जयभीम हे नुसतेच अभिवादन नसून ही मानवंदना आहे महामानवाला आपल्या प्रगल्भ अशा बुद्धितेजाने शोषित, पीडित, वंचित घटकांच्या जीवनातील अंधकार नष्ट करून महापरिनिर्वाण प्राप्त केलेल्या बोधिसत्वाला बाबासाहेब डाॅ.भीमराव रामजी आंबेडकरांना.
निर्वाण प्राप्त झालेल्या व्यक्तीच्या निधनाला परिनिर्वाण आणि निर्वाण प्राप्त असामान्य कर्तुत्व असणाऱ्या व्यक्तीच्या निधनाला महापरिनिर्वाण असे म्हणतात.
[ads id="ads2"]
सामान्य व्यक्तीचे निधन हे निर्वाण नाहि, परिनिर्वाणही नाही, त्याला महापरिनिर्वाण सुध्दा म्हणता येत नाही.
निर्वाण=निर + वाण = निर्वाण
निर = नाही वाण =तृष्णा
तृष्णा विरहित जीवन = निर्दोष जीवन.
बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रगल्भ बुध्दीमत्ता आणि कर्तुत्व अधिकार बघून त्यांचे बुधपद अवस्थेतील प्रज्ञेचा, करूणेचा व शीलाचा अंश असे समजते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन समाजातील विषमता दूर करण्यासाठी कष्ट केले. ते प्रकांड बुध्दीमत्तेचे धनी होते. तसेच ते बोधिसत्व होते.तहहयात त्यांनी सारखे आपले जीवन दुःखितांच्या, शोषितांच्या आणि वंचितांच्या कल्याणासाठी व्यतीत केले. त्यांना समता मुलक समाज रचना अभिप्रेत होती त्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, आणि न्याय या तत्वावर आधारित संविधान लिहिले. अशा विभिन्न कर्तुत्व गाजवलेल्या असामान्य विभूतीच्या निधनाला महापरिनिर्वाण असे संबोधतात.१९५६ पूर्वीच दहा वर्षांहूनही अधिक काळ डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची तब्येत बरी नव्हती.त्यांना काही काळ आंत्रपृच्छ आणि वाढत्या रक्तदाबाचा त्रास झाला.वय वाढले तसे त्यांना मधुमेह जडला आणि त्याने त्यांची तब्येत कोलमडलीच.शोषित, पीडित, वंचितांसाठी त्यांनी जन्मभर केलेला संघर्ष आणि सोसलेले क्लेश,सतत केलेले वाचन-लेखन, विश्रांतीचा अभाव या सर्व गोष्टींचा प्रतिकूल परिणाम त्यांच्या तब्येतीवर दिसू लागला. खालावू लागलेले प्रकृतिमान काही मानसिक आघातांमुळे आणखीनच खालावले, जे सहकारी आपला पक्ष निट चालवतील आणि आपले काम आपल्या मागे जोमाने पुढे नेतील असे त्यांना वाटले त्या सहकाऱ्यांनी विश्वासघात, नेतृत्वासाठी आणि सत्तेसाठी त्यांच्यात सुरू असलेली सुंदोपसुंदी जशी त्यांना मनस्ताप देत होती त्याचप्रमाणे त्यांच्या खडतर तपश्चर्येला फलस्वरूप अनुसूचित जातीतील ज्या तरुणांना उच्च शिक्षणाचा लाभमिळाला , विशेषतः त्यातल्या ज्या काही जणांना वरिष्ठपदाच्या नोकऱ्या लागल्या त्यांनी आपला वेगळाच वर्ग निर्माण केला. आपल्या पददलित बांधवांप्रती आपल्या कर्तव्यांचा आणि जबाबदाऱ्यांचा त्यांना विसर पडला याची बाबासाहेबांना खूप खंत वाटत होती. डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या आणि औषधे यांचा अपेक्षित परिणाम होत नव्हता. जानेवारी १९५५ मध्ये त्यांची तब्येत चिंताजनक वाटू लागली. त्यांचे वजन घटले आणि ते खिन्न आणि खचलेले दिसू लागले. त्यांचे हिवाळी आणि उन्हाळी पोषाख त्यांना सैल होऊ लागले. ते पुन्हा शिववून घ्यावे लागले. त्यांचे शरीर एकेकाळी भरभक्कम आणि डौलदार होते.त्यांचे अतिरिक्त वजन थोडेफार कमी झाले असले तरी तेवढेही पेलणे त्यांच्या अशक्त पायांना आता जड जाऊ लागले होते. नेहमीची अंघोळीसारखी कामे करताना किंवा फिरायला जाताना त्यांना कोणाचा तरी आधार घ्यावा लागायचा. त्यांची दाढी आणि हजामत करायलाही ते नानकचंद रट्टूला सांगत. अनेकदा ते अंथरूणावर नुसतेच पडून राहात. अन्नावरची वासना गेली होती. खूप आग्रह केल्यावर ते चार घास खात आणि ताट सरकवून टाकत. वातावरण बदलले, हवापालट केला तरी त्यांच्या तब्येतीत काही सुधारणा होत नव्हती व्हिक्टर नावाचा आचारी खास पश्चिमी पद्धतीचे पदार्थ तयार करण्यासाठी लावला होता. पण त्यांचे काही त्याच्याशी जमेना. कारण त्यांना ते पदार्थ व त्यांची चव भावत नसे.त्यांची दृष्टीही क्षीण झाली होती. त्यांनी अनेकदा डोळे तपासून घेतले. एका पाठोपाठ एक चष्मे पण बदलले पण काहीच सुधारणा होत नव्हती. यामुळे ते अधिकच दुःखी आणि उदास होत असत...... माझे डोळेजर गेले , तर हे जीवनच जगण्याच्या लायकीचे राहणार नाही. कारण मग मला वाचता आणि लिहिता येणार नाही माझे संकल्पित यादगारवजा ग्रंथ मला पूर्ण करता येणार नाहीत." असे ते म्हणत, ते अत्यंत दुःखी असत. त्यांना भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला हे जाणवे की मृत्यू त्यांच्या भोवती घिरट्या घालत आहे. विझणाऱ्या ज्योतीबद्दल बोलावे तसे प्रत्येकजण त्यांच्याबद्दल बोलत असे. पण जो तो त्यांच्या इच्छाशक्तीचे आश्चर्य करत असे. त्यांचे शरीर मधुमेहाला बळी पडले असले तरी त्यांच्या विलक्षण क्षमता मात्र टिकून होत्या. त्यांची प्रकृती मात्र दिवसेंदिवस ढासळत होती.
