ग.स. सोसायटी कर्मचार्‍यांनां सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळणार !

अनामित
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा पुढाकार

जळगाव - सरकारी नोकरांची सहकारी पतपंस्था अर्थात ग.स. सोसायटीच्या कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला असला तरी यासाठीचे अनुज्ञेय फरकाची रक्कम थकीत होती. या प्रकरणी कर्मचार्‍यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना साकडे घातले असता त्यांनी संस्थेच्या प्रशासकांसोबत बैठक घेऊन हा प्रश्‍न मार्गी लावला. 
[ads id='ads1]


यामुळे आता कर्मचार्‍यांना ३-४ टप्प्यात थकीत रक्कम मिळणार आहे. यातील २ कोटी २० लाख रूपयांचा पहिला टप्पा कर्मचार्‍यांना तात्काळ मिळणार आहे. पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांनी ही समस्या सुटल्याने कर्मचार्‍यांनी त्यांचे आभार मानले आहेत.


याबाबत माहीती अशी की, ग.स. सोसायटीच्या कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला असून यानुसार त्यांना वेतन मिळत आहे. मात्र राज्य शासनाच्या निर्णयानुसार कर्मचार्‍यांना अनुज्ञेय रक्कम ही मिळालेली नसल्याने कर्मचारी नाराज होते.


 ग.स.सोसायटीची आर्थिक स्थिती उत्तम असून ३१ मार्च २०२१ अखेर संस्थेला १३ कोटी रूपयांचा लाभ झालेला आहे. यामुळे संस्थेने सभासदांना १० टक्के लाभांश प्रदान केला आहे. याच प्रमाणे कर्मचार्‍यांची थकीत असणारी रक्कम मिळावी अशी मागणी सोसायटीच्या कर्मचारी हितकारणी पतपेढी कर्मचारी संघटनेतर्फे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून करण्यात आली होती. 


कर्मचार्‍यांनी ही समस्या सोडविण्याचे साकडे पालकमंत्र्यांना घातले होते. याची दखल घेऊन ना. गुलाबराव पाटील यांनी कर्मचारी संघटना आणि ग.स. सोसायटीचे प्राधिकृत अधिकारी विजयसिंह गवळी यांची अजिंठा विश्रामगृहात बैठक घेतली.


याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत, सोसायटीने कर्मचार्‍यांची थकीत रक्कम टप्प्यांमध्ये देण्याचा तोडगा सुचीविला. कर्मचार्‍यांनी १ जानेवारी २०१६ ते ३१ ऑगस्ट २०२० या दरम्यानच्या फरकाची एकूण रक्कम ही १० कोटी ८१ लक्ष इतकी थकीत आहे. मात्र सोसायटीने यंदा आधीच खूप खर्च केला असल्याने दोन टप्प्यांऐवजी ही रक्कम ३-४ टप्प्यांमध्ये देण्यात यावेत अशी विनंती प्रशासक विजयसिंह गवळी यांनी केली. 


यातील पहिला हप्ता हा २ कोटी २० लाख रूपयांचा देण्यात येणार असून कर्मचार्‍यांनी याला होकार दिला. या निर्णयामुळे ग.स. सोसायटीच्या एकूण ४१७ कर्मचार्‍यांना लाभ होणार आहे. यातील ३१७ कर्मचारी सेवेत असून उर्वरित सेवानिवृत्त झालेले आहेत. या समस्तयेची दखल घेऊन कर्मचार्‍यांची समस्या सोडविल्याबद्दल कर्मचार्‍यांनी ना. गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.


या बैठकीला कर्मचारी हितकारणी पतपेढी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष संजय नारखेडे, सचिव उज्ज्वल पाटील, खजिनदार अनिल सोनवणे आणि सदस्य नारायण आप्पा सोनवणे, मनोज चव्हाण, महेशचंद्र सोनवणे, सचिन भोसले, राहूल कुमावत, निलेश ससाणे, गोपाळ पाटील, निंबा सोनवणे, राजेंद्र पवार यांची उपस्थिती होती.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!