जयभीम हे शौर्य आणि स्वाभिमानाचे प्रतिक असून ती या भारत देशातील अस्सल शंभर नंबरी सोन्याची परख आहे.या देशाचा इतिहास गौरवपूर्ण आणि शौर्यशाली राहिलेला आहे.आपल्या देशात जेव्हा अशा लोकांच्या हातात सत्ता आली जे तथागत गौतम बुद्ध यांच्या धम्माला मानत नव्हते.[ads id="ads1"]
त्यांनी बुद्धानुयायांना जबरदस्तीने शुद्रातिशुद्र आणि अस्पृश्य बनवून सोडले.त्यापैकीच एक जात म्हणजेच महार जात होय.डाॅ.भदंत आनंद कौसल्यायन म्हणतात की,वेडन पावेलच्या मतानुसार एक काळ असा होता जेव्हा महाराष्ट्रात महार जातीचे प्रमुख स्थान होते.त्यांचे स्वतःचे नियम कायदे होते.[ads id="ads2"]
स्वतःचा धर्म आणि चालीरिती होत्या.ज्या जातीने एके काळी वैभवाचे दिवस पाहीले होते त्याच जातीचे खुप वाईट दिवस आले.महार ही अस्पृश्य गणलेल्या जातिंपैकीच एक जात होती.अस्पृश्यतेचा विचार केला तर हिंदू समाजातील प्रत्येक पाचवा घटक पुरूष, स्त्री वा मुल अस्पृश्य गणले जाई.भारताच्या विविध भागांत कोणी त्यांना बहिष्कृत, अस्पृश्य, परिया किंवा अतिशुद्र म्हणत,तर कोणी त्यांना अंत्यज,अवर्ण अथवा नामशुद्र म्हणत.अस्पृश्यतेने त्यांचे जीवन शापित होते.सवर्ण हिंदूंना कुत्रे,मांजर,गाय अशा जनावरांच्या स्पर्शाचा विटाळ वाटत नसे ते मुग्यांना साखर अर्पण करित परंतू स्वधर्मीय अस्पृश्यांचा विटाळ मनित त्यांना अस्पृश्यांच्या सावलीचाही विटाळ होई.
अस्पृश्य वर्गाला सार्वजनिक पाणवठ्यावर बंदी,शाळा प्रवेश बंदी,देऊळ बंदी निचतेचा उच्चांक गाठलेल्या उच्च वर्णीय हिंदूंच्या निर्दयतेमुळे अस्पृश्य समाजाचे जीवन मातीमोल झाले होते.एकंदरित धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व्यावसायिक बंधनांमुळे हा हत्तीसारखा समाज अगदी माणूसकीस पारखा झाला होता.दस्तूरखुद्द महात्मा जोतीराव गोविंदराव फुले यांनी आपल्या गुलामगिरी या पुस्तकात नमुद करून ठेवलेले आहे की,मांगामहारांचे पुर्वी परशुरामाशी एकवीस वेळा लढणारे महर्षी क्षेत्रीय होते.पुढे महाअरी या शब्दाचा अपभ्रंश होऊन महार शब्द प्रचलित झाला.
महात्मा फुले गुलामगिरी पुस्तकात म्हणतात ब्रम्हाने येथील मुळच्या क्षेत्रवासी लोकांस दास केल्यानंतर तो गर्वाने इतका फुगला होता की,महाअरिंनी त्याचे नाव थट्टेने प्रजापती पाहीले होते असा तर्क निघतो.परंतु ब्रम्हा मेल्यावर आर्य लोकांच्या मुळच्या भट नावाचा लोप होत जाऊन त्यांचे नांव ब्राह्मण पडले. प्रजापति मरतांच बाकीच्या उरलेल्या महाअरींनी ब्राह्मणांच्या हाती सांपडलेल्या आपल्या बांधवांस ब्राह्मणांच्या दास्यत्वापासून सोडविण्यासाठी परशुरामाशी एकवीस वेळां इतके निकरानें लढाया केल्या की, त्यांचें अखेरीस द्वैती म्हणून नांव पडले व त्या शब्दाचा पुढे अपभ्रंश 'दैत्य' झाला. जेव्हां परशुरामानें एकंदर सर्व महाअरींचा मोड केला, तेव्हां कित्येक महाविरांनीं निराश होऊन, आपल्या स्नेह्यांच्या मुलुखांत जाऊन आपले शेवटचे दिवस काढिले. म्हणजे जेजुरीच्या खंडेरावानें जसा रावणाचा आश्रय केला, त्याचप्रमाणे नऊ खंडाचे न्यायी व सात आश्रय या सर्वांनी तळकोंकणांत जाऊन तेथें छपून आपले शेवटचे दिवस काढिले. त्यावरून ब्राह्मणांनी केवळ धिक्कारानें नऊखंडांचा जो न्यायी त्याचे स्त्रीवाचक निंद्य नांव नऊखणाची जाणाई व सात आश्रयांचें नांव सातीअसरा पाडिलें.
