2024 ला तुम्ही सत्ता बदला पहिले दोन आरोपी असतील...
एक मोहन भागवत आणि दुसरे नरेंद्र मोदी !
- मा.बाळासाहेब आंबेडकर
नाशिक (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : संविधान बदलण्याचे, लोकशाही मोडीत काढण्याचे कारस्थान भाजपने रचले आहे. विरोध करणाऱ्यांना ईडी, सीबीआय, आयकर विभाग यांसारख्या केंद्रीय यंत्रणांची भीती दाखविली जात आहे. ही परिस्थिती बदलायची असेल तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रात सत्ता परिवर्तन होणे आवश्यक आहे. त्यासाठी आतापासूनच कामाला लागा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा भारतीय बौद्ध महासभेचे प्रमुख सल्लागार अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. [ads id="ads1"]
नाशिक येथील शाहजहाँनी ईदगाह मैदानावर भारतीय बौद्ध महासभेतर्फे आयोजित धम्म मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर, अशोक सोनवणे, राजेंद्र पतोडे, पिंकी शेख, अमित भुईगळ, वामन गायकवाड, जगदीश गवई, एस. के. भंडारे, अॅड. एस. एस. वानखेडे, भिकाजी कांबळे, देवशाला गायकवाड, संबोधी सोनकांबळे, वंचितचे जिल्हाध्यक्ष पवन पवार, महानगराध्यक्ष अविनाश शिंदे, महासभेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण बागल आदी उपस्थित होते. आंबेडकर पुढे म्हणाले की, 'मॉरल पोलिसिंग' हा नवीन कायदा अस्तित्वात येतो आहे. तुम्ही काय खाता, काय पिता, कुठे जाता, कुणाशी लग्न करणार आहात, यावर सरकार नियंत्रण आणते आहे. घटनेने व्यक्तीला दिलेल्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न या सरकारकडून होतो आहे. यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही फार मोठा वाटा आहे. [ads id="ads2"]
संविधान बदलण्याचे षडयंत्र आरएसएस करत आहे. आज केंद्राच्या विरोधात जो 'ब्र' शब्द काढेल, त्याला जेलची हवा खावी लागते आहे. आगामी होणाऱ्या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकरांनी केले. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर म्हणाले की, नाशिकला ऐतिहासिक वारसा आहे. देशात परिवर्तनाचे वारे वाहत आहेत. सामाजिक परिवर्तनाकडून धार्मिक परिवर्तनाकडे देश चालला आहे. देशात खरोखर परिवर्तन घडवायचे असेल, तर बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे परिवर्तन होणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रवीण बागुल, अशोक सोनने, किसन चव्हाण अमित भोईगळ, दिशा पिंकी शेख, शमिभा पाटील, सुनील वाघमारे, चेतन गांगुर्डे यांनी विचार मांडले. मेळाव्याची सुरुवात बुद्धवंदनेने झाली. बौद्धांचा दर्जा, त्यांचे अधिकार, संरक्षण, त्यांच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या सवलती, तसेच धम्म दीक्षेसाठी धम्म स्वातंत्र्य अबाधित राहावे यांसह विविध विषयांवर मेळाव्यात उहापोह करण्यात आला.धम्म परिषदेस बाैद्ध भिक्खूंसह आंबेडकरांचे अनुयायी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. सुरुवातीला समता सैनिक दल व महार रेजिमेंटच्या सेवानिवृत्त सैनिकांनी मानवंदना दिली. वंचित बहुजन आघाडीची नाशिक जिल्हाध्यक्ष पवन पवार यांनी आभार मानले.


