🔹 ऐतिहासिक स्थळाला भेट देऊन ऊर्जा मिळते - लक्ष्मणराव पाटील.
धरणगाव प्रतिनिधी - पी.डी.पाटील सर
धरणगांव - धरणगाव येथील विकल्प ऑर्गनायझेशन चे कार्याध्यक्ष तसेच सत्यशोधक लक्ष्मणराव पाटील यांची तात्यासाहेब व माईंच्या कर्मभूमीला भेट व अनुभवलेला प्रसंग. पुणे शहरात गेल्यानंतर काय बघावे हा विचार मनात येतो. शनिवारवाडा, पर्वती, सारस बाग अशी ठिकाणे प्रामुख्याने सांगितली जातात.[ads id="ads1"]
परंतु आशिया खंडातील पहिली शाळा ज्या पुणे शहरात क्रांतिसूर्य तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती माईसाहेब सावित्रीमाई फुले यांनी सुरू केली तो भिडेवाडा आणि फुले दाम्पत्यांचे वास्तव्य असलेला गंजपेठ येथील महात्मा फुले वाडा या स्मारकांना भेट देणं म्हणजे खऱ्या अर्थाने पर्वणीच.[ads id="ads2"]
आज काही कामानिमित्त पुणे शहरात आलो असतांना आमच्या पाहुण्यांच्या सोबत शनिवारवाडा, भिडेवाडा आणि महात्मा फुले यांचा वाडा या ठिकाणी भेट देण्याचा दुग्धशर्करा योग जुळून आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचा गणपती आणि त्यांच्या अगदी समोर असलेला ऐतिहासिक भिडेवाडा. जेव्हा मी मंदिरात पादत्राणे सांभाळणाऱ्या व्यक्तीला विचारले की भिडेवाडा कुठे आहे ? तर त्याने सांगितले मला माहित नाही. त्याच्या उत्तराने मला आश्चर्य वाटलं नाही परंतु मनातल्या मनात हसू आलं. क्षणभर त्याच्या जवळ थांबलो, त्याच्याकडे पाहून स्मित हास्य दिले आणि जाता जाता सांगितले सुध्दा की, मित्रा तुला भिडेवाडा कुठे हे जर माहीत असतं तर कदाचित तू... सर्वच उहापोह करत बसणार नाही😊😊 कारण आजकाल सर्वच जाणकार आहेत. भिडे वाड्यात वर जात असतांना पुन्हा एका सद्ग्रहस्ताने हटकले, मला म्हटला जाऊ नको वर सर्व पडझड झाली आहे. त्या व्यक्तीने सांगितले परंतु मी मात्र ऐकलं नाही आणि माझ्या पाहुणे आम्ही दोघेही वर भिडे वाड्यात गेलो. ज्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे होते ते ठिकाण आज पूर्ण भग्नावस्थेत आहे. तेव्हा मनात एक विचार आला, बहुजनांच्या मोडकळीस आलेल्या लेकरांना उभं करण्यासाठी धडपडणारा भिडे वाडा आज स्वतः मोडकळीस आला आहे. तात्यासाहेब आणि माईंनी शिक्षणक्रांतीची सुरवात जिथून केली त्या पवित्र आणि ऐतिहासिक वास्तूला नमन करून पुढे निघालो. त्यानंतर तात्यासाहेब महात्मा फुले यांच्या वाड्यात जायला रिक्षात बसलो परंतु माझ्या त्या मुस्लिम रिक्षा चालक बंधूला महात्मा फुले यांचा वाडा कुठे आहे ? हे नेमकं माहीत नव्हतं. त्याला म्हटलं चल तर खरं जेवढं सोडशील तेवढं पुढे मी पायी जाईल. प्रवासात मी आणि तो रिक्षाचालक आम्ही दोघेच होतो मग काय त्याला मी तात्यासाहेब - माई आणि फातिमाबी शेख यांच्या शिक्षण क्रांतीबद्दल सांगितले. तो सद्ग्रहस्त अगदी भारावून गेला, त्याने स्वतः रस्त्यावर ३ लोकांना विचारले की फुलेवाडा कुठे आहे ? आणि मला योग्य ठिकाणी सोडले सुध्दा. ठरलेल्या पैशांपेक्षा कमी पैसे घेतले आणि जातांना मी त्याला जी माहिती दिली त्याबद्दल माझे आभार मानून निघून गेला. त्याच्या रिक्षकडे बघतांना मनोमन विचार केला मी तुला काहीच नाही सांगितले हे सर्व माझ्या माईंची आणि तात्यासाहेबांची पुण्याई आहे जी पुण्यात पुणेकरांना मात्र माहीत नाहीये. आतमध्ये गेलो आणि तेथील प्रत्येक वस्तूला स्पर्श केल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा मिळाली. तात्यासाहेब आणि माईंचे आशीर्वाद पाठीवर असल्याचे जाणवले आणि मी मनातून कृतज्ञता व्यक्त केली. त्या ठिकाणी थोडा वेळ बसलो आणि आठवले की, जवळजवळ १२ वर्षांपूर्वी याच फुले वाड्यातून विवेकी युवाशक्ती संकल्प परिषदेची सुरवात झाली होती आणि मी लोकशाहीर वामनदादा कर्डक यांनी लिहिलेलं "स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले..." ही गीत गायल्यानंतर कार्यक्रमाची सुरवात झाली होती. या सर्व आठवणी आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याची कला शिकवणाऱ्या फुले दाम्पत्यांना त्रिवार वंदन करून परतलो...
✒️लेखनप्रपंच
▪️लक्ष्मण पाटील सर
कार्याध्यक्ष - विकल्प ऑर्गनायझेशन, धरणगाव.

