कळवण वार्ताहर (सुशिल कुवर) सुरगाणा तालुक्यातील आमदा पळसन येथिल सेवा निवृत्त शिक्षक श्री. बाळू चौधरी यांनी आपल्या शेतात एस. आर. टी पध्दतीने सगुना राईस टेक्नॉलॉजी म्हणजेच आधुनिक भात शेती बद्दल माहिती देत आहे. सगुना राईस टेक्नॉलॉजी म्हणजे भात लागवड नाही तर भात टोकणी करण्यावर भर दिला. या पद्धतीमध्ये नांगरणी चिखलणी लावणी या पद्धतीचा अवलंब करायचा नाही. एकदा गादीवाफे केल्यावर दहा ते पंधरा वर्ष त्या जमिनीत नांगरणी चिखलणी लावणी करायची नाही.
[ads id='ads1]
भू मातेवर नांगरणीचे अत्याचार न करता जमिनीची धूप थांबवून नैसर्गिक गांडूळ निर्मितीला चालना देऊन जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढून तसेच उत्पादन निश्चित वाढ करून शेतकऱ्याला आनंदी करणारी पीक रचना म्हणजे एस. आर. टी होय. एस. आर. टी म्हणजे काय तर सगुना राईस तंत्र हे भात शेतीशी संबंधित नांगरणी चिखल करून लावणी न करता कायमस्वरूपी गादीवाफ्यावर टोकणी करून भरघोस भात पिकाचे नवे तंत्र आहे या पद्धतीत भात पिकांनंतर थंडीमध्ये पालेभाज्या वाल, कांदा, कोबी, भेंडी, हरभरा, चवळी, मका, सूर्यफूल, गहू त्यानंतर उन्हाळ्यात जानेवारी ते मे मध्ये वैशाखी भुईमूग, भेंडी, सूर्यफूल, सोयाबीन अशी फेरपालट पिके घेऊ शकतो.
एस. आर. टी पद्धतीविषयी शेतकरी काय म्हणतात?
तर या पद्धतीमुळे खिशातून जाणारी मजुरी खूप कमी झाली. वेगवेगळ्या स्थिती मधील शेतातील पिके पहिल्यांदा समाधानाने तृप्त झाले.
शेताकडे दिवसातून एकदा तरी पाहिल्याशिवाय चैन पडत नाही.
दुप्पट किंवा त्यापेक्षा चांगले पीक मिळाले ही स्वप्नात सुद्धा आशा नव्हती. भात लावणीच्या आदल्या दिवशी चिखल करण्यासाठी लागणारे मुबलक पाऊस पाणी चिखलणी करण्यासाठी नांगरणी व लावणी करण्यासाठी माणसं या गोष्टीच्या परावलंबी त्यामुळे उरामध्ये धडकी भरत होती आता या तिघांवर ही अवलंबून राहावे लागत नाही. त्यामुळे या पद्धतीने आता वेळ ही हातात राहते आणि इतर कामे सुलभपणे करता येऊ लागली.
काय आहे S.R.T तंत्राचे वेगळेपणा
एस. आर. टी पद्धतीत वापरलेल्या गादीवाफ्यामुळे भात शेतीच्या मुळाशी प्राणवायूचे सुयोग्य प्रमाण तसेच पुरेसा ओलावा म्हणजेच वापसा राहतो. त्याच्यामुळे दोन रोपांमधील नेमके आणि सुयोग्य अंतर व त्यामुळे प्रत्येक रोपांची संख्या नियंत्रित करता येऊ शकते. अगोदरच्या पिकाची मुळे जमिनीत जागेवरच ठेवल्यामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब चटकन वाढतो परिणामी रोग किड्यांचा त्रास कमी होतो. तसेच विपुल प्रमाणात आपोआप गांडूळ संरचना सुरू होते. पारंपारिक चिखलणी भात लागवड पद्धतीमध्ये अनुरुप बदल करुन हे तंत्र विकसित केले आहेत यामध्ये लावणी ची पद्धत नसल्यामुळे पावसाच्या लहरीपणाचा परिणाम होऊ शकत नाही. म्हणजेच पावसाकडे डोळे लावून बसण्याची व उत्तम लावणी साधण्यासाठी आटापिटा करण्याची पण गरज नाही. तसेच पावसाचा ताण पडल्यास लगेच पिकावर दुष्परिणाम होत नाही. या पीक पद्धतीमध्ये अवकाळी पावसाचा फारसा दुष्परिणाम नाही. उलट फायदा सुद्धा करून घेता येतो.