१४ ऑक्टोबर १९५६ ला धर्मांतर प्रक्रीया पूर्ण करून मनाच्या अत्यंत उत्साही अवस्थेत आंबेडकरांनी आपल्या निकटवर्तीय मंडळींना धर्मांतराच्या समारंभाच्या वेळी घेतलेली छायाचित्रे दाखविली आपण आता दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पंजाब या विभागांत धर्मातर घडवून आणू अशी इच्छा त्यांनी त्यांच्याकडे बोलून दाखविली, जो जो त्यांचा चाहता त्यांना भेटावयास येई त्याला त्याला ते आपल्या धर्मांतराच्या हकिकतीचे मोठ्या ऊत्साहाने नि सद्गदित अंत:करणाने रसभरित वर्णन करून सांगत.१५ नोव्हेंबर १९५६ रोजी बौध्द भ्रातृसंघाची चौथी जागतिक परिषद खाटमांडू येथे भरली.त्या परिषदेत बोलतांना डाॅ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,बौध्द धम्म हा जगातील सर्वात मोठा धम्म आहे.कारण तो केवळ धर्म नसून तो एक महान सामाजिक सिद्धांत आहे.हे मी जगाला जाहीर करण्यास येथे आलो आहे.मायदेशी दिल्लीतील निवासस्थानो परतल्यावर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर अतिशय खिन्न, वैतागलेले आणि उदासीन दिसत होते. आंबेडकरांच्या पत्नीचे वडील कृष्णराव कबीर, भाऊ बाळू कबीर आणि डॉ. माधवराव मालवणकर आंबेडकरांबरोबरच त्यांच्या निवासस्थानी त्या दिवसांत राहत होते. आंबेडकर फारच थकलेले असल्यामुळे त्यांनी त्यादिवशी रट्टूला रात्री सोबत ठेवून घेतले.१ डिसेंबरच्या सकाळी आंबेडकर सव्वासात वाजता उठले.त्यांनी चहा घेतला आणि त्यांना ताजेतवाने वाटू लागले.त्याच दिवशी सायंकाळी ते मथुरा पथावर भरलेले प्रदर्शन पाहण्यासाठी गेले. त्यातील बुद्धिस्ट आर्ट गॅलरी पाहून ते बाहेर आले. प्रदर्शनाच्या बाहेर असलेल्या आपल्या मोटारीमध्ये बसले त्या वेळी त्यांना एका चाहत्याने विचारले की, निरनिराळ्या देशांतून आलेल्या बुद्धाच्या मूर्तीमध्ये एवढा फरक कसा? त्या मूर्तीच्या
अंगप्रत्यंगांच्या घडणीत असा फरक का? तेव्हा त्यांनी उत्तर दिले की, बुद्धांच्या महानिर्वाणानंतर सहाशे वर्षेपर्यंत बुद्धाचे चित्र कोणीही रेखाटले नव्हते. किंवा त्याची मुर्तीही घडविली नव्हती. कोणीतरी त्यानंतर आपल्या कल्पनेप्रमाणे बुध्दाचा पुतळा केला त्यानंतर अनेक देशांत त्या देशांतील सौंदर्याच्या कल्पनेप्रमाणे बुद्धाच्या मुर्ती वा पुतळे करण्यात आले. परत येताना त्यांनी कर्नाटक प्लेसमधील एका पुस्तकविक्रेत्याच्या दुकानाला भेट दिली.नवीन ग्रंथ पाहिले. त्यांतले काही घरी पाठविण्यास सांगितले.२ डिसेंबर रोजी अशोक विहारमध्ये दलाई लामांच्या सन्मानार्थ झालेल्या समारंभाला आंबेडकर उपस्थित होते.दलाई लामा त्यावेळी बुध्दगया येथे साजऱ्या होणाऱ्या बुध्द महापरिनिर्वाणाच्या २५०० समारंभात भाग घेण्यासाठी आले होते. सायंकाळी आपल्या आवारातील हिरवळीवर काही कार्यकर्त्यांशी गप्पा मारल्या व भोजनही तेथेच केले रात्री साडे दहा वाजता ते झोपी गेले थोड्याच वेळात गाढ झोपले. ३ डिसेंबरच्या सायंकाळी ते अतिशय थकलेले होते.त्याच दिवशी हिरवळीवर आंबेडकर पतीपत्नींची आंबेडकरांचे मेहूणे बाळू कबीर यांनी छायाचित्रे घेतली. त्या छायाचित्रांसाठी आंबेडकरांची पत्नी त्यांचे वडील कृष्णराव कबीर आणि डॉ. माधवराव मालवणकर इत्यादी मंडळी बाबासाहेबांबरोबर बसली होती.मंगळवार ४ डिसेंबर रोजी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर राज्यसभेत काही वेळ उपस्थित होते.