जळगाव - आशिया खंडातील सर्वात मोठी सोसायटी असलेल्या जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी अर्थात ग.स.सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया आज गुरुवार, दि.28 एप्रिल 2022 रोजी पार पडत आहे. जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन या ग.स.सोसायटीच्या सभासद असल्याने आज सकाळीच त्यांनी मतदानाचा आपला हक्क बजावला.
जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी अर्थात ग.स.सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी संपली असून निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया गुरुवार, दि. 28 एप्रिल 2022 रोजी पार पडत आहे. यासाठी आज सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. जळगाव शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन या स्वतः शिक्षिका असून ग.स.सोसायटीच्या सभासद देखील आहेत. सकाळीच त्यांनी शहरातील प.न.लुंकड कन्या शाळा या केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला.
ग.स.सोसायटी आशिया खंडातील वैशिष्ट्यपूर्ण आणि मोठी सोसायटी आहे. ग.स.सोसायटीच्या निवडणूक प्रक्रियेत सर्व सभासदांनी सहभागी होत आपला मतदानाचा हक्क अवश्य बजवावा, असे आवाहन महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी याप्रसंगी केले.