बाकी जेवढे महाअरी परशुरामानें रणांगणीं कैदी केले तेवढ्यांपासून परशुरामानें, त्यांनी कधी पुनः ब्राह्मणांवर कंबरा बांधून येत म्हणून क्रियाभाक घेवून, एकंदर सर्वांच्या गळ्यांत एक एक काळ्या सुताचे दोऱ्याचें चिन्ह घालून, त्यांचा, त्यांचे शुद्र बांधवांनींसुद्धा त्यांना स्पर्श करून नये म्हणून प्रतिबंध केला. नंतर परशुरामानें त्या महाअरी क्षत्रियांस, अतिशुद्र, महार, अंत्येज, मांग आणि चांडाळ म्हणण्याचा प्रचार घालून, त्यांस इतकी पीडा देण्याची वहिवाट धारतली की, तिला या जगांत दुसरी तोडच सांपडणें नाहीं. उदाहरण - या निर्दयानें महार, मांग लोकांचा सूड उगविण्याच्या हेतूनें आपल्या लोकांचे मोठमोठे इमारतींच्या पायामध्यें कित्येक मांगांस त्यांचे स्त्रियांसह उभे करून, त्यांचे केविलवाणी ओरडण्याची कोणास दया येईल यांजकरिता त्यांचे तोंडात तेल व शेंदूर ओतून त्यांस जिवंतच त्या पायामध्ये दडपण्याचा वहिवाट घातली.व ती अतिक्रुर चाल मुसलमानांचे जसजसे प्राबल्य होत चालले तसतशी आपोआप बंद झाली.
याप्रमाणे भट लोकांच्या मुख्याधिकारी परशुरामानें शेंकडों क्षत्रिय लोक मारून त्यांचे बायकांमुलांची दुर्दशा करून टाकीली व त्यास हल्ली भट लोकांनी शूद्रांदि अतिशूद्र लोकांस सर्व शक्तिमान परमेश्वर, सर्व उत्पन्नकर्ता म्हणविण्यास लाविलें आहे, हे मोठे आश्चर्य आहे. परशुरामाचे पाठीमागे भट लोकांनी त्यांस कमी छळिलें असें नाहीं, तर त्यांनी आपल्याकडून जितकें छळवेल तितके त्यांस छळिलें, त्यांनी त्या लोकांपैकी बरेंच लोकांस त्वेषामुळे त्यांची दुर्दशा करून जिवंतच इमारतीचे पायांत दडपीत,त्यांनी त्या लोकांस इतके तुच्छ मानावें कीं, एखादे वेळेस कोणी शूद्र नदीकाठावर आपली वस्त्रे धूत असतां त्या स्थळी जर एखादा भट आला,तर त्या शुद्रास आपली सर्व वस्रे गोळा करून बर्याच दूर अंतरावर, जेथून भटांच्या अंगावर शिंतोडा येण्याचा संभव नसेल,अशा स्थळी जाऊन आपली वस्रे धुवावे लागत असे.
तेथून जर भटांच्या अंगावर शिंतोडा उडाला अथवा तसा खोटा भास झाला तर त्या भटाने अग्नीसारखे तप्त होऊन जवळचे भांडे त्याचे मस्तक रोखून त्वेशाने मारावे त्यामुळे त्याचे मस्तक रक्तबंबाळ होऊन मूर्च्छित होऊन जमीनीवर धाडकन पडावे,पुढे काही वेळाने शुध्दीवर येऊन आपली रक्ताने भरलेली वस्रे घेवून निमुटपणे निघून जावे.सरकारास जर कळवावे तर सर्व भटशाई पडली उलटी त्यास सजा देणार. एक दुःख आहे म्हणून सांगावेअशी व यासारखी अनेक दुःखे शुद्रातिशुद्रांस सोसावी लागत.भट राज्यात त्यांस व्यापाराच्य अथवा दुसर्या गोष्टीच्या संबंधाने फिरणे झाल्यास मोठी मारामार पडत असे, त्यातून प्रातःकाळी तर फारच अडचण पड़े,कारण त्यावेळेस सर्वांची छाया लांब पडते आणि अशा प्रसंगी जर कोणी शुद्र रस्त्याने जात असतां समोर रस्त्याने भट साहेबांची स्वारी येत आहे हे पाहून त्यांच्या अंगावर आपली छाया नपडावी या भीतीस्तव घड़ी दोन घडी आपला खोळंबा करून रस्त्याचे एके बाजूस होऊन त्यास बसावे लागत असे. भटजी गेल्यानंतर तो आपले कामास जाई, एखादवेळेस त्याची छाया भाटाचे आंगावर चुकून पडली तर तो भट लागलीच त्यास मारेमरेतो पर्यंत मारी आणि ताबडतोब नदीवर जाऊन स्नान करी.