राज्यसभेच्या दिवाणखान्यात काही सभासदांशी त्यांनी औपचारिक चर्चा केली.आंबेडकरांची ही राज्यसभेत अखेरची भेट ठरेल असे कोणालाही वाटले नसेल. त्यादिवशी रट्टूंनी टंकलेखनाचे काम रात्री दिड वाजेपर्यंत केले आणि ते आंबेकरांच्या निवासस्थानी झोपी गेले. ५ डिसेंबर च्या सकाळी रट्टू लवकर उठले बाबासाहेब झोपलेले होते.बाबासाहेब सकाळी साडेआठ वाजता उठले रट्टूंनी त्यांचा निरोप घेऊन सायकलवरून आपल्या नोकरीवर निघून गेले. नंतर,रट्टू सायंकाळी साडेपाच वाजता आंबेडकरांकडे आले.रट्टूंना त्यांनी टंकलेखनाचे काम दिले.रात्री आठ वाजता जैनांचे प्रतिनिधी मंडळ पुर्वी ठरल्याप्रमाणे भेटीस आले. त्यांना नंतर कधीतरी भेटावे असा विचार बाबासाहेब करूलागले परंतु आता आलेच आहेत तर भेटून घेऊ म्हणून त्यांना थांबवले भेटीचा उद्देश विचारला. त्यांनी बाबासाहेबांच्या प्रकृतीची औपचारिक चौकशी केली. त्यावर ते उत्तरले, 'ठीक, चलता है.'नंतर काही वेळ बौद्ध धर्म आणि जैन धर्म यासंबंधी थोडी चर्चा केली. त्यांच्या मनावर त्या चर्चेचा परिणाम झालेला दिसला. त्यांनी बाबासाहेबांच्या हातात जैन और बुद्ध या ग्रंथाची एक प्रत प्रेमादरपूर्वक ठेवली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा एक समारंभ होणार होता. समारभास उपस्थित राहून आपल्या मुनींशी काही मुद्यांवर चर्चा करावी अशी त्यांनी आबेडकरांना विनंती केली. प्रकृती नीट असली तर आपण उपस्थित राहू असे बाबासाहेब उत्तरले. आणि भेटीस आलेल्या शेवटच्या लोकांनी त्यांचा निरोप घेतला. आंबेडकर जैन नेत्यांशी बोलत असतानाच त्यांचे मेहूणे डॉ. माधवराव | मालवणकर रात्रीच्या विमानाने मुंबईस परतले'नानकचंद रट्टू बाबासाहेबांचे पाय रगडू लागले. आपल्या डोक्यावर तेल चोळण्यास त्यांनी रट्टूना सांगितले. तसे त्यांनी केले. बाबासाहेबांना थोडे बरे वाटले. इतक्यात एकाएकी एक शांत आनंददायी मधुर आवाज ऐकू येऊ लागला. आवाज बाबासाहेबांचा आहे हे रटूंनी ओळखले. ते डोळे मिटून उजव्या हाताच्या बोटांनी सोफ्याच्या हातावर ठेका धरून गाणे गात होते. हळूहळू गाणे स्पष्ट ऐकू येऊ लागले. 'बुद्धं सरणं गच्छामि' ह्या पदाच्या ओळी स्पष्टपणे ऐकू येऊ लागल्या. रेडिओग्रामवर त्या आवडत्या गाण्याची तबकडी लावण्यास त्यांनी रट्टूंना आज्ञा केली. त्या तबकडीबरोबरच ते गाणे अगदी तन्मयतेने तालसुरात म्हणू लागले.त्याच वेळी सुदामा गंगावणे या स्वयंपाक्याने वर्दी दिली की जेवण तयार आहे. बाबासाहेब म्हणाले, 'थोडा भात घेऊन ये. दुसरे काही नको." ते त्या गाण्याच्याच तंद्रीत होते. स्वयंपाक्याने दुसऱ्यांदा वर्दी दिल्याबरोबर बाबासाहेब जेवणाच्या खोलीत जावयास निघाले. रट्टूंच्या खांद्यावर हात ठेवून चालत जात असता, स्वयंपाकघरात प्रवेश करण्यापूर्वी, त्यांनी निरनिराळ्या कपाटांतून काही ग्रंथ काढून घेतले. जीवनातील त्या महान नि खऱ्या मित्रांकडे पुन्हा एक आशाळभूतपणे दृष्टिक्षेप टाकून ते आत गेले. रटूटूंच्या मदतीने ते एका खुर्चीत, स्वयंपाकघराकडे तोंड करून बसले. त्यांनी अगदी थोडे अन्न खाल्ले आणि रट्टूंना डोके चोळावयास सांगितले. त्यांनी दोनचार मिनिटे डोके चोळल्यावर हातात सोटा घेऊन कबीराचे 'चलो कबीर तेरा भवसागर डेरा' हे पद गुणगुणत ते उठले.