जळगाव - महाराष्ट्राच्या समाजकारणात प्रबोधनकारी व सामाजिक सुधारणेच्या परंपरेचा वारसा खूप मोठा आहे. १३ व्या शतकात मोगलांनी येथे आक्रमण करून यादवांचे साम्राज्य संपवल्यानंतर महाराष्ट्राचे सामाजिक जीवन कश्या पद्धतीने विस्कळीत झाले
[ads id="ads1"]
यावर फारसा इतिहास लिहिलेला नाही परंतु या काळातच महाराष्ट्राच्या भूमीवर बहुजन समाजातील संतांनी वारकरी संप्रदायाची ध्वजा फडकवीत सामाजिक समतेचा पुकारा केला आणि राज्यातील गावगाड्यातील जाती विषमता व सामाजिक अन्यायाविरुद्ध यशस्वी आवाज उठवत सामाजिक समता प्रस्थापित करण्याचा आध्यात्मिक प्रयत्न केला याच संत परंपरेच्या संस्कारातून छत्रपती शिवरायांनी ही या राज्यातील जातीपातीत विखुरलेल्या अठरापगड जातींना एका झेंड्या खाली आणत रयतेच्या स्वराज्याची स्थापना केली आणि पुढे मग छत्रपती शाहू महाराज म. फुले व बाबासाहेब आंबेडकरांनी मनुवादी गुलामगिरीच्या जोखडातून येथील बहुजन समाजाला सोडवण्यासाठी अथक प्रयत्न केलेत. म्हणूनच या बहुजन संतांचा वारकरी संप्रदाय व छत्रपती शिवराय, शाहू, फुले, आंबेडकरांचा पुरोगामी वारसा असणारे
[ads id="ads2"]
राज्य असल्याचा अभिमान आपण सर्वच आजही मानतो.या परंपरेचे स्मरण करण्याचे कारण म्हणजे आज ही परंपरा धोक्यात आली आहे आणि ती धोक्यात का आली आहे याचे आपण जेव्हा विश्लेषण करतो तेव्हा “ज्या क्षुद्र ठरवल्या गेलेल्या बहुजन समाजाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी प्रयत्न झालेत तोच बहुजन समाज आज त्यांच्या गुलामगिरीला कारणीभूत असणाऱ्या प्रस्थापित शक्तींच्या वळचणीला जावून बसला आहे” याचे कारण पुरोगामी म्हणवणाऱ्या शक्तींनी राजकारणाकडे केलेले अक्षम्य दुर्लक्ष व राजकारण करणाऱ्यांनी सामाजिक प्रश्नांवर राजकीय भूमिका घेण्यासाठी केलेली टाळाटाळ. खूपच थोड्या राजकीय नेत्यांना हे भान असते मा. छगन भुजबळ हे असे भान असणाऱ्या नेत्यांपैकी एक राजकीय नेते आहेत ज्यांच्या पाठीमागे सर्वसामान्य जनता उभी राहू शकते अश्या बोटावर मोजल्या जाणाऱ्या नेत्यांमध्ये भुजबळांचा समावेश होतो.आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षाच्याही पलीकडे बहुजनांचे नेते म्हणून किंवा सर्वसामान्य जनतेसोबत नाळ जोडलेला सामाजिक नेता व कार्यकर्ता ही ओळख मा. छगन भुजबळ यांची आहे.
