जळगाव (फिरोज तडवी)
जळगाव शहरातील नागरिक नेहमीच काही ना काही कामासाठी किंवा समस्या मांडण्यासाठी महापालिकेत जात असतात. प्रसंगी महापौरांच्या दालनात ही भेट देत असतात. मात्र, शुक्रवार, दि. 18 नोव्हेंबर 2022 रोजी सुमारे 140 लहान मुलांनी महापालिकेत थेट महापौर दालनालाच सदिच्छा भेट देत तब्बल दोन तास अत्यंत खेळी-मेळीच्या वातावरणात महापौरांशी संवाद साधला.[ads id="ads1"]
आंतरशालेय उपक्रमांतर्गत 1ली ते 5वी च्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात प्रकल्प भेटी व क्षेत्र भेटींचा समावेश करण्यात आला आहे. क्षेत्र भेटी अंतर्गत प्रशासकीय सेवा देणार्या संस्था आणि व्यक्तींना भेटणे ही अपेक्षित आहे. याअनुषंगाने शहरातील विवेकानंद प्रतिष्ठान संचलित काशिनाथ पलोड सीबीएससी स्कूलच्या इयत्ता 5 वीच्या 140 विद्यार्थ्यांनी प्रशासकीय स्थळ जळगाव शहर महानगरपालिका व महापौर यांना सदिच्छा भेट दिली. पाठ्यपुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळणे आवश्यक आहे म्हणून शाळेच्या शिक्षकांनी हा उपक्रम राबविला.[ads id="ads2"]
या शालेय उपक्रमांतर्गत इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांनी शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या संचालिका, तसेच जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या तज्ज्ञ संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या महापालिकेतील महापौर दालनात भेट घेत अत्यंत खेळी-मेळीच्या वातावरणात महापौरांवर निरागस व मार्मिक प्रश्नांचा भडीमार केला. महापौर कसे निवडले जातात?, महापालिकेत कामकाज कसे चालते?, तुम्ही दिलेल्या आश्वासनांची अमलबजावणी कशी करतात? यासह विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे आनंदाने देत महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी विद्यार्थ्यांचे समाधान केले.
हेही वाचा :- आपले बँकेत खाते आहे. तर ही बातमी आपल्या कामाची आहे. "या" दोन कागदपत्रांशिवाय बँकेत कॅश जमा होणार नाही, जाणून घ्या नवीन नियम
तसेच जळगाव शहरातील रस्ते सुधारण्यासाठी आपण काय कराल? हा मिश्किल प्रश्नसुद्धा यावेळी विद्यार्थ्यांनी विचारले. या संवादाच्या वेळी लहानग्यांच्या चेहर्यावर निरागस भाव झळकत होता प्रसंगी कुतुहूल निर्माण होऊन ते शांतपणे महापौरांना ऐकत ही होते. प्रश्नोत्तरीचा सत्र झाल्यावर महापौरांनी सर्व विध्यार्थ्यांना चॉकलेट, बिस्किट व पेन देऊन त्यांना आनंदाने निरोप दिला. याप्रसंगी काशिनाथ पलोड शाळेचे क्षेत्रभेट प्रकल्प प्रमुख श्री.धीरज जावळे, श्री.प्रदीप पाटील, श्री.नरेंद्र भोई, श्री.अनिल कोथडकर, सौ.सुनंदा मिश्रा, सौ.भारती येवले, सौ.मयुरी सुलक्षणे यांच्यासह महापालिकेतील अधिकारी व कर्मचारीवृंद उपस्थित होते.