🔹 बहुजन महामातांचे जीवन चरित्र प्रेरणादायी !... पी.डी.पाटील सर.
धरणगांव - ४ जानेवारी , २०२२ मंगळवार रोजी धरणगाव तालुक्यातील विवरे गावात ३ जानेवारी ते १२ जानेवारी निमित्त महिला शिक्षण दिन, बालिका दिन, महिला मुक्ती दिन याचे औचित्य साधून महामातांचा जागर करण्यात आला.[ads id="ads1"]
या वैचारिक प्रबोधन व्याख्यानाचे प्रास्ताविक महात्मा फुले हायस्कूल चे आदर्श शिक्षक हेमंत माळी यांनी केले. प्रास्ताविकात माँसाहेब जिजाऊ ते ज्ञानज्योती सावित्रीमाई या मातांचा जन्मोत्सवानिमित्त नऊ दिवसाचा प्रबोधनाचा जागर धरणगाव तालुक्यातील ग्रामीण भागात करण्यात येत आहे. यामध्ये विवरे, भवरखेडे, पष्टाने, सोनवद, बांभोरी, गंगापुरी, धानोरे, गारखेडे या गावांचा समावेश आहे.[ads id="ads2"]
जिजाऊ आणि सावित्रीच्या लेकींच्या हातून दीपप्रज्वलन करण्यात आले. सर्व सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, लोकमाता अहिल्यादेवी होळकर, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले,विद्येची खरी देवता सावित्रीमाई फुले, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, त्यागमूर्ती रमाई या महामातांचे प्रतिमांचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख वक्ते व सर्व विचार मंचावरील उपस्थित प्रमुख अतिथींचे महापुरुषांचे व महामातांचे ग्रंथ आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. धनराज माळी सर यांनी प्रमुख वक्ते पी.डी.पाटील, शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांचा परिचय करून दिला.
या कार्यक्रमाचे आयोजन धरणगाव तालुक्यातील विवरे येथील उमेद बचतगटाच्या सी.आर.पी. जयश्री गणेश पाटील आणि पशुसखी रंजना भगवान माळी यांनी केले होते. तत्पूर्वी उमेद बचतगटाच्या सर्व आठ गटांच्या महिला सदस्या आणि विद्यार्थिनींनी गावात रॅली काढून स्वच्छता, शिक्षण, बालहत्या, सेंद्रिय शेती तसेच महिला अत्याचार याबाबत प्रबोधन केले. सावित्रीच्या लेकींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून माईंची महती वर्णन केली. उमेद अभियान चे पंकज पाटील यांनी महिला सक्षमीकरण व बचत गटांचे महत्व पटवून दिले.
प्रमुख वक्ते पी.डी.पाटील यांनी शिक्षण क्रांतीच्या प्रणेत्या सावित्रीमाई फुले यांच्या जीवन संघर्षावर प्रकाश टाकला या सोबतच राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, अहिल्याराणी होळकर, फातिमाबी शेख, त्यागमूर्ती रमाई, विरागंणा झलकारी देवी या सर्व महामातांचे चरित्र उलगडले. या महामातांच्या कार्यकर्तृत्वामुळेच आजची महिला सक्षम झालेली आहे. या सर्व महामातांचे कार्य अतिशय प्रेरणादायी आहे. इतिहासातील विविध उदाहरण दाखले देऊन उपस्थितांना महामाता यांचे कार्य विस्तृतपणे सांगितले. सावित्रीमाईंचे कार्य सांगत असताना राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांची माईंना खूप मोलाची साथ होती, असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांनी महिलांना गुलामगिरीतून मुक्त करण्याचे काम फुले दांपत्यांनी केलेले आहे. आजच्या सर्व माता - भगिनींनी माँसाहेब जिजाऊ ते सावित्रीमाई पर्यंतच्या महामातांचा आदर्श घेऊन मार्गक्रमण केले पाहिजे. अंधश्रद्धा, कर्मकांडापासून दूर रहा आणि शिक्षणाचा ध्यास घ्या !... असा मोलाचा संदेश दिला.
सर्व उपस्थित माता - भगिनी व बांधवांना विद्येची महानायिका सावित्रीमाई फुले, महापुरुषांचे व महामातांचे ग्रंथ भेट देण्यात आले. या वैचारिक प्रबोधनाचे सूत्रसंचालन व आभार महात्मा फुले समता परिषदेचे तालुकाध्यक्ष धनराज माळी सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रबोधनपर व्याख्यान यशस्वीतेसाठी विवरे येथील ग्रामस्थ आणि संत सावता माळी ग्रुपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला विवरे भवरखेडे ग्रुप ग्रा.पं. चे सरपंच, महिला सदस्य, ग्रामस्थ महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.