ते स्वयंपाकघराला लागून असलेल्या शेजघरात ते गाणे गुणगुणत त्यांनी प्रवेश केला.पंधरावीस मिनिटांपूर्वी कपाटातून आणलेले ग्रंथ त्यांनी चाळून पाहिले ते टेबलावर तसेच ठेवून दिले. ते आपल्या बिछान्यावर पडले आणि रट्टूंना हळूहळू पाय रगडावयास सांगितले. आता रात्रीचे ११ वाजले होते. आदल्या रात्री रट्टू घरी गेले नव्हते. बाबासाहेबांच्या डोळ्यावर झोप आहे असे पाहून आपणही आता घरी जावे असे रटूंना वाटले. त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी टेबलावरचे एकदोन ग्रंथ इकडचे तिकडे ठेवले. बाबासाहेबांनी वर पाहिले, तेव्हा रट्टूंनी बाबासाहेबांची रजा घेतली आणि सायकलीवरून ते आवाराच्या दरवाजापर्यंत जातात न जातात तोच त्यांना सुदामाने हाक मारली. बाबासाहेब तुम्हांला बोलावताहेत,असे तो म्हणाला. बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याचा धम्म' या ग्रंथाचा उपोद्घात नि प्रस्तावना यांच्या टंकलिखित प्रती कपाटातून काढून आणून टेबलावर ठेवण्यास सांगितले 'उपोद्घात नि प्रस्तावना रात्री पुन्हा वाचून पाहीन.असे ते म्हणाले काही पत्रे पण होती ती पत्रे दुसऱ्या दिवशी टपालातून रवाना होणार होती. सुदामाने साहेबांच्या खाटेजवळ कॉफीने भरलेला थर्मास नि मिठाईची एक बशी ठेवली. गेली पाच वर्षे बाबासाहेबांच्या जिवास जपणारी त्यांची डॉ. पत्नी किंवा त्यांचा नोकर यांना बाबासाहेबांच्या खाटेच्या मागे मृत्यू दबा धरून बसला होता ह्याची किंचितसुद्धा कल्पना नव्हती.६ डिसेंबर १९५६ च्या सकाळी डॉ. सौ. सविताबाई नेहमीप्रमाणे उठल्या. साडेसहा वाजता त्यांनी आपल्या पतीकडे पाहिले तेव्हा त्यांचा एक पाय उशीवर टेकलेला दिसला. बागेत एक चक्कर मारून त्या नेहमीप्रमाणे बाबासाहेबांना उठविण्यास गेल्या.त्यांनी त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना चिरनिद्रा लागली होती !आपले पतिराज हे जग सोडून गेले आहेत असे - समजताच त्यांना भयंकर धक्काच बसला. त्यांनी रट्टूंना आणावयास गाड़ी पाठविली.रट्टू आले.रट्टूंना पाहताच डॉ. सविताबाई सोफ्यावर दुःखभराने-कोसळता कोसळता असहाय्यपणे उद्गारल्या, 'रट्टू, बाबासाहेब आपल्याला सोडून गेले ! रट्टूंना ती दुःखद वार्ता सहन झाली नाही. आपल्या कापर्या आवाजात ते अडखळत उद्गारले, 'काय बाबाऽऽसाहेब गे...ती दोघे बाबासाहेबांच्या शयनघरात गेली.बाबासाहेबांच्या मृत शरीरात हृदयाचे पुन्हा चलन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांचे हातपाय रगडले खाली वर केले. छाती आणि पोट यांतील पडदा रगडून तोंडात एक चमचाभर ब्रँडी ओतली. परंतु श्वासोच्छ्वास सुरू झाला नाही. झोपेतच त्यांचे प्राणोत्क्रमण झाले होते. आंबेडकरांना मधुमेहाच्या विकारामुळे मज्जातंतूचा असाध्य असा विकार जडलेला होता आज त्यांची ह्रदय क्रिया कायमचीच बंद पडली.दहा वर्षांपूर्वी बाबासाहेब म्हणाले होते जोपर्यंत शोषित पीडित वंचितांच्या सेवेसाठी माझ्या अस्तित्वाची आवश्यकता आहे तोपर्यंत मला आयुष्य लाभेल आपण आता फार काळ जगत नाही, तरी तुमच्या मनाची तशी तयारी ठेवा असे त्यांनी चार वर्षांपूर्वीच आपले मुख्य सहकारी भाऊराव गायकवाड यांना कळविले होते.नानकचंदने बाबासाहेबांच्या वर्तुळातील लोकांना ही वार्ता कळविली. मध्यवर्ती सरकारच्या मंत्र्यांनाही ही बातमी कळविली. वणव्याप्रमाणे ती भयंकर बातमी दिल्लीत पसरली.
