व धार्मिक मिरवणुका रोखण्याचे प्रकार थांबवा!

यावल शहरात सार्वजनिक रस्त्यांवरून जाणाऱ्या अंत्ययात्रा आणि विविध धार्मिक मिरवणुकांच्या वेळी धार्मिक स्थळांजवळ वाद्य बंद करण्यासाठी दबाव टाकणे, धमकावणे अथवा मार्ग अडविण्याचे प्रकार घडत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. सार्वजनिक रस्त्यांचा वापर करण्याचा अधिकार सर्व नागरिकांना असून, कोणत्याही समाजाच्या अंत्ययात्रेला किंवा कायदेशीर मिरवणुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.

(ads)

पोलीस प्रशासनाच्या भूमिकेकडे शहराचे लक्ष

या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित ट्रस्टी, प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित व्यक्ती आणि दोषींवर निष्पक्ष चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी योग्य पोलीस बंदोबस्त आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

काही नागरिकांनी संबंधित भागातील पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत निष्पक्ष कारवाईची मागणी केली असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी भूमिका मांडली आहे.

(ads)

दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासून पोलीस प्रशासन काय भूमिका घेते आणि संबंधितांवर कोणती कायदेशीर कारवाई होते, याकडे संपूर्ण यावल शहराचे लक्ष लागले आहे. कायद्यापुढे सर्व समान असून, जातीय तेढ निर्माण करणाऱ्या आणि सार्वजनिक शांततेला बाधा आणणाऱ्या कोणत्याही कृत्यावर निष्पक्ष कारवाई व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.