त्यांपैकी कित्येक लोकास रस्त्यांत थुंकून्याची देखील पंचाईत याकरिता यांस भरवस्तीतून जाणे झाल्यास आप थुंकण्याकरिता एखादे भांडे ठेवावे लागत असे,जर त्यांच्या थुंका जमिनीवर पडून भट साहेबाने पाहिले म्हणजे त्या मनुष्याने असे समजावे की, आता आपले पुरे आयुष्य भरतले याप्रमाणे अनेक संकट भोगित भोगित ते फार त्रासून गेले होते इतक्यात या देशांत इंग्रज लोकांचे राज्य आले व त्यांच्याकडून ते भट लोक दास्यत्यापासून मुक्त झाले. ते इंग्रज सरकारचे त्याजबद्दल फार फार आभार मानतात सर्वस्वी त्यांचे ते ऋणी आहेत. त्याचे उपकार ते कधी विसरणार नाहीत त्यांनी त्यांस आज शेकडो वर्षांचे भट लोकांचे कैदखान्यातून मुक्त करून त्यांचे मुलाबाळांस सुखाचे दिवस दाखविले.ते नसते तर भटलोकांनी त्यांस केव्हांच धुळीस मिळविले असते.
भारतातील साऱ्या अस्पृश्य समाजात महार जात ही हाडाने कणखर,आवाजाने खणखणीत, अंगकांतीने तुकतुकीत, गुणाने बुद्धिमान नी वृत्तीने झुंझारअशी आढळते काळावर दृष्टी ठेवून सावधगिरीने वागणारी अशी जर कोणती जात असेल तर ती महारांचीच हिंदू समाजातील आपल्या कनिष्ट स्थानाची आणि लाजिरवाण्या जिण्याची बोचणी महारांना पदोपदी होत असे.ह्या नीच स्थितीतून मुक्त होण्यासाठी आपण धडपड केली पाहिजे, अशा जळजळीत जाणिवेने ते तळमळत असत. महार हेच महाराष्ट्राचे मूळचे रहिवासी असून त्यांच्याच नावावरून महाराष्ट्रस महाराष्ट्र असे नाव मिळाले असावे, असे काही इतिहाससंशोधकांचे म्हणणे आहे; तर महा अरि म्हणजे मोठा शत्रू अशीही महार शब्दाची व्युत्पती महात्मा फुले आणि ईतर काहीजण करतात. दक्षिण भारतात युरोपियन राजकारणी पुरुषांची सत्तेसाठी कारस्थाने चालू झाल्यावर त्यांनी चाणाक्षपणे ह्या उपेक्षित पण कडव्या महार जातीशी प्रथमतः संबंध जोडला. ईस्ट इंडिया कंपनीच्या 'बॉम्बे आमी' ह्या सेनाविभागासाठी कंपनी सरकारने महारांची पथके उभारली होती. त्या काळी बिहारातील दस्यू आणि मद्रास प्रांतातील परिया ह्या अस्पृश्य जमातींची अशीच डष्करी पथके कंपनी सरकारने उभारली होती.
