आज 'मनुस्मृती दहन' दिवस म्हणजेच 'भारतीय स्त्री मुक्ती दिन' डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी मनुस्मृती दहन करून स्त्रियांची स्रीदस्यातून मुक्तता केली.समाजात पुरुषा इतकीच स्त्री ही महत्त्वाची आहे आणि समाजाचे उपद्रव मूल्य हे स्त्री मुळेच अबाधित राहते. [ads id="ads1"]
भारतातील ब्राम्हण्यशाही वर्चस्वावादी पितृसत्ताक समाजव्यवस्थेत स्त्रियांना अतिशय हीन वागणूक मिळत असे. ह्याव्यवस्थेने आपला वर्चस्ववाद टिकवून ठेवण्यासाठी चातुर्वर्ण्य व्यवस्था निर्माण करून शूद्रादीशूद्र आणि स्त्रियांना गुलाम बनवणाऱ्या मनुस्मृती ह्या कायदेसंहितेची निर्मिती केली.ह्या कायदेसंहितेनुसार स्त्रियांना कोणतेही हक्क किंवा अधिकार नसून स्त्री सर्वस्वी पुरुषाची गुलाम असे.एकंदरीत मनुस्मृतीने समाजात स्त्रियांना दुय्यम स्थानी ठेवले होते.हे दुय्यमत्व नाकारत अनेक जगभरात स्त्री मुक्ती चळवळी सुरू झाल्या त्याचबरोबर भारतात ही १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात स्त्री मुक्ती चळवळीस चालना मिळाली. [ads id="ads2"]
समतेचे पुरस्कर्ते भगवान गौतम बुद्धांनी सम्यक मार्गाने समता प्रस्थापित करण्यासाठी स्त्रियांना भिकुसंघात समाविष्ट करून घेतले आणि त्यांना ज्ञानार्जनाचा अधिकार दिला आणि म. फुलेंनी १८ व्या शतकात स्त्री मुक्तीसाठी लढा दिला ज्यामध्ये स्त्री शिक्षण, विधवा विवाह,सतीप्रथा बंदी ह्यासारखे कार्य त्यांनी केले. गौतम बुद्ध आणि म. फुले ह्या आपल्या गुरूंच्या प्रेरणेने स्त्री स्वातंत्र्याचा लढा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अविरतपणे चालू ठेवला.
'कोणत्याही समाजाची प्रगती ही तेथील महिलांच्या प्रगतीवर अवलंबून आहे' हे बाबासाहेबांचे मत होते समाजपरिवर्तन करायचे असेल तर आधी स्त्री मुक्ती व्ह्यायला हवी.स्त्रियांना त्यांचे स्वतंत्र मिळावे ह्यासाठी स्त्री दास्याचे मूळ शोधणे गरजेचे होते म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील जातिव्यवस्थेची चिकित्सा केली आणि त्यातून त्यांनी हा निष्कर्ष काढला की जातीव्यवस्था हीच भारतीय स्त्री दास्याचे मूळ आहे त्यामुळे ब्राम्हणीशाही पुरुषसत्ताक जातीव्यवस्था नष्ट करून समताधिष्ठित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी सम्यक परिवर्तन होणे गरजेचे आहे. हे परिवर्तन स्त्री मुक्तीशीवाय अशक्य आहे त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्री-स्वातंत्र्याला महत्व दिले.
भारतातील चातुर्वर्ण्य जातीव्यवस्थेमुळे दलित-आदिवासी व मागासवर्गीय स्त्रिया ह्या पुरुषांच्या गुलाम होत्याच त्याचबरोबर त्या उच्चवर्णीय स्त्रियांच्या ही गुलाम होत्या आणि म्हणूनच महाड येथील परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्त्रियांना उद्देशून म्हणतात की जातीव्यवस्था संपवण्याचा लढा हा पुरुषांचा नसून स्त्रियांचा आहे, त्यासाठी बाबासाहेबांनी स्त्रियांना आपल्या चळवळीत शामिल करून घेतले ज्यामध्ये महाड चवदार तळे सत्याग्रह, काळाराम मंदिर सत्याग्रह, नागपूर येथील महिला परिषद ह्यामध्ये महिलांची उपस्थिती उल्लेखनीय होती.