सर्व चाहते, सरकारी अधिकारी आणि कार्यकर्ते २६ अलिपूर रोड येथे धावून आले. बाबासाहेबांच्या अंत्यदर्शनासाठी निवासस्थानाच्या बाहेर प्रचंड गर्दी जमली.मुंबईतील सहकाऱ्यांना नि कार्यकर्त्यांना मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालयात दूरध्वनीने कळविण्यात आले."रात्रीच्या विमानाने शव मुंबईस आणण्यात येईल,'असे दिल्लीतील कार्यकर्त्यांकडून कळविण्यात आले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू निवासस्थानी धावत आले.'आंबेडकर हे भारताच्या मंत्रिमंडळातील एक अनमोल रत्न आहे, अशी पंडित जवाहरलाल नेहरू येणाऱ्या परदेशी पाहुण्यांना आंबेडकर विधिमंत्री असतांना त्यांची ओळख करून देत असत. बाबासाहेब जेव्हा त्यांना संसदेच्या दिवाणखान्यात किंवा समारंभात भेटत असत तेव्हा त्यांच्या प्रकृतीची नेहरू आस्थापूर्वक चौकशी करीत. त्यांनी आंबेडकरांच्या निवासस्थानी येताच अत्यंत सहानुभूतीने डॉ. सवितामाईंजवळ विचारना केली. 'प्रेतयात्रेसंबंधी कोणती व्यवस्था करावयाची तुमची ईच्छा आहे, अशी आंबेडकरांच्या अनुयायांकडे त्यांनी चौकशीकेली.गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत,दळणवळण मंत्री जगजीवनराम आणि राज्यसभेचे उपसभापती ईत्यादी डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अंत्य दर्शनासाठी आले.सर्व गोष्टी लक्षात घेवून जगजीवनराम यांनी मुंबईस
बाबासाहेबांचे शव नेण्यासाठी विमानाची सोय केली. दुपारी आकाशवाणीवरून ती बातमी ऐकताच लक्षावधी भारतीयांचे ह्रदय दुखःने हादरून गेले. एव्हाना हजारो लोकांनी आंबेडकरांच्या निवासस्थानाबाहेर प्रचंड गर्दी केली होती. आजूबाजूच्या वस्तीतील रहदारी बंद पडली. एका मोठ्या ट्रकमध्ये मंच तयार करून बाबासाहेबांचे शव ठेवण्यात आले.आणि बाबासाहेब अमर रहे या घोषणेने प्रेतयात्रेला त्यांच्या निवासस्थानापासून आरंभ झाला.मार्गावर हजारो लोक दुतर्फा उभे होते. शवाची गाडी येताच ते त्या महान पुरुषास वंदन करीत होते. विमानतळाजवळ यायला प्रेतयात्रेला पाच तास लागले रात्रीचे नऊ वाजले. नेहरूंनी एका खास दूताकरवी शवास हार घातला. लोकसभेचे कार्यवाह आणि राज्यसभेचे कार्यवाह यांनी त्या महान संसदपटूला पुष्पहार घातले. लोकसभेचे अनेक सभासद, दिल्लीतील प्रमुख वकील यांनी त्या विख्यात विद्वान राजकारणी पुरुषाला वंदन केले विमान दिल्लीहून रात्री साडेनऊ वाजता निघाले त्यात शंकरानंदशास्त्री, भिक्कू आनंद कौसल्यायन, डॉ. सवितामाई आंबेडकर नानकचंद रट्टू,सुदामा आणि शंकरलाल शास्त्री आणि काही जण होते. विमान विमानतळावर पहाटे ३ वाजता आले. तेथून शव दादर येथील बाबासाहेबांच्या पूर्वीच्या निवासस्थानी नेले. तेथे लक्षावधी शोकग्रस्त जनता आपल्या ऊद्धारकर्तयाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आठ-दहा तासांपासून विव्हळत बसले होते. सर्व मुंबापुरी त्या दुःखसागरात बुडून गेली होती. ७ डिसेंबर रोजी मुंबईतील सर्व कारखाने, गोद्या, रेल्वेकारखाने कापडगिरण्या बंद होत्या मुंबई नगरपालिकेतील झाडलोट खात्यातील नोकर वर्ग कामांवर गेला नाही. शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे बंद होती नागपूर तसेच निरनिराळ्या शहरांत उत्स्फूर्तपणे हरताळ पाळण्यात आला. मिरवणुका निघाल्या.अहमदाबाद येथील कापडगिरण्या बंद करण्यात आल्या. त्या भयंकर दु:खाने लोकांचे हातपाय गळाले. काहींना तर मूर्च्छा आली.दुपारी