काय आहे एस.आर. टी तंत्रज्ञानाचे फायदे
नांगरणी, चिखलनी, लावणी न करायला लागल्यामुळे 50 ते 60 टक्के खर्च कमी येतो लावणीचे हे कष्ट वाचल्यामुळे 50% त्रास कमी होतो. अवनी चिखली करताना वाहून जाणाऱ्या सुपीक मातीची धूप 20% वाचेल व पुढच्या पिढीच्या हातात सुपीक जमीन देता येईल एस. आर. टी गादी वाफ्यावरील रोपांची पाने जास्त रुंद व सरळ सूर्यप्रकाश आकाशाकडे झेपावलेली दिसत असल्यामुळे जास्त जैविक भार म्हणजेच जास्त उत्पन्न मिळते. वाढीव उत्पन्नाच्या समानतेची सम पातळीची सीमा गाठण्याची क्षमता या तंत्रामध्ये आहे. एस. आर. टी मध्ये कोळपणी म्हणजे निंदणी करण्याची गरज नाही. त्यामुळे अत्यंत कष्टाचे काम व पुन्हा वरच्या थरातील माती सैल करण्याची म्हणजेच धूप होण्याची संबंधित गोष्टी आपण टाळू शकतो. रासायनिक खतांच्या गरजेचे प्रमाण निम्म्यावर येऊ शकते, यासाठी गादीवाफ्यावर पावसाळ्यातील भातामध्ये सुद्धा शेतात नैसर्गिक गांडुळांची संख्या मोठ्या प्रमाणावर आढळते. याचा अर्थ रोपांच्या बुडाशी गांडूळ खत बनवण्याचे कारखाने आपोआप चालू होते. लावणी मुळे रोपांना होणारी इजा टळू शकल्यामुळे रोग व कीड यांचा त्रास कमी होण्याची शक्यता आहे. तसेच जमिनीमधील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढल्यामुळे वनस्पती स्वतःच्या शरीरात जास्त साखर तयार करतात, त्यामुळे रोग व किडी मुख्य पिकापासून पळून जातात वरील प्रमाणे वनस्पतींनी त्यांच्या शरीरात जास्तीत जास्त साखर तयार केल्यामुळे एस. आर. टी मधील उत्पादने निश्चित जास्त मधुर व रुचकर लागतात. एस. आर. टी मधील जुन्या किंवा अगोदरच्या पिकांची मुळे वाफ्यामध्ये ठेवल्यामुळे मुळांची जाळी तयार होते व त्यामुळे पावसाचा ताण पडला तरी पारंपारिक पद्धती मध्ये चिखलणी केलेल्या जमिनी मध्ये भेगाळत नाही. तसेच ही अगोदरची मुळे पुढील पिकाच्या सेंद्रिय कर्बाचे ची गरज भागवितात व माती मऊ होते. गावोगावी चिखलणी करण्यासाठी लागणाऱ्या व कर्बवायू निर्माण करणाऱ्या हजारो लिटर डिझेलची बचत होईल. तसेच चिखलणी मुळे निर्माण होणाऱ्या मिथेन वायूचे उत्सर्जन टळेल. दोन्ही वायू वैश्विक तापमान वाढीसाठी कारणीभूत आहेत. या पद्धतीमध्ये भात पीक आठ ते दहा दिवस लवकर येते. तसेच दोन पिकांमधील मशागतीचा वेळ वाचून हंगामाचे अति मूल्यवान असे दहा ते पंधरा दिवस हातात मिळतात. एकच शेतात एकामागोमाग तीन पिके घेतल्यामुळे कृषी विकास दरात म्हणजेच जीडीपी मध्ये आमूलाग्र वाढ झालेली दिसेल. कापणीच्या वेळी शेतात पाणी असल्यास कडपे सुकवण्यासाठी शेताच्या बाहेर काढायला लागणे टळू शकते. आपण जमीन नांगरतांना ट्रॅक्टर, पावर टिलर वापरामुळे जमिनीचा 20 ते 30 सेमी पृष्ठभाग पोकळ भुसभुशीत होतो त्याच वेळी त्या खालील भागावर फाळाचे दाब युक्त घर्षणामुळे कडक कठीण स्तर निर्माण होतो. त्यामुळे पावसाचे पाणी भूगर्भात झिरपण्याऐवजी आडवे वाहू लागते. ते खूप नुकसान कारक असते त्यामुळे मातीची रचना सुधारून भूगर्भातील पाणी साठा वाढतो.