डॉ. बाबासाहेब म्हणतात की स्त्रीच्या अवनतीस सर्वस्वी मनूच जबाबदार आहे.म्हणून २५ डिसेंबर १९२७ ला महाड येथे स्त्रियांना अतिशय हीन,अपमानास्पद वागणूक देणाऱ्या मनुस्मृती चे दहन करून अनिष्ठ रूढी आणि परंपरांतून त्यांची मुक्तता केली.ही घटना भारतातील समस्त शूद्रादीशूद्र स्त्रीवर्गाच्या दृष्टीने एक ऐतिहासिक घटना ठरली.
डॉ. बाबासाहेब जातिव्यवस्थेच्या विरोधात होते जातप्रथा आणि बालविवाहाला बाबासाहेबांचा कडाडून विरोध होता.जातीव्यवस्था नष्ट करायची असेल तर आंतरजातीय विवाहाला चालना मिळावी ह्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केले,पुरुषाना आपला जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे तसा स्त्रियांना ही असावा असे त्यांचे मत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती दहन करून येथील चातुर्वर्ण्य व्यस्थेवर घाला घातला परंतु एवढ्यात थांबून चालणार नव्हते आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रीस्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी व त्यांना त्याचे हक्क आणि अधिकार मिळवेत ह्यासाठी हिंदू कायदे संहिता असावी असे मत बाबासाहेबांनी लोकसभेत मांडले.जिथे जगभरात स्त्रिया मताधिकारासाठी लढत होत्या तिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ते सहज भारतीय स्त्रियांना बहाल केले.स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने मानधन,नुकसान भरपाई मिळावी म्हणून कायदे असावेत तसेच स्त्रियांना भरपगारी प्रसूती रजा मिळवून देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव होते.वारसा हक्क,घटस्फोट,पोटगी,दत्तकविधान,अज्ञान व पालकत्व,आणि संपत्तीत हक्क मिळावे ह्यासाठी हिंदू कोड बिलाची निर्मिती केली. ह्या बिलास तथाकथित जीर्णमतवादी सनातन्यानी हिंदू कोड बिलाला कडाडून विरोध केला परंतु तरीही बाबासाहेब आपल्या मतावर ठाम राहिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाच प्रस्ताव लोकसभेत मांडला परंतु जवाहरलाल नेहरू खेरीज अन्य कोणी ही त्यास पाठिंबा दिला नाही आणि हिंदू कोड बिलात काही बदल करून स्त्रियांना संरक्षण देणारे काही कायदेच प्रारीत करण्यात आले. ज्यामध्ये हिंदू विवाह कायदा, वारसा हक्क,अज्ञान व पालकत्व, दत्तक व पोटगी कायदा ह्या कायद्यामुळे स्त्रियांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला.ही भारतीय इतिहासातील एक क्रांतिकारक घटना होती.
हिंदू कोड बिल संसदेत नामंजूर झाले त्यामुळे दुःखी होऊन बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी भारताचे कायदेमंत्री पदाचा राजीनामा देताना हिंदू कोड बिलाविषयी असे म्हटले होते की, “समाजातल्या वर्गावर्गातली असमानता, स्त्री-पुरुष यांच्यातली असमानता तशीच अस्पर्शित राहू देऊन, आर्थिक समस्यांशी निगडित कायदे संमत करीत जाणे म्हणजे आमच्या संविधानाची चेष्टा करणे आणि शेणाच्या ढिगारावर राजमहाल बांधण्यासारखे होय.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी महिलांना हक्क,प्रतिष्ठा, आणि दर्जा मिळवून दिला.समता,बंधुता व स्वातंत्र्य ही त्रिसूत्रे त्यांच्या चिकित्सेचा पाया होती.समाजात स्त्री-पुरुष ह्यांचे समान योगदान असते त्यामुळे दोघनांनी समान हक्क आणि अधिकार असायला हवेत.जेव्हा ह्या दोन्ही घटकांपैकी कोणताही घटक मागे राहील तर समाज प्रगती करू शकणार नाही.आज सामाजिक, आर्थिक,राजकीय ,शैक्षणिक आणि इतर सर्वच क्षेत्रात स्त्रिया सक्षमपणे कार्यरत आहेत आणि शक्य आहे ते फक्त बाबासाहेबांमुळेच.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची स्त्रीयांविषयक भूमिका आणि त्यांनी दिलेली हिंदू कोड बिलाच्या शिदोरीने स्त्री जीवनात सम्यक क्रांती घडवून आणली.बाबासाहेबांचे हे ऋण कधीही न फिटणारे आहे. स्त्रीमुक्तीदाते डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांना आज स्त्री मुक्ती दिनी विनम्र अभिवादन.....कोमल पगारे,नाशिक



