मंगरूळ - हे रावेर तालुक्याच्या पूर्व उत्तरेकडील सातपुड्याच्या पर्वतरांगेतील एक निसर्गरम्य ठिकाण. भोकरी नदीवरील मंगरूळ हा मध्यम प्रकल्प येथे असल्याने निसर्गप्रेमी पर्यटक येथे पावसाळ्यात येतात.धरणीने सर्वत्र हिरवा शालू पांघरलेला असल्याचे विहंगम दृश्य येथे पहायला मिळते. पण या मंगरूळला ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा ही आहे.[ads id='ads1]
सुमारे ५०० वर्षांपूर्वी येथे गवळी राजांचे वास्तव्य होते. गावाजवळ त्यांचा ७ मजली वाडा होता. अगदी अलीकडे २० वर्षांपूर्वी त्याचे दगड विटांचे अवशेष मी अगदी जवळून पाहिले आहेत. आताही ते स्पष्टपणे दिसून येतात.
येथील राजाची मुलगी शेजारच्या अभोडा गावात दिली होती. तिला सासरी विहिरीवर पाणी भरण्यासाठी जावे लागते हे राजाला कळल्यावर त्याने मंगरूळ ते अभोडा असा कॅनॉल तयार करून पाणी थेट मुलीच्या घरापर्यंत नेण्याची सोय केली होती. त्या कॅनॉलचे अवशेष येथे अजूनही आहेत. राजीव पाटील यांच्या येथील शेतात मागील वर्षी मोडी लिपी मधील एक खंडित शिलालेख सापडला होता.मात्र येथील गवळी राजांच्या आणि सापडलेल्या खंडित शिलालेखाबद्दलची लेखी पुराव्यानिशी माहिती कोणाकडे नाही.येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक वासुदेव वानखेडे यांना मात्र येथील इतिहासाची बारीकसारीक माहिती होती. आता त्यांचे निधन होऊन एक वर्ष झाले आहे.[ads id='ads2]
गवळी लोकांनी येथे नदी किनाऱ्यावर बांधलेले सूर्यमंदीर आणि महादेवाचे मंदीर त्यांच्या धार्मिकतेची साक्ष देतात.
रावेर पासून अवघ्या ११ किलोमीटर अंतरावर असल्याने अर्ध्या तासात तिथे पोहोचता येते.अलीकडे भोकरी नदीवरील हा प्रकल्प ओसंडून वाहत असल्याने परिसरात मनमुराद भटकंतीचा आनंद घेता आला. आमचे मित्र कैलास वानखेडे यांच्या वडिलांच्या (कै वासुदेव वानखेडे गुरुजींच्या) वार्षिक श्राद्धाच्या निमित्ताने त्यांनी आम्हाला निमंत्रित केले होते.
सुट्टीचा दिवस असल्याने मीही मोकळाच होतो. आदल्या रात्री मस्त पाऊस पडला होता आणि सकाळी स्वच्छ ऊन पडले होते. ज्येष्ठ मार्गदर्शक हेमेंद्र नगरिया आणि मी सकाळी १० वाजता मंगरूळकडे निघालो. मोटरसायकलवर रमत-गमत केऱ्हाळे येथे मित्रमंडळीला भेटत भेटत आम्ही भोकरी नदी ओलांडली. भोकरीचे खळाळून वाहणारे स्वच्छ पाणी, त्यात मासे पकडणारे लोक आणि पोहणारी मुलेही दिसत होती. रस्त्याने काही ठिकाणी केळीची कापणी ही सुरू होती. मंगरूळला पोचल्यावर आम्ही कैलास जी,त्यांचे ज्येष्ठ बंधू प्रमोद जी आणि नातेवाईकांची भेट घेतली आणि धरणावरून फिरून येतो असे सांगून पुढे निघालो. रस्त्याने डाव्या हाताला तिथल्या गवळी राजाच्या सातमजली राजवाड्याचे अवशेष दिसले. पंधरा-वीस वर्षांपूर्वी ते स्पष्टपणे दिसत.आता तिथे फक्त जागा उरली आहे. पुढे रावेर येथील प्रयोगशील आणि प्रगतिशील शेतकरी राजीव पाटील यांनी उभारलेले शेडनेट, त्यात झेंडूची फुले आणि ढोबळी मिरची लागलेली पाहिली आणि पुढे मंगरुळ प्रकल्पाच्या रस्त्याला लागलो.
प्राचीन सूर्य मंदीर
प्रकल्पाकडे जातानाचा रस्ता खाचखळग्यांनी भरलेला आहे. काही ठिकाणी रस्त्यावरील माती पावसामुळे वाहून गेली आहे आणि फक्त दगडच दगड उरले आहेत. यावरून मोटर सायकल चालवताना माझी चांगलीच कसरत झाली. तीनशे - चारशे मीटर अंतर गेल्यावर उजवीकडे दोन जुनी मंदिरे दिसतात. त्यातील एक सूर्य मंदीर तर दुसरे महादेवाचे आहे. दोन्ही मंदिरांच्या बांधकामावरून ती किमान दोनशे ते अडीचशे वर्षांपूर्वीची असावीत असा अंदाज आहे. सुमारे पाचशे वर्षांपूर्वी या भागात गवळी लोकांची वस्ती होती.
