महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार ; राष्ट्रपतींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने पुरस्कार वितरण

अनामित
नवी दिल्ली - महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना अध्यापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष २०२१ चा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. ५ सप्टेंबर २०२१ रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरित होणार आहे.
[ads id='ads1]
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील आसरअली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक खुर्शिद शेख आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील कडदोरा (जगदंबानगर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक उमेश रघुनाथ खोसे यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नुकतेच वर्ष २०२१ च्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा केली आहे. देशातील एकूण ४४ शिक्षकांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला असून खुर्शिद शेख आणि उमेश खोसे या दोन शिक्षकांचा यात समावेश आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर येत्या ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त दूरदृष्य प्रणालीद्वारे राष्ट्रपतींच्या हस्ते व गडचिरोली व उस्मानाबाद जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत श्री शेख आणि श्री खोसे यांना पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे.

गडचिरोली  जिल्हयातील असरअली येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व उपक्रमशील शिक्षक म्हणून खुर्शीद शेख यांची  शिक्षणक्षेत्रात वेगळीच ओळख आहे. त्यांनी  शिक्षणातील नवनवीन उपक्रमांचा अवलंब करून आपल्या शाळेत महत्त्वपूर्ण बदल घडविले आहे. विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण देण्यासाठी शाळेत आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मूल्याधारित शिक्षणावर भर देऊन विद्यार्थ्यांना संवेदनशील, वक्तशीर व जबाबदार बनविण्याकरिता त्यांनी शैक्षणिक उपक्रम राबविले. विविध शैक्षणिक उपक्रमांद्वारे त्यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग घडवून आणला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील कडदोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक उमेश रघुनाथ खोसे यांनी ग्रामीण भागातील मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी  तांड्यावर मुलांना ऑफलाइन शिकता यावे यासाठी ५१ ऑफलाइन ऍपची निर्मिती केली. व्हिडिओ निर्मिती करून स्वयं अध्ययनाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. तांड्यावरील मुलांना त्यांच्याच भाषेतून शिक्षण मिळावे यासाठी पहिलीचे पुस्तक अनुवादित करून त्याचे डिजिटल साहित्य निर्माण केले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!