प्रेतयात्रेसंबंधी सर्व व्यवस्था पूर्ण झाली. बाबासाहेबांचे शव फुलांनी आणि पुष्पहारांनी भरलेल्या एका ट्रकवर ठेवण्यात आले. शवाच्या ऊशाजवळ भगवान बुद्धाची मूर्ती ठेवण्यात आली, सभोवती पेटविलेल्या मेणबत्या ठेवण्यात आल्या चारी कोपऱ्यांत धूप ठेण्यात आला होता. दुपारी दीड वाजता प्रेत यात्रेस आरंभ झाला. ज्या रस्त्याला आता आंबेडकर रस्ता म्हणतात तो पूर्वीचा व्हिन्सेंन्ट रस्ता,पोयबावडी, एल्फिन्स्टन पूल, सयानी रस्ता, गोखले रस्ता या मार्गाने प्रेतयात्रा दादर हिंदू स्मशानात आली. उत्तर मुंबईतील सर्व रहदारी पाच तासांवर बंद पडली होती. एवढ्या मोठ्या प्रचंड मार्गावर त्या महापुरुषाच्या अंत्यदर्शनासाठी दुतर्फा मुंग्यांसारखी माणसे गर्दी करून उभी होती. घरांची छप्परे, गच्च्या, झाडे ही माणसाच्या रंगीबेरंगी कपड्यांनी भरली होती. आसपासच्या जिल्ह्यांतील शेकडो लोक खास गाड्या करून झाले आणि त्या दोन मैल प्रेतयात्रेत सामील झाले. प्रेतयात्रेची गाडी नेत असता शवावर लोकांनी फुले नि पुष्पहार यांचा पाऊस पाडला. शवाचे दर्शन जनतेला नीट व्हवे म्हणून हारांचा अन् फुलांचा वाढत जाणारा ढीग दर चारपाच मिनिटांनी बाजूला करण्यात येई. मुंबईतील मंत्री नि काँग्रेसचे नेते यांनी रस्त्यात शवाला पुष्पहार घातले.अशा प्रकारे चार तासांनंतर मुंबई शहराच्या आठवणीतील सर्वात मोठी प्रेतयात्रा दादर हिंदू स्मशानभूमीत आली. शेकडो पोलीस स्मशानभूमीत व्यवस्थेसाठी उभे होते. उच्च श्रेणीचे पोलीस अधिकारी जातीने व्यवस्था पाहत होते. पाच लाखांपेक्षा अधिक मोठ्या जनसमुदायाने स्मशानात बौद्ध भिक्षूंकडून अंत्यसंस्काराचे विधी होत असताना पाहिले आपल्या दिवंगत नेत्याची अंतिम इच्छा पुरी करण्यासाठी एक लक्षावर अनुयायांनी त्यांच्या देहा-समक्ष बौद्ध धर्माची दिक्षा घेतली. आंबेडकरपुत्र यशवंतराव यांनी सायंकाळी ७॥ वाजता चिता पेटविताच तो जनसमुदाय दुःखसागरात बुडून गेला. मुंबई नगरीच्या पोलिसांनी मृत महान नेत्याला शेवटची मानवंदना दिली. अशा तऱ्हेचा सन्मान बिनसरकारी व्यक्तीला मुंबईत हा प्रथमच देण्यात आला.चितेजवळ बोलताना भिक्कू आनंद कौसल्यायन म्हणाले, 'डॉ. आंबेडकर एक महान नेते होते. त्यांनी देशाची सेवा करून निर्वाण प्राप्त करून घेतले.' मलायातील नि सिलोनमधील भिक्षूंनी मृत बौद्ध नेत्याला आदरांजली वाहिली.आचार्य प्र.के.अत्रे यांनी आपल्या पहाडी आवाजात म्हटले की,आबेडकरांनी दलितांच्या हक्कासाठी त्याग केला आणि लढा केला.अत्रे यांचे भाषण ऐकून या जनसागराला पुन्हा दु:खाची भरती आली. स्मशानाबाहेर समुद्रकिनान्यावर शोकग्रस्त अवस्थेत उभ्या असणाऱ्या जनतासागराच्या दुःखात सागर सुद्धा सामील झाला. अत्रे पुढे म्हणाले, आंबेडकरांनी अन्याय, छळ नि विषमता यांच्याशी लढा केला. हिंदू धर्माच्या विरुद्ध त्यांनी बंड केले नाही. तो सुधारण्याचा प्रयत्न केला.मुंबई विधिमंडळाचे सभापती सीलम,मुंबईसरकारचेमुख्यसचिव,डाॅ.सविताआंबेडकर,मुकुंदरावआंबेडकर,रावबहादूरबोले,आंबेडकरांचे सहकारी भाऊराव गायकवाड,रा.धो.भंडारे,बा.च.कांबळे,पुं.तु.बोराडे आणि आंबेडकरांचे मित्र मो. वा. दोंदे आदी मान्यवर नेते आणि प्रतिष्ठित नागरिक स्मशानात उपस्थित होते.ज्या दिवशी सांची येथे आठ दिवसांचा २५०० वा बुद्ध जयंतीला उत्सव पूर्ण झाला त्याच दिवशी ७ डिसेंबर १९५६ ला
आंबेडकरांचा पार्थिव देह दृष्टिआड व्हावा ही विधिघटना किती विलक्षण ! सर्व राष्ट्राने आंबेडकरांच्या निधनासंबंधी शोक केला देशाचा एक महान सुपुत्र हरवला आहे असे सर्व पक्षांनी उद्गार काढले गेल्या तीस वर्षांपेक्षा अधिक काळ राष्ट्राच्या घडामोडीत धडाडीने भाग घेउन अनेकविध महत्त्वाचे नि प्रभावी कार्य केले ती व्यक्ती हिंदी राजकारणाच्या पटावरून काळाने हिरावून नेली, त्यांच्या मृत्यूने जगातील लोकशाही निर्बल झाली. लोकशाहीच्या मतप्रणालीचा एक मोठा कैवारी नाहीसा झाला, राज्यघटनेचे प्रचंड कार्य नि हिंदुसंहितेसंबंधी कार्य करून त्यांनी राष्ट्राची जी सेवा केली त्याविषयी स्मरण करून पंतप्रधान जवाहरलाल नेहरू लोकसभेत म्हणाले की, 'हिंदू समाजातील छळ करणाऱ्या सर्व प्रवृत्तीविरुद्ध बंड करणारी व्यक्ती म्हणून आंबेडकरांचे प्रामुख्याने स्मरण राहील.त्यांनी सरकारी कामकाजात मोठे विधायक नि महत्त्वाचे कार्य केले. त्यांनी ज्याविरुद्ध बंड केले त्याविरुद्ध प्रत्येक व्यक्तीने बंड केले पाहिजे. आंबेडकर अलौकिक पुरुषांच्या मालिकेतील असल्यामुळेच नेहरूंनी लोकसभेचे कामकाज त्यांच्या सन्मानार्थ एक दिवस बंद ठेवावे अशी विनंती केली. आंबेडकरांच्या मृत्यूमुळे भारत एका खऱ्या महापुरुषाला मुकला असे वि.