सामाजिक समता आणि सामाजिक न्याय प्रस्थापित व्हावा म्हणून मी सातपुड्यातील आदिवासी समूहांचा व येथील ग्रामीण भागातील शेतकरी कष्टऱ्यांचा लढा लोकसंघर्ष मोर्चा च्या माध्यमातून लढत असतांनाच मी प्रथम भुजबळजींना भेटले ते नासिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठा द्वारा माझ्या सामाजिक कार्याबद्दल २००५ मध्ये मला “रुक्मिणी पुरस्कार” देण्यात आला त्या वेळी हा पुरस्कार मला मा. भुजबळ यांच्या हस्ते घेण्याचा योग आला आणि भुजबळांच्याविषयी, त्यांनी मंडल आयोगासाठी केलेल्या आंदोलनांविषयी व अखिल भारतीय म. फुले समता परिषदेविषयी माहिती झाली आणि हा माणूस केवळ सत्तेसाठी राजकारणात आलेला नाही तर त्यांना येथील बहुजानांविषयी कळवळा आहे त्यासाठी भुजबळांचे राजकारण चालते या विषयी आदर वाढत गेला
भुजबळ हे सर्वसामान्य कुटुंबातच जन्मले परंतु त्याकाळात ही केवळ गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी मुंबईतील व्हीजेटीआय या नामांकीत संस्थेच्या मॅकेनिकल इंजिनियरींग पदविकेसाठी मोफत प्रवेश मिळवला मात्र शिवसेनेच्या मराठी माणसांच्या आंदोलनात बाळासाहेबांच्या नेतृत्वाने प्रभावित होवून शिवसेनेत दाखल झालेत आणि मुंबईचे महापौर बनलेत व कामांचा धडाका दाखवून दिला भुजबळांचे शिवसेनेतील महत्वाचे योगदान म्हणजे मुंबईच्या बाहेर ग्रामीण भागात गावागावात शिवसेनेचे कार्य त्यांनी पोहचवले. हे सर्वच मान्य करतात १९८६ मध्ये कर्नाटक बेळगांव सिमाप्रश्नाच्या आंदोलनात कर्नाटकात महाराष्ट्राच्या नेत्यांना बंदी घातलेली असतांना जीवावर खेळत वेश बदलवून त्यांनी प्रवेश मिळवत केलेले आंदोलनही देशभर गाजले.
नंतरच्या काळात शिवसेना सोडल्यावर शरदराव पवार यांच्या सोबत भुजबळांनी राजकारणाची आपली दुसरी इनिंग सुरु केली आणि कांग्रेस व नंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस असा त्यांचा आजवरचा राजकीय प्रवास आहे या प्रवासात त्यांनी गृहनिर्माण व झोपडपट्टी सुधारणा मंत्री,सार्वजनिक बांधकाम मंत्री, महसूलमंत्री ,उपमुख्यमंत्री व १९९६ मध्ये विरोधी पक्षनेता अशी आपली कारकीर्द गाजवली. परंतु मला भुजबळ साहेबांचा विशेष आदर आहे तो या सर्व राजकीय प्रवासात त्यांनी बहुजन समाजाची ओबीसी समाजाच्या प्रश्नांवरती त्यांनी जी राजकीय भूमिका घेतली, सातत्याने लावून धरली त्या बद्दल कारण ओबीसी समाजाला एकत्र आणत त्यांच्या सामाजिक न्यायाचा लढा हा येथील जातवर्गाचा सनातन संघर्ष आहे येथील मनुवादी प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धचा हा संघर्ष प्राचीन आहे त्यासाठी परिवर्तनवादी व पुरोगामी संघटना हा लढा सातत्याने लढत आल्या आहेत मी सामाजिक चळवळीत आली ती या अश्याच पुरोगामी राष्ट्र सेवा दल , छात्रभारती, हिंद मजदूर सभा या सारख्या संघटनांच्या माध्यमातून परंतु या सामाजिक चळवळींनी या सामाजिक न्यायाच्या लढ्याला राजकीय टोक कधी आणलेच नाही त्यामुळे येथील बहुजन समाज हा जातीयवादी संघटनांकडे वळला बहुजन समाजाचे प्रश्न सोडवतांना केवळ प्रबोधनाच्या सामाजिक पातळीवर नव्हे तर राजकीय अंगानेही हे लढे उभारावे लागतील हे भान सुटल्याने बहुजनांचा लढा आजही यशस्वी झालेला नाही. येथील क्षुद्र व क्षुद्रेतर समाजाला खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय मिळवून द्यायचा असेल तर त्यांना सत्तेच्या राजकारणात केवळ संसद बाह्य दबावगट म्हणून नाही तर राजकीय ताकद म्हणूनही हस्तक्षेप करावाच लागेल हे येथील पुरोगामी चळवळींनी लक्षात न घेतल्याने उलट आजच्या विविध राजकीय पक्षांनी याचा गैर फायदा घेत त्यांच्या पक्षात जाती निहाय ओबीसी आघाड्या निर्माण करून मतांचे राजकारण चालवले आहे. त्यामुळे जो पर्यंत सामाजिक चळवळी व सत्तेचे राजकारण यांचा समन्वय साधणारे समाजकारण उभे रहाणार नाही तो पर्यंत खऱ्या अर्थाने घटनेने दिलेली मानवतावादी मुल्ये प्रत्यक्षात येणार नाहीत व येथील बहुजन समाजाला न्याय मिळणार नाही भुजबळांच्या जवळ हे समाजकारण उभे करण्याचे भान आहे असे मला नेहमीच वाटत आले आहे.
