पुर्वी नेते असे नव्हते. नेते हे आपल्या देशासाठी काम करीत. ते सुधारणावादी होते. अमाप संपत्ती गोळा करणे हा त्यांचा उद्देश नव्हता. तर समाजाची सुधारणा झाली पाहिजे हा त्यांचा उद्देश होता. ते शिकलेले होते. बरेचसे नेते कायदेपंडीत होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात सुधारणाही केल्या. कोणी सतीप्रथा बंद केली. कोणी विधवा विवाह सुरु केला. कोणी बालविवाह बंद केला तर कोणी मुलींच्या शिक्षणासाठी शाळा सुरु केल्या. त्यांनी फक्त समाजाची सेवा करणे हा उद्देश ठेवला. [ads id="ads2"]
आजचे नेते असे नाहीत. तसेच ते जास्त शिकलेलेही नाहीत. त्यातच बरेचसे नेते गुंडप्रवृत्तीचे आहेत. त्यांना देशात कोणता आणि कसा विकास करावा त्याचं साधं गणित समजत नाही. त्यांना फक्त पैसा कसा कमवायचा हे नक्कीच समजतं. त्यांंना ते गुंड प्रवृत्तीचे असल्याने कोणाचे तोंड कसे बंद करायचे हे सारं समजतं. ध्येयधोरणं कशी आखावी याचा विचारच नसतो त्यांच्या मनात. कारण ते शिकलेले नसतात.
नेते गुंडप्रवृत्तीचे नसावेत. ते सुधारणावादी असावेत. त्या त्या क्षेत्राचं त्यांना ज्ञान असावं. तसेच त्या नेत्यांनी भरपूर शिक्षण घेतलेलं असावं. विशेष सांगायचं झाल्यास नेता बनायला डिग्री किंवा समकक्ष पदवीची अट असावीच. पक्षाने वा सरकारने कोणालाही तिकीट देवू नये अशीच नेत्यांची आखणी करावी. जेणेकरुन अशी जर आखणी केली गेली तर तो त्या पदाला नक्कीच न्याय देवू शकेल व तो उच्च स्तरावर सुधारणाही घडवून आणेल. एवढंच नाही तर असा उच्चशिक्षीत नेता समाजालाच नाही तर देशालाही उच्च पातळीवर नेवून ठेवेल हे सांगायला नको.
आजच्या काळात नेते बदनाम झाले आहेत. त्यातच देशही बदनाम झालेला आहे. कोणी कोणी नेते भ्रष्टाचारात सापडलेले आहेत. तर कोणी नेते बँकघोटाळ्यात. अख्ख्या बँकाच्या बँका बुडवून टाकल्या आहेत या नेत्यांनी. कित्येक नेत्यांचा पैसा हा विदेशी बँकेत आहे. त्यांच्याजवळ एवढा पैसा आहे की जणू त्यांच्या सातपिढ्या बसून खातील. त्यांचा इतिहास जर पाहिला तर एके काळात त्यांचेजवळ काहीही नव्हतं. मग एवढा गलेलठ्ठ पैसा आला कोठून हा विचार येतो.
आजच्या नेत्यांना देशाच्या विकासाशी काही घेणंदेणं नाही. त्यांचा उद्देश फक्त पैसा कमवणे हा असतो. पक्षही त्यांनाच तिकीट देतो. बोली बोलली जाते. कोण पक्षाला किती जास्त रक्कम देईल. मग जो जास्त रक्कम देतो, पार्टी फंड म्हणून, त्याला तिकीट दिली जाते. त्यानेळी विचार केला जात नाही की ज्याला पक्ष तिकीट देत आहे. तो किती शिकलेला आहे. त्याचे सामाजीक सुधारणेत योगदान किती आहे. तो गुन्हेगार तर नाही. त्यानं कमवलेल्या पैशाला भ्रष्टाचाराची मोहर तर नाही ना. त्याला जे खातं दुलं जातं, त्याचं ज्ञान त्याला आहे का? ह्या सर्व गोष्टी आज पाहिल्या जात नसल्यानं आज देशात नेत्यांची चांदी निर्माण झाली आहे. देश विकासाच्या क्षेत्रात पुढे जात नाही. उलट तो मागे येत आहे.
