कष्टकऱ्यांच्या व्यथा आणि वेदनांनी डबडबलेला..
यावल (प्रतिनिधी हसन तडवी) रानमेवा कथा संग्रह नुकताच लेखक कवि रमजान गुलाब तडवी प्रकाशित झाला, गाव, शिवार, निसर्ग, रान, शेतमजूर, शेतकरी, कृषीसंस्कृती यांचे भावजीवन चितारलेल्या ११ तडवी भिल बोलीतल्या कथांचा मराठीतून यात अनुवाद केला आहे, तडवी भिल बोली व संस्कृती संरक्षण व संवर्धन करण्याचा दुहेरी हेतू साध्य झाला आहे तसेच मराठी वाचक डोळ्यांसमोर ठेवून मराठी भाषाही वापरली आहे, ग्रामीण जीवन व निसर्गाशी समरस झालेला हा रानमेवा कथासंग्रह वाचून यवतमाळचे साहित्यिक श्री.बाबाराव मडावी, यांनी त्याची पुढीलप्रमाणे समिक्षा केलेली आहे.
[ads id='ads1]
रमजान तडवी यांचा रानमेवा कथासंग्रह कुमुद पब्लिकेशन्सने प्रकाशित केला. रमजान गुलाब तडवी हे भिल्ल तडवी जमातीतील एम.ए. सेट, नेट झालेले उच्च शिक्षित साहित्यिक आहेत. त्यांचे यापूर्वी अनुभूती मराठी काव्यसंग्रह, बितेल बाता -१,२ तडवी बोलीतील आत्मकथनात्मक काव्यसंग्रह, कल्पना आणि वास्तव मराठी ललीत लेख संग्रह इत्यादी पुस्तके प्रकाशित असून, आकाशवाणी, युट्युब, त्रैमासिक व वृत्तपत्रात त्यांच्या कथा आल्या आहेत. रमजान गुलाब तडवी हे ग्रामीण व्यवस्थेची नाळ आपल्या ह्रदयात जोपासून आहेत, त्यामुळे त्यांच्या रानमेवा कथासंग्रहातील कथा श्रमीकांचे प्रतिनिधित्व करतात. या कथा संग्रहात एकूण ११ कथा भिल्ल तडवी बोली भाषेत व मराठी भाषेत लिहिल्या आहेत.
शेतात, रानावनात राबणाऱ्या माणसांच्या समस्या त्यांच्या वेदना रमजान तडवींनी प्रत्येक कथेत हुबेहुब व्यक्त केल्या आहेत. त्यांची कुदरत तडवी भाषेत व मराठी भाषेतली निसर्गचक्र या कथेत शेतात राबणाऱ्या शेतमजुरांचे पावसाच्या दिवसातील वर्णन केलं आहे. जमिनीत बी टाकून धान्य उगवणारी ही माणसं उपाशी पोटी धडपड करतांना दिसतात. कथा लेखकाने वापरलेले पेरना, कमावना, खाना आणि नतंर हातात कवडीही शिल्लक नाही राहात असे शब्द कथालेखकाने सहजतेने वापरले. पावसाचे येणे ते लहरी असून निसर्गाच्या विरोधात माणसांना जाता येत नाही. निंदणाचे काम करणारे मजूर जास्त पाऊस आल्यामुळे काम सोडून घरी परततात, कशा प्रकारचं मनाला चटका लावणारं वर्णन मजुरांच्या समस्येचं वर्णन कथेत आढळून येतं.
[ads id='ads2]
मुक्ती या कथेत तिघे तरुण दारिद्र्यात जीवन जगतात, त्यातील एकाला नोकरी लागते, दुसरा तरुण शेताशिवारात काम करतो आणि तिसरा तरुण मात्र दारिद्र्य सहन न झाल्यामुळे व्यसनांच्या आहारी जातो आणि शेवटी गळफास लावून जीवनातून मुक्ती मिळवतो. हसनूर भाभी या कथेत तिच्या वाट्याला विधवेचं जीवन येते, तिची मुलं आश्रम शाळेत शिकतात.काट्याकुट्यांचा तिचा संसार चुलीच्या जाळावर भाजून निघायचा, दारिद्र्याचे चटके सहन करीत तिचे आयुष्य पेटायचे. जंगलच्या वाटा वाट्याला आलेल्या आणि शेवटी कष्टाळू हसनूर भाभी गाव सोडून भावाबरोबर निघून जाते. ही घटना लेखकाच्या ह्रदयात घर करुन बसलेली तिच्या समस्या कथेत हुबेहुब साकारल्या.
पाहूणचाराची वाट या रोचक कथेत असामान्य धोरण स्विकारुन जगणाऱ्या मोठेबाबाची व्यथा चितारली आहे. मोठेबाबा जंगलातून वनफुले वेचून आणून त्यावर गुजराण करायचे ते अत्यंत हाडकुळे असल्यामुळे जंगलातील वाघाने त्यांना खाणे पसंत न करता सोडून दिले. विस्मयकारक प्रसंगांची मांडणी धक्का देऊन जाते. त्याचप्रमाणे मुक्काम या कथेत परतीच्या प्रवासात गावाकडचे मजूर यांचे खरमरीत वर्णन आले आहे. त्यातील फुंदाबाई गावात उशीरा दुसऱ्या दिवशी पोहचते, ती पावरी कुटुंबाकडे मुक्काम करते, असे धक्का देणारे प्रसंग कथेत दिसून येतात.
निसर्गाचे वर्णन लेखकाने पिठूर चांदणे या कथेत हुबेहुब उभे केले आहे. रात्रीच्या वेळी कष्ट करणारे बायामाणसे आकाशाकडे पाहून रसभरीत चंद्र आणि तारे यांचे वर्णन करतात. फरिस्ता कहाणीकार या कथेत अधिकारी व कर्मचारी यांचे संबंध कसे असतात हे दाखविले आहे. या कथेत यमदुताचे पात्र काल्पनिकपणे समस्येला जोडून उभे केले आहे.
रमजान गुलाब तडवी यांच्या कथा कष्ट करणाऱ्या, घाम गाळणाऱ्या माणसांच्या वेदनांनी डबडबलेल्या आहेत. प्रत्येक कथेत कथाकार साक्षीदाराच्या भूमिकेत राहून वास्तवतेचा पुरावा देतात. कथा या लघु स्वरुपात असल्यातरी कथेतील प्रसंग वाचकांच्या मनाला चटका लाऊन जातात.
कथासंग्रहातील भिल्ल बोलीभाषेतले शब्द आकर्षक असे आहेत. कथा या राबणाऱ्या माणसांच्या अनुभवावर उभ्या झाल्यामुळे ही माणसं जिकडेतिकडे पाहावयास मिळतात. त्यांच्या शोषणमुक्तीचा हव्यास लेखकाच्या ह्रदयात दिसून येतो. रानमेवा हा कथासंग्रह वाचणीय असाच आहे. रमजान गुलाब तडवी यांच्या साहित्यकृतीस शुभेच्छा !!!