मुळात ज्याला घटनेने ओबीसी समाज हे नाव दिले तो समाज हा इथल्या शतकानुशतके मनुवादी संस्कृतीच्या जातीच्या उतरंडीत क्षुद्र म्हणून बंदिस्त केलेला होता. त्याला सामजिक न्याय, सामाजिक समता, प्रतिष्ठा व संपत्ती या पासून वंचित ठेवले गेले होते. या सामाजाला बाबासाहेबांनी घटनेत मागासलेल्या जाती म्हणून न्याय देण्यासाठी तरतुदी केल्यात परंतु फक्त अनुसूचित जाती व जमातींनाच सामाजिक, राजकीय आरक्षण मिळाले या मागासलेल्या जातींमधील क्षुद्र म्हणून येथील वर्णव्यवस्थेने अन्याय केलेल्या बहुजन समाजातील जातींना मात्र हे आरक्षण मिळाले नव्हते. बाबासाहेबांनी घटना समितीचा राजीनामा दिला त्यामागे हे ही एक कारण होते. अश्या या इतर मागासलेल्या जातींना न्याय मिळावा म्हणून संघर्ष सुरूच राहिला १९९२मध्ये मंडल आयोगाच्या शिफारसी आल्यात आणि हा आयोग लागू व्हावा म्हणून ओबीसींचे आंदोलन खऱ्या अर्थाने पेटले यात पंतप्रधान व्ही.पी.सिंग यांना आपले पंतप्रधानपद गमवावे लागले परंतु अखेर ओबोसींच्या सामाजिक न्यायाचा मार्ग मोकळा झाला. आणि हा मंडल आयोग लागू व्हावा म्हणून भुजबळांचा या साऱ्या संघर्षात सिंहाचा वाटा राहिला .
राजकारण करतांना या राज्यातील बहुजनांसाठी खऱ्या अर्थाने सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित करायची असेल तर केवळ सत्तेचे राजकारण करून चालणार नाही तर सामाजिक क्रांतीची चळवळ ही उभी करावी लागेल ही त्यांची भूमिका होती आणि म्हणून महात्मा फुले समता परिषदेची स्थापना त्यांनी १९९२मध्ये केली होती या समता परिषदेच्या माध्यमातूनच राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणात नोकऱ्यांत आरक्षण, शिष्यवृत्ती, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण या साठी जनतेचा रेटा निर्माण करून हे प्रश्न मार्गी लावता आलेत या शिवाय पुणे विद्यापीठाचे सावित्रीबाई फुले हे नामांतर, पुण्यातील फुले वाड्याचे भव्य स्मारकात रुपांतर करून ते जनतेसाठी खुले करून देण्याचे कार्य, सावित्रीबाईंच्या जन्मभूमीला राष्ट्रीय संपत्ती म्हणून लोकार्पण, पुणे विद्यापीठात बाबासाहेबांच्या व म.फुल्यांच्या पुतळ्यांचे अनावरण, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांना म. फुल्यांचे गुलामगिरी हे पुस्तक भेट, येवला येथे उभारलेली दीक्षाभूमी, चैत्यभूमी प्रमाणेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली “मुक्तिभूमी” या सारख्या महाराष्ट्रातील समतावादी चळवळीला प्रेरणा देणाऱ्या प्रतीकात्मक गोष्टींचे योगदान हे भुजबळांनी येथील मनुवादी शक्तींना दिलेले उत्तर आहे बहुजनांच्या प्रश्नांना राजकीय बळ यातूनच मिळत असते आणि हे काम भुजबळांनी राजकारणातून प्रत्यक्षात आणून दर्शविले.
केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात उत्तर प्रदेश बिहार राजस्थान दिल्ली झारखंड सह राज्याराज्यात ओबीसींना एकत्र आणत लाखोंचे मेळावे व मोर्चे काढून मंडल आयोगाच्या शिफारसी त्या त्या राज्यात लागू करण्यासाठी भुजबळांनी परिश्रम घेतले आहेत
आज जेव्हा जातीयवादी शक्तींच्या हातात देशाची सत्ता गेली आहे व ते ज्या वेगाने पुन्हा स्वातंत्र्य लढ्यातून निर्माण झालेल्या धर्मनिरपेक्ष व मानवी मूल्यांना जपणाऱ्या राष्ट्रवादाला नाकारून धार्मिक उन्मादावर आधारित राष्ट्रवाद आणू पहात आहेत अश्या काळात प्रतिगामी शक्तींची हि प्रतिक्रांती यशस्वी न होवू देण्यासाठी पुन्हा एकदा सामाजिक समता व सामाजिक न्याय प्रस्थापित करू शकणाऱ्या राजकीय इच्छ्शक्ती असणाऱ्या नेत्यांची गरज समाजाला आहे त्या साठी पक्षीयपरिपेक्षा बाहेर पडून बहुजनांचे राजकारण उभे करण्याची गरज आहे अश्या वेळी भुजबळ साहेबांसारख्या राजकीय नेत्यांची गरज आहे हे पटते आणि म्हणून भुजबळ साहेबांकडून या अपेक्षा आहेत की त्यांनी आता बहुजनांच्या ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या व त्यानिमित्ताने सामाजिक समतेसाठी लढणाऱ्या सर्वांची एकत्रित आघाडी उभारावी आम्ही सारे त्यासाठी त्यात आमची ताकद एकवटवून हा लढा पुढे नेण्यासाठी तयार आहोत.
ओबीसींच्या आरक्षणावर नेहमीच त्यांच्या संखेच्या प्रमाणात आरक्षण नाकारून पुन्हा त्यात क्रीमिलेयर सारख्या अटीशर्ती लादून अन्याय करण्यात आला आहे त्यात मराठा समाजाने केलेली आरक्षणाची मागणी यातून या राज्यातील बहुजन समाजात फुट पाडत पुन्हा येथे मनुवादी समाजव्यवस्था प्रस्थापित करण्याचे षड्यंत्र सुरु आहे त्यामुळे आज सर्व बहुजन समाजाने एकत्र येत त्यांच्या न्याय्य हक्काचे आरक्षण मिळवले पाहिजे परंतु त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे येथील सामाजिक न्याय व सामाजिक समता प्रस्थापित करत खऱ्या अर्थाने छत्रपती शिवराय शाहू फुले व आंबेडकरांचा वारसा अधिक मजबुतीने पुढे नेण्यासाठीचे समाजकारण व राजकारण केले पाहिजे आणि त्यासाठी आता आमच्या खांद्यावर आमचेच डोके असेल हा निर्धार करत जातीयवादी व धर्मांध शक्तींच्या मागे गेलेला बहुजन समाज पुरोगामी शक्तींच्या मागे कसा येईल हे प्रयत्न केले गेले पाहिजेत मा. भुजबळांनी हे समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसी समाजाला एकत्रित करून दाखवले आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर ही मराठा समाजाला आरक्षण मिळावे याला त्यांचा पाठिंबाच राहिला आहे मात्र त्या साठी आपापल्या संख्येच्या प्रमाणात सर्वांनाच आरक्षण मिळावे हा त्यांचा आग्रह आहे आणि त्या साठी कायदेशीर आधार नसलेली ५० % ची अट जी इंदिरा साहनी खटल्यात आणली गेली ती रद्द करण्या साठी ओबीसी व मराठेच नव्हेत तर सर्व मागास बहुजन समाजाने इकत्रीत येवून लढण्याची गरज आहे छगन भुजबळांनी या साठी पुढाकार घ्यावा
आजवर सामाजिक चळवळींनी राजकारण हे वाईटच असते असा भ्रम बाळगून समाजातील विघातक शक्तींना बळच दिले आणि राजकारण करणाऱ्यांनी ही सामाजिक चळवळी कडे दुर्लक्ष केले हे टाळावे लागेल त्यासाठी मा. छगन भुजबळ हे उत्तम उदाहरण आहे ज्यांनी हा समतोल राखत सत्तेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना नेहमीच ऐरणीवर आणले आणि सामाजिक चळवळींच्या माध्यमातून राजकारणाला सामाजिक प्रश्नांवरती भूमिका घ्यायला भाग पाडले. त्यांनी घेतलेल्या या भूमिकांमुळे त्यांच्यावर अनेक आरोप झाले आहेत त्यातून बाहेर पडत त्यांनी आजही माघार घेतलेली नाही आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना या राज्यातील समतेची लढाई पुढे नेण्यासाठी ताकद मिळो हीच शुभेच्छा व त्यांच्या राजकारणाचा या राज्यातील पुरोगामी सामाजिक चळवळींना ही बळ मिळो ही अपेक्षा.
प्रतिभा शिंदे
संस्थापक (लोकसंघर्ष मोर्चा)
९४०४५५९५१०