मुख्य म्हणजे आज देशात नेते बनायचा अभ्यासक्रम नाही. नेते बनायला कोणी उच्चशिक्षीत धजत नाही. कोणीही उच्चशिक्षीत पुढे येवून सत्ता सांभाळायला तयार नाही. म्हणूनच आज जी मंडळी उच्चशिक्षीत नाहीत. त्यांच्या हाती सत्ता जाते व ते देशाचं वाटोळं करीत असतात.
महत्वाचं म्हणजे देशातील उच्च शिकलेल्या तरुणांनी पुढं येवून नेते बनायला हवं. देशाची सत्ता हाती घ्यायला हवी. त्यासाठी सरकारनं विशेष असा अभ्सासक्रम शाळेत राबवावा. जेणेकरुन तो अभ्यासक्रम शिकून तरी उच्चशिक्षीत मंडळी नेते बनतील. नेते बनायला पुढं येतील नव्हे तर या शिक्षणातून सक्षम असं नेतृत्व देशाला मिळेल. देशात भ्रष्टाचार होणार नाही व देश विकासाच्या क्षैत्रात आघाडीवर जाईल. तो एवढा आघाडीवर जाईल की इतर देशांचे प्रतिनिधीत्व करु शकेल. हे तेव्हाच घडेल, जेव्हा देशातील नेते उच्चशिक्षीत असतील. ते जेव्हा उच्चशिक्षीत असतील, तेव्हाच ते उच्च विचारांच्या गोष्टीही करतील आणि तेव्हाच ते देशालाही उच्च स्तरावर नेण्यासाठी कार्यवाही करु शकतील.
संपतला नेता बनायचं होतं. ज्या काळात कोणीही उच्चशिक्षीत नेता बनायला पुढे येत नव्हतं. ज्या काळात नेता बनण्यासाठी कोणत्याही स्वरुपाची पदवी लागत नव्हती. ज्या काळात नेता बनणं म्हणजे बदनामीचा दाग लावणं हा उद्देश होता आणि ज्या काळात नेता बनण्यासाठी वशिलतेबाजी व पुरेसा पैसा लागत होता. त्याच काळात संपत अगदी बारावीत असतांनाच नेता बनण्याची स्वप्न पाहात होता. पैसे कमविण्यासाठी नाही तर आपल्या बिरादरीला सन्मानानं जगविण्यासाठी. तसेच त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी संपतला नेता बनायचे होते. तसं त्यानं आज इंटरव्यूमध्ये बोलूनही दाखवलं होतं.
देशाचं राजकारण पारदर्शक असावं
देशाची धुरा ही सुशिक्षीत माणसांनीच सांभाळायला हवी. परंतू सुशिक्षीत माणसं देशाची धुरा आज सांभाळायची जबाबदारी टाळतात. शिक्षणाचा मूळ उद्देशच स्वतः आत्मनिर्भर होणं व त्यासोबतच इतरांनाही आत्मनिर्भर करणं हा आहे. परंतू आपण शिक्षणाचा तो उद्देश कधीही गृहीत धरत नाहीत. आपण आपल्या मतानुसार शिक्षणाचा अर्थ घेतो. त्यांना त्यांच्या मतानुसार शिक्षणाचा अर्थ वाटतो, तो म्हणजे शिक्षण हे आपल्या स्वतःच्या आत्मनिर्भरतेसाठी असावं. ते इतरांच्या आत्मनिर्भरतेसाठी नसावं. असाच उद्देश आपण शिक्षणाचा घेवून या शिक्षणाच्या शैक्षणीक क्रांतीच्या काळात जो कोणी वर जात असेल, त्याचे पाय खेचत असतो. आपण आज आपली अशी मानसिकता बनवली आहे की आपला आणि केवळ आपलाच विकास व्हावा. इतरांचा नको. यासाठीच आपण कधीच नेता बनायचा विचार करीत नाही. केवळ आपण डॉक्टर, इंजिनीयर वा एखादा ऑफीसर बनायची स्वप्न पाहात असतो नव्हे तर ते स्वप्न साकार करीत असतो. तसा प्रयत्नही करीत असतो. कारण नेत्यांनी राजकारणाला बदनाम करुन टाकले आहे.