ते सूर्योपासक होते.त्यांनीच हे सूर्य मंदीर बांधले असावे. मंदिरात आत दक्षिण दिशेला तोंड करून असलेल्या एका सपाट दगडावर ही सूर्याची मूर्ती कोरलेली आहे याच दगडावर खालच्या बाजूस गवळी लोकांची देवता खंडोबा राय आणि त्यांच्या पत्नी बानुबाई यांची घोड्यावर बसलेली मूर्ती आहे. या दोन्ही मुर्त्या काहीशा ओबडधोबड आहेत मात्र बारकाईने निरीक्षण केले तर ही मूर्ती आणि देवता सहज ओळखू येते. शेजारच्या मंदिरात महादेवाची प्राचीन पिंड आहे. दक्षिणाभिमुख असलेली ही दोन्ही मंदिरे आता पडकी झाली आहेत. म्हणून केऱ्हाळे येथील भाविक व प्रगतीशील शेतकरी भरत राजाराम पाटील दोन्ही देवतांसाठी एक मोठे नवे मंदिर बांधत आहेत.या भागात राहणारे गवळी, आदिवासी लोक सूर्योपासना करीत.
आता सर्वच जातीचे, समाजाचे लोक येथे दर्शनाला येतात.दरवर्षी पौष महिन्याच्या प्रत्येक रविवारी येथे लोक मानलेले नवस फेडून वरण बट्टीचा नैवेद्य देवाला अर्पण करतात.पौष महिन्याच्या शेवटच्या रविवारी येथे यात्रा भरते.
या मंदिर परिसरात आम्ही बराच वेळ शांतपणे बसलो.आजूबाजूला हिरवीगार आणि गर्द झाडी होती. नदीपलीकडच्या उंच डोंगरावर मेंढ्या चरत होत्या. हिरव्यागार गवतावर त्यांचे काळे पांढरे रंग ठिपक्यांप्रमाणे दिसत होते.
'नीरव शांतता' म्हणजे काय याचा प्रत्यय आम्हाला आला. इथे मोबाईलची रेंजही नव्हती. मला माझे श्वासोच्छ्वास देखील ऐकू येत होते. तीन-चार पक्षांचे आवाज स्पष्टपणे ऐकू आले त्यात जवळूनच एका मोराचा आवाज ऐकू आला. झाडाच्या पानांची वाऱ्यामुळे होणारी सळसळ आणि मंगरूळ प्रकल्पाच्या कॅनॉलच्या पाण्याचा खळखळ असा आवाजही स्पष्टपणे ऐकू येत होता. खूपच शांत आणि प्रसन्न असे ते वातावरण होते.नवीन मंदिराचे बांधकाम करणारे मजूर लाकडी ठोकळ्याने भरावातील माती ठोकणे सुरू केले तितकाच काय तो कृत्रिम आवाज. इथून निघावे असे वाटत नव्हते; पण वेळेची मर्यादा ओळखून आम्ही निघालो.
तिथून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावरील मंगरूळ प्रकल्पावर आम्ही आलो. येथे मासेमारी करणारे तीन-चार जण प्रकल्पाच्या पाण्यात उतरून आपले जाळे टाकून बसले होते. ३-४ मोजके पर्यटक प्रकल्पावर हिंडत होते.या मध्यम प्रकल्पाच्या भिंतीवरून चालताना वाऱ्याचा वेग जाणवत होता. थंडगार वारा मन प्रसन्न करून चालण्याचा थकवाही घालवत होता.
प्रकल्पाच्या मध्यभागी असलेला छोटासा डोंगर हिरव्यागार वनराईने नटला होता.प्रकल्पाच्या सांडाव्याजवळ आणि बंद असलेल्या,काहीशी दुरवस्था झालेल्या सर्वात उंचावरील विश्रामगृहाजवळ जाऊन तेथून चारही बाजूंना दिसणारे विहंगम दृश्य पाहिले ते दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारे होते. हिरव्यागार झाडीत मला लाल भडक आणि तांबड्या, पिवळ्या रंगाची काही सुंदर, मनमोहक फुले दिसली. मी झाडीत जाऊन त्या फुलांची छोटी फांदीच तोडून आणली. बबलू शेठही उत्साहात माझ्या मागोमाग त्या झाडीत आले. पण ते झाड विषारी असल्याचे तेथील मासे पकडणाऱ्याने मला सांगितले.
त्यामुळे ती फांदी मला तिथेच टाकून द्यावी लागली. इतक्या उंचीवर आल्यावर इथे मोबाईलचा टॉवरचे सिग्नल मिळाले पण ते मध्यप्रदेशातील होते. भोजनासाठी वाट पाहत असल्याचा फोन श्री कैलास वानखेडे यांनी केला आणि मी बबलू शेठ यांच्यासह तेथून परत निघालो.
✍️ दिलीप वैद्य सर, रावेर
९६५७७१३०५०