कशी आहे एस. आर. टी शेतीची लागवडी पद्धती
या प्रकारात आपण शेतीची मशागत व गादीवाफे एकदाच करणार आहोत. या कायमस्वरूपी गादीवाफ्यावर एक मागून एक अशी फेरपालट पिके घेणार आहोत. एकदाच करायचे हे गादीवाफे मन लावून अगदी छान करायला पाहिजेत. असे गादीवाफे मे महिन्यात जमीन दोन वेळा उभी-आडवी नांगरणी करून घ्यावी त्यामध्ये शेणखत आणि इतर खत असल्यास ते शेतात पसरून पावर टीलर ने नांगरणी करून जमीन भुसभुशीत करून घ्यावी. 136 सेंटीमीटर म्हणजे साडेचार फूट चुना किंवा राखेने ओळी आखून घ्याव्यात तुम्हाला माहित असलेल्या पद्धतीने ओळी वरती पाटसरी करून गादी वाफे तयार करावेत गरजेप्रमाणे ते फावड्याने सारखे करून घ्यावेत. अशाप्रकारे तयार होणाऱ्या गादी वाफ्याचा माथा 100 सेंटीमीटर आहे हे कटाक्षाने पहावे. पाऊस पडण्याचा अंदाज पाहून मृग किंवा आदरा नक्षत्रात साच्याने छिद्र पाडून भाताची टोकणणी करावी. टोकणणी साठी प्रती एकर सात ते आठ किंवा जास्तीत जास्त दहा किलो बियाणे दहा किलो सुफला 15 -15 -15 हे खत, दोन किलो थायमेट हे खतांमध्ये मिसळून चिमूटभर प्रति छिद्रात म्हणजेच चार ते पाच भाताचे दाणे व चिमूटभर खत टाकून त्यावर माती ढकलून नीट दाबून घ्यावे. पहिला पाऊस पडण्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा 24 तासाचे आत वाफसा असताना गोल तणनाशकाची फवारणी करून घ्यावी. हे फार गरजेचे आहे अशाप्रकारे पेरणी झाल्यानंतर एक महिन्यांनी युरिया ब्रॅकेट ची गोळी देऊन खताचे नियोजन करावे अशाप्रकारे ही एस.आर.टी पद्धत अतिशय सोपी सरळ आणि शेतकऱ्यांना सुखी करणारी अशी आहे.
सर्व शेतकरी बांधवांनी पुढील हंगामासाठी ह्या या पद्धतीचा अवलंब करावा. आणि आपले जीवन सुखी करा. ह्या मध्ये उत्पन्न आपल्या पारंपरिक शेतीपेक्षा निश्चितच जास्त आहे. आणि आज ह्या पद्धतीचा अवलंब पूर्ण महाराष्ट्रभर लोकं करत आहेत. आपण केव्हाही बोलवा..! मी आपणास मार्गदर्शन करण्यास तत्पर आहे. आपली खात्री पटवण्यासाठी शेतात येऊन आपण बघू शकता. माझी एस.आर. टी शेती कशी आहे आपण नक्कीच एकदा शेताला भेट द्या. मी आपणास मार्गदर्शन करण्यास तत्पर आहे आणि माझा उद्देश आहे की आपल्या सूरगाण्यामध्ये एस. आर. टी चा प्रसार करावा, आणि आपल्या शेतकरी बांधवांचे जीवन सुखी करावं हाच उद्देश आहे. - श्री. बाळू चौधरी आमदा, यांची माहिती