मुख्यतः दहावी, बारावी होणा-या व ती परिक्षा मेरीटमध्ये पास करणा-या मुलांंना जर इंटरव्ह्यूमध्ये मुलाखतीत विचारलं की ते काय बनणार तर त्यांचं उत्तर ठरलेलं असतं. ते म्हणतात की आम्ही डॉक्टर बनू. कोणी म्हणतात की आम्ही इंजिनीयर बनू. तर कोणी म्हणतात आम्ही ऑफीसर. परंतू नेता बनायचं कोणीही आपल्या मुलाखतीत सांगत नाहीत. हीच वास्तविकता आहे. कारण नेता म्हटल्यास आपल्यासमोर येते ती बदनामी. ते अडाणीपण आणि तो भ्रष्टाचार. खरं तर यामुळंच आज शिकणारा वर्ग नेता बनायचं आपल्या मुलाखतीत सांगत नाहीत वा तशी स्नप्नही कधीच पाहात नाहीत.
नेता बनायचं मुलाखतीत आज शिकणारा युवावर्ग का सांगत नाहीत वा तशी स्वप्न का पाहात नाहीत? असा आपल्याला एक प्रश्न भेडसावतो नव्हे तर प्रश्न पडतोच. तर त्याचं उत्तर आहे, अलीकडे नेत्यांनीच केलेली स्वतःची बदनामी. हे नेते कधी बँक घोटाळ्यात तर कधी कोणत्या घोटाळ्यात सापडले आहेत व बदनाम झाले आहेत. अनेक घोटाळे त्यांच्या पाठीमागं आहेत. त्यांनी केलेला भ्रष्टाचार हा सर्वांना माहीत आहे. त्यामुळं सामान्य माणसांना असं बदनाम होणं आवडत नाही. परिणामी नेता बनायला त्यामुळंच कोणाला आवडत नाही. जरी नेता बनणं अगदी सोपं काम असलं तरीही.
नेता बनायला शिक्षण लागत नाही. कोणीही नेता बनू शकतो. त्याला पैसा लागत नाही. कोणीही विना पैशानं नेता बनू शकतो. फक्त जनमत हवं. तसंच तशी कोणतीच वशीलतेबाजी नेते बनायला लागत नाही. हं, पक्षाची तिकीट मिळवतांना पार्टी फंड द्यावा लागतो हे तेवढं खरं.
नेते बदनाम असतात. परंतू ही जरी वास्तविकता असली आणि हे जरी खरं असलं तरी तरुणांनी व विशेषतः सुशिक्षीत वर्गानं नेते बनायला पुढं यायला हवं. नेते बनतांना आपल्यासमोर माझा देश हाच उद्देश ठेवावा. कोण्याही अडाण्यांना तिकीट वाटप होवू नये. कारण एवढा मोठा देश चालवायची किल्ली अडाण्यांना नको. कारण कदाचीत ते आपल्या अडाणी मतानं देशाला अडाणी बनवून ठेवतील ही शंका वाटते.
देश........देश जर घडवायचा असेल तर देशाचं राजकारणप अडाण्यांच्या हातात नको. देशाला बदनाम करणा-या गोष्टीही नेत्यांनी करु नये. त्यांनी भ्रष्टाचार करु नये. असे जर कोणता नेता करीत असेल, तर त्याला जबर शिक्षा व्हावी. त्याची पुर्ण संपत्तीही जप्त व्हावी. त्याची उच्चस्तरावर चौकशी व्हावी. महत्वाचं म्हणजे राजकारण पारदर्शक व्हावं.
राजकारण दिशा देणारं असावं. जेणेकरुन देशाच्या राजकारणाबाबत लोकांना ते हातात घेण्यासाठी आवड निर्माण होईल. तसेच सुशिक्षीत लोकंही देशाचं राजकारण हातात घ्यायला कचरणार नाहीत. सुशिक्षीतांनी आता देशाचं राजकारण आपल्या हातात घ्यायला हवं. तसेच देशाच्या राजकारणाबद्दलची आवडनीवड बालपणापासूनच मुलात निर्माण व्हावी. दहावी बारावी पास होणा-या मुलांनीही आपल्या मुलाखतीत नेता बनायचं आवर्जून सांगायला हवं. एवढंच नाही तर राजकारणाबाबत कोणाला तिटकारा वाटणार नाही एवढं राजकारण पारदर्शक असायला हवं.
लेखक - अंकुश शिंगाडे,नागपूर