अशा प्रकारे अस्पृश्यांमधील महार जात ही अतिशय लढाऊ आणि पराक्रमी जात असून त्यांच्या पराक्रमाला इतिहासात तोडच नाही एक काळ होता जेव्हा मध्ययुगीन भारतात१६ व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या महारांमधील शौर्य आणि धाडस पाहून सैन्यामध्ये त्यांना महत्त्वाच्या स्थान दिले होते.शिवाजी महाराजांच्या सैन्यापासून खऱ्या अर्थानं महार सैनिकाला ओळख मिळाली.पण छत्रपती शिवाजी महाराजांनी महारांना दिलेला लढवय्या हा सन्मान पेशवाई काळात जाणीवपूर्वक संपवला गेला. महार सैनिकांना पेशव्यांच्या राज्यात कधीच योग्य वागणूक मिळाली नाही . पेशवाईमध्ये अस्पृश्यता मोठ्या प्रमाणावर पाळली जात होती. महार, मांग आणि इतर अस्पृश्यतांना अतिशय हिन वागणूक दिली जात होती. त्यालाच विरोध म्हणून ५०० महार सैनिक आत्मसन्मानासाठी ब्रिटिशांच्या बाजूनं पेशव्यांच्या विरोधात लढले. फक्त लढलेच नाही तर कमी सैन्यबळ असूनही धाडसाच्या जोरावर विजयी झाले.पुण्यापासून २० किलोमीटर अंतरावर भीमा नदीच्या काठी असलेल्या कोरेगावात १ जानेवारी १८१८ रोजी ही लढाई झाली. या लढाईमध्ये इंग्रजांनी महार समाजातील सैन्याच्या बळावर पेशवाईविरुद्ध युद्ध पुकारले.महार रेजिमेंट’ने आपल्यापेक्षा संख्येने ४० पट अधिक असणाऱ्या पेशव्यांचा पराभव केला.‘या लढाईने एक इतिहास रचला या लढाईत पेशव्यांच्या बाजूनं २८ हजार सैनिक होते. बापू गोखले आणि त्रिंबकजी डेंगळे यांनी गोळा केलेल्या सैन्यात २० हजार अरबी घोडेस्वार, गोसावी, मराठे मिळून २८ हजार सैनिकांचा फौजफाटा होता.तर,ब्रिटिशांकडे केवळ ८३४ सैनिक होते. या सैनिकांना साथ मिळाली ती बॉम्बे नेटिव लाइट इन्फेंट्री तुकडीच्या ५०० महार सैनिकांची. पूना ऑक्झिलरी हॉर्सेसचे ३०० घोडेस्वार आणि मद्रास आर्टिलरी या तोफखान्याचे २४ जण. या तुकडीत सामील होते. पेशव्यांच्या सैनिकांच्या तुलनेत ब्रिटिशांचं सैन्य अर्ध देखील नव्हतं. एकप्रकारे मनाने हरलेली लढाई ब्रिटिश लढत होते. पण पेशवाईच्या काळात होणाऱ्या अस्पृश्यतेला विरोध म्हणून महार सैनिक आत्मसन्मासाठी ब्रिटिशांच्या बाजूने पेशव्यांशी लढले आणि विजयी झाले. या युद्धात पराभूत झालेल्या पेशवा साम्राज्याचा अस्त झाला.
महार रेजिमेंट’ने पेशवाईच्या सैन्याचा धुव्वा उडवल्याने अवघ्या १६ तासांमध्ये पेशव्यांच्या सैन्यावर पराभव पत्करण्याची वेळ आली. त्यानंतर या समाजातील सैनिकांनी अखेर १ जानेवारी १८१८ ला सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आपला विजय झाल्याची घोषणा करतानाच पेशव्यांच्या सैन्यावर कब्जा केला. भीमा कोरेगावच्या या लढाईत ‘महार रेजिमेंटचा विजय झाला.
या युद्धात महार सैनिकांनी पेशव्यांना सळो की पळो करून सोडलं. या लढाईचं नेतृत्व करणारे बापू गोखलेंना यात वीरमरण आलं. त्यानंतर साडेतीन महिन्यांनंतर दुसरा बाजीराव इंग्रजांना शरण आला आणि मनाने हरलेली लढाई ब्रिटिश महार सैनिकांच्या शौर्यावर जिंकले.भीमा-कोरेगावच्या युद्धानंतर ब्रिटिशांनी शूर महार सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी ७५ फूट उंच विजयस्तंभ उभारला. त्यावर २० शहीद आणि ३ जखमी महार सैनिकांची नावे कोरलेली आहेत. याशिवाय स्तभांवर ‘One of the Triumphs of the British Army of the Earth’, असं लिहण्यात आलं आहे
भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिली होती. बाबासाहेबांच्या या भेटीची नोंद इतिहासात ठेवण्यात आली आहे.
संदर्भ :-भीमा कोरेगाव लढाई आणि महारांच्या लष्करी सेवेचा इतिहास(आचार्य सूर्यकांत भगत )
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर(धनंजय कीर)
गुलामगिरी (महात्मा फुले)(सुधीर प्रकाशन)
यदी बाबा न होते!(डाॅ.भदंत आनंद कौसल्यायन)
भ्रमणध्वनी:-९७६४७४२०७९

