कोरोनामुक्त गावांतील 8 वी ते 12 वीच्या शाळा सुरू होणार; शिक्षण व आरोग्य विभागाने समन्वयातून करावे नियोजन – पालकमंत्री छगन भुजबळ

अनामित
नाशिक ‘चला मुलांनो, शाळेत चला’ या मोहिमेअंतर्गत राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यातील 335 कोरोनामुक्त गावांतील 8 वी ते 12 वीच्या शाळा सोमवार पासून सुरू होणार आहेत. या शाळा सुरू करतांना शिक्षण व आरोग्य विभागाने गावपातळीवर समन्वयाने नियोजन करून राज्य शासनाने सांगितलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात यावे, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
[ads id='ads1]
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थिती आणि कोरोना पश्चात आजारांबाबत आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय्, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, निलेश श्रींगी, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसिकर, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, म्युकर मायकोसिस टास्क फोर्सचे डॉ. संजय गांगुर्डे, लसीकरण नोडल अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, राज्य शासनाच्या शाळा सुरू करण्याबाबतच्या सूचनांनुसार ग्रामीण भागातील ज्या गावांत मागील एक महिन्यात एकही कोरोनाबाधित रूग्ण आढळून आलेला नाही, अशा गावांतील 8 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा ‘चला मुलांनो शाळेत चला’ (बॅक टू स्कुल) या मोहिमेंतर्गत सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली. या अनुषंगाने ज्या कोरोनामुक्त गावांत शाळा सुरू करण्यात येणार आहेत, तेथे शिक्षण व आरोग्य विभाग तसेच संबंधित ग्रामपंचायतींनी शाळा स्वच्छता व शाळेचे निर्जंतुकीकरण, विद्यार्थ्यांसाठी मास्क, वर्गात विद्यार्थ्यांमधील सुरक्षित अंतर, पिण्याचे पाणी आदी सुविधा उपलब्ध करण्यावर भर देण्यात यावा. त्याचप्रमाणे आरोग्य व शिक्षण विभागाने शाळा सुरू होणार असलेल्या शाळांतील शिक्षकांची आरटीपीआर तपासणी करून घ्यावी. तसेच राज्य शासनाच्या सुचनांप्रमाणे दर सोमवारी कोरोनामुक्त गावांची यादी देखील प्रसिद्ध करावी. तसेच दिलेल्या निर्देशांनुसार आवश्यक ती सर्व कार्यवाही करून शाळा सुरू करण्यात याव्यात, अशा सूचना पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी दिल्या आहेत.
[ads id='ads2]
आपल्या जिल्ह्यातील कोरोनामुक्त 335 गावांतील शाळांमध्ये साधारण एक लाख 31 हजार 159 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 42 हजार 840 पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी लेखी संमती कळविली आहे, असेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.

पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले, संभाव्य तिसरी लाट येण्याचा कालावधी निश्चित नाही, अशा परिस्थितीत आरोग्याच्या काळजीसोबतच आर्थिकचक्र सुरू राहणे देखील महत्वाचे आहे. त्याअनुषंगाने लागू करण्यात आलेले निर्बंधांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. कोरोनाचे संकट टळलेले नसून नागरिकांची देखील जबाबदारी वाढली असल्याने त्यांनी अनावश्यक गर्दी टाळणे, नियमित मास्कचा वापर करून कोरोनाच्या नियमांचे पालन करणेही अत्यावश्यक आहे. जिल्हा प्रशासन, आरोग्य व पोलिस यंत्रणा रात्रंदिवस नागरिकांचे दैनंदिन जीवन सुरळीत होण्यासाठी त्यांच्या सुरक्षिततेसाठी मेहनत घेत आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याने नागरिकांनी प्रशासनला नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन देखील पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी केले आहे.

यावर्षी पावसाचे प्रमाणे आवश्यकतेपेक्षा कमी असल्याने कोरोना काळात पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी प्रशासनाने स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेवून शेवटपर्यंत पाणी पुरेल यादृष्टिने नियोजन करावे, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.

जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थिती व त्याबाबत करणयत येणाऱ्या उपाय योजनांची माहिती देतांना जिल्हाधिकारी श्री. मांढरे म्हणाले की, मागील एक ते दिड महिन्यात जिल्ह्यातील रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी झाली असून जिल्ह्याचा पॉझिटीव्हिटी दर 2.2 टक्के झाला असून जिल्ह्याचा मृत्यूदर राज्याच्या तुलनेत कमी आहे. आतापर्यंत जिल्ह्यात साधारण 3 लाख 79 हजार लोकांना लसीकरणाचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. तसेच लसीकरणाबाबत जसा पुरवठा होत आहे त्यानुसार लसीकरण सुरू आहे. त्याचप्रमाणे शासनाने ठरवून दिलेल्या ऑक्सिजन निर्मीतीच्या उद्दीष्टापूर्तीसाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ते नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती यावेळी दिली.
या बैठकीस महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस यंत्रणा तसेच आरोग्य विभाग यांच्यामार्फत करण्यात आलेल्या कामांची व पुढील नियोजनाची माहिती पालकमंत्री यांना सादर केली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!