अलिबाग,जि.रायगड, गेल्या वर्षभरापासून करोना विषाणूने शहरी, ग्रामीण भागात शिरकाव केला होता. परंतु या विषाणूस वाघोली आदिवासी वाडीमध्ये " नो एंट्री " आहे. या आदिवासी वाडीमध्ये गेल्या 16 महिन्यांमध्ये एकही कोरोना रुग्ण सापडलेला नाही, अशी माहिती वाघोली येथील आरोग्य उपकेंद्राचे सामाजिक आरोग्य अधिकारी डॉ.अनिकेत म्हात्रे यांनी दिली आहे.
या आदिवासी वाडीत जवळपास 60 घरे असून वाडीत कटाक्षाने स्वच्छता पाळली जाते. येथील नागरिकांचे राहणीमान उंचावलेले आहे. शिवाय आरोग्य विषयक सर्व नियम काटेकारेपणे पाळले जातात. या आदिवासी वाडीस डॉ.अनिकेत म्हात्रे तसेच आशा वर्कर सौ.प्रतिभा पाटील, अंगणवाडी सेविका नियमितपणे भेट देऊन येथील नागरिकांची आरोग्यविषयक तपासणी करतात. या आदिवासी वाडीत अद्यापपर्यंत एकही करोना रुग्ण सापडलेला नाही.
या उपकेंद्राच्या क्षेत्रात वाघोली, वाघोली (आदिवासी वाडी), सिद्धार्थ नगर( वाघोली), विरवाडी, सुतारपाडा, कामार्ले, लोणघर, भायमळा, बहिरमपाडा, गाण तर्फे श्रीगाव, गाण तर्फे परहूर, खिडकी, लेभी, कोपर, तिनविरा या गावांना आरोग्य विषयक सुविधा मिळत असून येथे लसीकरण सुविधाही कार्यान्वित आहे. या उपकेंद्रातून 45 वयोगटापुढील 1 हजार 262 नागरिकांचे लसीकरण झाले आहे, अशी माहिती या आरोग्य उपकेंद्राचे सामाजिक आरोग्य अधिकारी डॉ.अनिकेत म्हात्रे यांनी दिली आहे.
या आरोग्य उप केंद्रास नुकतीच कुलाबा वैभव साप्ताहिकाचे संपादक बळवंत वालेकर, कामार्ले ग्रामपंचायत सरपंच राजन गिरी, पंचायत सदस्य दिनेश वालेकर यांनी भेट दिली.