दा. सावाकर उद्गारले. त्या वेळचे मुंबई सर्वोच्च न्यायालयाचे हंगामी न्यायाधीश "कोयाजी म्हणाले, आंबेडकर ध्येयनिष्ठ जीवन जगले. दलितांचा उद्धार करणे त्यांचे जीवितकार्य होते. त्यांची पताका त्यांनी उंच धरली आणि ते कार्य त्यांनी शेवटच्या घटकेपर्यंत सोडले नाही.भारताचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद म्हणालेत की आंबेडकर आमच्या घटनेचे शिल्पकार आहेत आणि त्यांची अनेक क्षेत्रातील सेवा आणि विशेषत: दलितांच्या उद्धाराकरिता केलेली सेवा फार महनीय आहे राजगोपालाचारी म्हणाले, आंबेडकरांच्या रागाचे दर्शन म्हणजेच बौद्ध धर्माची त्यांनी घेतलेली दीक्षा.भारत देशविदेशातील विविध वृत्तपत्रांत आंबेडकरांच्या विविध कार्याचा गौरव करण्यात आला.न्यूयाॅर्क टाइम्स दैनिक म्हणाले मुख्यतः अस्पृश्यांचे कैवारी म्हणून आंबेडकरांचे नाव सर्व जगास माहीत होते. जे कदाचित माहीत नव्हते ते हे की,त्यांनी आपल्या व्यक्तित्वाचा ठसा भारताच्या नैरबंधिक रचनेच्या मोठ्या भागावर उठविलेला आहे. लंडन येथील टाइम्स दैनिक म्हणाले, ब्रिटीश सत्तेच्या शेवटच्या काळातील भारतातील सामाजिक आणि राजकीय उत्क्रांतीचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा त्यात आंबेडकरांच्या नावाचा प्रामुख्याने नि:संशय
उल्लेख होईल. ब्रह्मदेशाचे त्या वेळचे पंतप्रधान यांनीही आपले मत एका समारंभाच्या अध्यक्षपदावरून बोलून दाखविले. ते म्हणाले, आंबेडकर ही एक नामांकित व्यक्ती होती. बदलणारे प्रवाह आणि परिस्थिती जेव्हा राष्ट्राच्या सामाजिक रचनेवर आणि जीवनावर मोठा परिणाम करीत आहेत, त्या वेळी त्यांनी हिंदुस्थानातील मोठी ऐतिहासिक कामगिरी केली. देशातील सामाजिक जीवनपद्धतीत फरक घडून येत असता तिला गती देणाऱ्यांपैकी आंबेडकर हे एक होत.
आंबेडकर ही एक कर्तृत्ववान, बुद्धिमानअष्टप्रैलू व्यक्ती होती. निराळ्या परिस्थितीत त्यांनी आपल्देशाची याहीपेक्षा फार मोठी सेवा केली असती, असे मुंबईच्या 'टइम्स ऑफ इंडिया' दैनिकाने मृत्युलेखात म्हटले 'अंबाल्यातील 'ट्रिब्यून' ह्या दैनिकाने म्हटले, 'जर असे कार्य हाती घेणारे आंबेडकर कार्य करीत असता बहुतांशी एकाकी पडले, तर त्यांच्या जीवनाला जी निराशा आणि विफलता ग्रासून टाकते ती व्यक्त करण्याचे त्यांनी टाळावे अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे. दिल्लीच्या हिंदुस्थान टाइम्स' दैनिकाने म्हटले,त्यांनी केलेल्या देशाच्या महान सेवेची आठवण मागे राहील," मुंबईचे प्रेस जर्नल' दैनिक म्हणाले, 'अन्यायाच्या विरुद्ध सात्विकपणे झगडणारा एक नेता म्हणून देशाला आंबेडकरांची आठवण चिरकाल राहील.'आंबेडकरांची कारकीर्द म्हणजे बुद्धिमत्ता नि मनोनिग्रह यांचा झगडा होय असे वर्णन करून कलकत्याच्या स्टेट्समन' दैनिकाने म्हटले, त्यांची विद्वत्ता व निर्बंधशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, कामगार आणि राजकारण या निरनिराळ्या शास्त्रांतील नि क्षेत्रांतील त्यांचा अनुभव ह्यांनी त्यांना वेगळ्या परिस्थितीत आणखी ठसठशीत अशी भर टाकण्यास समर्थ केले असते.आंबेडकरांच्या आश्चर्यकारक कारकिर्दीचा गौरव करून, कलकत्याचे अमृत बझार पत्रिका' दैनिक म्हणाले, 'अन्यायी नि माणुसकीचे हक्क नाकारणाऱ्या समाजरचनेचा विध्वंस करण्याचा जणू आंबेडकरांच्या लढाऊ वृत्तीने विडाच उचलला होता.ज्या थोर गुणांमुळे ते देशाचे सुपुत्र ठाले होते, त्या थोर गुणांचे नि थोर देशभक्तीचे सर्व देशबंधूना पुन्हा एकदा त्यांच्या मृत्यूने स्मरण करून दिलेले आहे.'आणि म्हणूनच दि.०८/१२ १९५६ च्या मराठा मध्ये प्र.के.अत्रे यांनी एक लेख लिहीला त्यात ते म्हणतात की,महापुरुषाचे मरण पाहू नये असे म्हणतात!पण ते म्हणतात त्याप्रमाणे महापुरुषाचे मरण पाहण्यास भाग्य लागते.कारण युगायुगाने घडणारी ही घटना असते.