विशेष लेख : समाज क्रांतीची प्रखर ज्योत - सावित्रीमाई ज्योतिराव फुले

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

जयभीमचा निनाद आज भारतभर घुमत आहे तो फुले दाम्पत्याच्या परिश्रमांमुळेच संपूर्ण भारतभरातील स्रीशुद्रांच्या जीवनातील अज्ञानरूपी अंधकार महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांनीच नाहीसा केला.[ads id="ads1"] 

भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथमशिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांचा ३ जानेवारी जयंतीदिन असून स्त्री उद्धारासाठी त्यांनी आपले सर्वस्व वाहीले.महात्मा ज्योतिराव फुले यांनी हाती घेतलेल्या समाजोद्धाराचा वसा त्यांनी नेटाने पुढे नेला.[ads id="ads2"] 

  सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे ३ जानेवारी १८३१ रोजी जन्मलेल्या सावित्रीमाई या ९ वर्षांच्या असताना इस १८४०मध्ये त्यांचा विवाह १३वर्षे वयाच्या ज्योतिबा फुले यांच्याशी झाला.अस्पृश्याचे हाल पाहून ज्योतिबांचे काळीज पिळवटून निघत असे. अशा अमानुष रुढी-परंपरा व कर्मकांडाविरुद्ध ज्योतिबांचे मन पेटून उठले. ज्योतिबांच्या या ज्योतिला प्रज्वलीत करण्याचे कार्य सावित्रीनेच केले व ती खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांतीची प्रखर ज्योत झाली.

 सर्वांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत त्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचे कठीण कार्य ज्योतिराव व सावित्रीमाई यांनी केले. १ जानेवारी १८४८ रोजी पुणे येथील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढून  या दाम्पत्याने प्रथम शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. काही धर्ममार्तंडांनी 'धर्म बुडाला' अशी ओरड केली व सावित्रीमाईंवर धर्मबुडवी म्हणून ते शेणमाती, दगड फेकू लागले. तरीसुद्धा त्या मागे हटल्या नाहीत. अस्पृश्यांना शिकविल्यामुळे सनातनी मंडळी जास्तच चिडली. त्यांनी ज्योतिरावांच्या वडिलांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे ज्योतिरावांच्या वडिलांनी त्यांना घराबाहेर काढले. वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी सावित्रीमाई फुले यांना घराबाहेर पडणे भाग पडले. अशाही परिस्थितीत सावित्री मुळीच डगमगली नाही. ज्योतिरावांच्या कार्यात त्यांनी पूर्णपणे साथ देण्याची तयारी केली होती. सावित्रीमाई फुले अशिक्षीत होत्या. त्यांना ज्योतिराव फुले यांनी घरी शिकविले व नंतर शाळेत शिक्षण देण्याचे कार्य सावित्रीमाईंनी केले. इस १८४८ ते १८५२पर्यंत त्यांनी एकूण १८ शाळा काढल्या. त्यांच्या शाळेची नोंद सरकारी दफ्तरात झाली तेव्हा १२ फेब्रुवारी १८५२ मध्ये मेजर कॅन्डी यांच्या हस्ते महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांचा  सत्कार करण्यात आला. तसेच शाळांना सरकारी अनुदान जाहीर केले. सावित्रीमाई म्हणतात......

विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहून म्हणूनच 

खरीखुरी विद्देची देवता सावित्रीमाई फुले यांनी शेणमाती,दगडधोंड्यांचा मारा सहन करून महीलांना शिक्षित केले,खरे म्हणजे स्री मुक्तीच्या लढ्याची सुरुवात सावित्रीमाईंनीच केली.दारिद्र्य अज्ञान आणि निच रूढी परंपराचा अंधकार नाहीसा करण्यासाठी आद्यसमाजक्रांतीकारक ज्योतिबा फुल्यांनी ज्ञानाचा दिवा लावला.या दिव्याने पहिल्या शाळेच्या रूपाने प्रकाशाचा पहिला किरण स्री-शुद्रांच्या जीवनात आणला.१९ व्या शतकाच्या दुसर्‍या दशकात स्त्री-जीवन खुप भयानक होते. मराठी राज्य बुडालेले, शेवटच्या पेशव्याच्या आणि सरदारांच्या चंगीभंगी चाळ्यांनी स्त्रियांना समाजात वावरणेही अशक्य झालेले होते.मुलामुलींच्या पाळण्यातच लग्ने लावून देणारे आईबाप, लग्न म्हणजे काय हे कळायच्या आतच मुलीचा नवरा गेला तर जन्मभर काबाडकष्ट, अपमान सोसत एकत्र कुटुंबात या कोवळ्या बालविधवेने पिचत पडायचे. अशा स्थितीतच कुण्या पुरुष नातेवाईकाच्या वाकड्या नजरेची शिकार बनून गर्भ राहिला तर त्याचा सारा दोष पुन्हा या निष्पाप पोरीच्याच माथी मारायचा. मग काळे तोंड लपविण्यासाठी त्या कोवळ्या पोरींना नदी-विहिरीत जीव देण्यापलीकडे दुसरा मार्गच नसे, हे हाल कमी म्हणूनच की काय, ब्राह्मण समाजात या अशा मुलींचे सुंदर केस कापून तिचे गोजिरवाणे रूप तिला सोवळी करून विद्रूप करून टाकीत पती मेल्यावर तिला सती जायला भाग पाडत.शूद्र-अतिशूद्रांची स्थितीही अशीच भयानक होती. आपली सावली ब्राह्मणांवर पडू नये म्हणून त्यांना अंग दुमडून चालावे लागे. थुंकीचा विटाळ सोवळ्या ब्राह्मणांना होऊ नये म्हणून गळ्यात मडके अडकवून फिरावे लागे. स्वतःच्या पावलांचे ठसे पुसून टाकण्यासाठी कमरेला झाडाची फांदी बांधून फिरावे लागे.अज्ञान व उपासमार तर पाचवीलाच पुजलेली,

इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही स्त्रियांचा आणि शूद्रातिशूद्रांचा कैवार घेणारे एक जोडपे पुढे आले.आणि त्यांनी स्रीशूद्रांसाठी ज्ञानाचा दीप लावला.

      सावित्रीमाई फुले यांच्या पावन स्मृतीस कोटी कोटी वंदन... जयभीम जय ज्योति जय क्रांती !!!

संदर्भ:- १) सावित्रीबाई जोतीबा फुले जीवन कार्य 

              शांता रानडे.

          २) महात्मा फुले समग्र वाङ्मय संपादक       य.दि.फडके 

          ३)भारतीय समाज क्रांतीचे जनक महात्मा फुले (प्रा.ना.ग.पवार/अविनाश वरोकर)

४)सावित्रीबाई फुले:अष्टपैलू व्यक्तिमत्त्व (प्रा.ना.ग.पवार

लेखक:-अॅड.राजेश वसंत रायमळे (एम.ए.एल. एल. बी.) 

भ्रमण ध्वनी:-९७६४७४२०७९

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!