किंबहुना, महापुरुषांच्या जन्मापेक्षा त्यांचे मरणच मोठे असते पासष्ट वर्षांपूर्वी आबेडकरांचा जन्म जेव्हा लष्करातल्या एका सुभेदाराच्या पोटी झाला तेव्हा शेजारच्या चारदोन माणसांपेक्षा ती गोष्ट कोणाला माहीत होती? पण भारताच्या राजधानीत ज्यादिवशी त्यांचा जीवनग्रंथ जेव्हा पूर्ण झाला तेव्हा साऱ्या जगाने त्यांच्यासाठी अश्रू ढाळले.आंबेडकरांचे जीवन तर मोठे होतेच ह्यात काही शंकाच नाही पण त्यांचा मृत्यू एवढा मोठा होता की महापुरुषांनी त्यांचा हेवा करावा. आंबेडकरांच्या महानिर्वाणाला दहा लाखाच्या वर लोकं मुंबईत हजर होते. भारतात आजपर्यंत पुष्कळ मोठी माणसे मरण पावली असतील, पण ज्यांच्या मृत्यूने कोटयावधी अंतःकरणे रक्तबंबाळ झाली आणि कोट्यावधी नेत्रांमधून अश्रूच्या धारा वाहिल्या असे मरण म्हणजेच आंबेडकरांचेच. मृत्यूमुळे माणसांना दुःख होणे साहजिकच आहे; परंतू आंबेडकरांच्या मृत्यूमुळे त्यांच्या अस्पृश्य समाजाला जे दुःख झाले त्याचे शब्दांनी वर्णनसुद्धा करणे अशक्य आहे. हजारो स्त्री-पुरुष 'बाबां'साठी धाय मोकलून आक्रोश करतांना आम्ही डोळ्यानी पाहीले आहे.'बाबा गेल्यानंतर आता आम्हाला जगून काय करायचे?' असा शोक करता करता कित्येकांना तर मूर्च्छा आली. आंबेडकरांच्या मोठेपणाबद्दल ज्या लोकांना आतापर्यंत संशय वाटत असेल त्यांनी त्यांच्या महानिर्वाणाचे विराट दृश्य पाहावयाला हवे होते. ते दृश्य पाहून त्यांचे जन्मन्मांतरीचे शत्रूदेखील त्यांचे चाहते झाले असते. पण दुर्दैवाची गोष्ट ही की, सूर्यप्रकाशासारखा स्वच्छ दिसणाऱ्या ह्या महापुरुषाचा मोठेपणा न दिसण्याइतकी आंधळी माणसे अजूनही आपल्यात आहेत. आंबेडकरांचा अंत्यसंस्कार चौपाटीच्या वाळवंटावर व्हावा अशी परवानगी त्यांच्या लक्षावधी अनुयायांनी मुंबई राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याकडे मागितली. टिळक आणि विठ्ठलभाई पटेल ह्या महान देशभक्तांच्या रांगेत आंबेडकरांचा पुतळा चौपाटीच्या वाळवंटावर उभा राहिला असता तर रोज समुद्राआड मावळणारा सूर्य अस्ताचलावर चारदोन मिनिटे तरी अधिक रेंगाळला असता; पण महापुरुषाची सेवा करण्याची ही महान संधी कर्मदरिद्री यशवंतरावांनी दवडली.असो, पण बाबा गेले
कोटी कोटी अस्पृश्य तसेच भारतीय संविधानाचा पुरेपूर लाभ घेणारे तमाम भारतीय आज पोरके झालेत कारण त्यांचा आधार गेला.जुलमी आणि ढोंगी विषमतेविरूद्ध जन्मभर प्राणपणाने झगडणारा झुंजार लढवय्या सामाजिक न्यायासाठी आणि माणुसकीच्या हक्कांसाठी ज्यांनी जन्मभर आकाश पाताळ एक केलेअसा बहादूर बंडखोर नेता आजच्या दिवशी आमच्या मधून निघून गेला.स्त्री शुद्राच्या उद्धारासाठी झटणाऱ्या महात्मा फुल्यांवर हिंदू समाजाने मारेकरी घातले.कबीराचे हातपाय बांधून पाण्यात टाकण्यात आले, हत्तीच्या पायी देण्यात आले. आणि मग तो मेल्यानंतर हिंदू- मुसलमानांना त्याच्या बद्दल एवढे प्रेम वाटू लागले की त्याच्या प्रेताचा ताबा घेण्यासाठी ते एकमेकांचा खून करावयास सिद्ध झाले. बौद्ध धम्माचा भारतातून उच्छेद करण्यासाठी भगवान बुद्धांच्या अनुयायांच्या कत्तली करण्यात आल्या हाल अपेष्टा आणि छळ ह्यांचे हलाहल ज्यांना हयातीत आणि मेल्यानंतरही प्राशन करावे लागले अशा बंडखोर गुरूंचे आंबेडकर हे सच्चे चाले होते.अशा या अथांग ज्ञानाच्या सागरास, भारत रत्न,विश्वभूषण, भारतीय घटनेचे एकमेव शिल्पकार परम् पुज्य बोधिसत्व बाबासाहेब डाॅ.भीमराव रामजी आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी वंदन.
जयभीम जयभरात ....!
संदर्भ : डाॅ.बाबासाहेब आंबेडकर (धनंजय कीर)
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर अनुभव आणि आठवणी
(नानकचंद रत्तू)
डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासातील 25 वर्ष मराठी-(सोहनलाल शास्त्री,विद्यावाचस्पति)
मानवतेचे कैवारी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर
(आचार्य प्र.के.अत्रे).
राजेश वसंत रायमळे (एम.ए.एल.एल.बी.)
संपर्क क्रमांक.९७६४७४२०७९