सारंग पवार आणि आंबेडकरी गीते यांचं एक घट्ट नातं आहे.तसा त्यांच्या गीतांचा परिचय उभ्या महाराष्ट्राला आहेच, त्यांचं वय आता जवळपास छपन्न पर्यंत पोहचलं आहे.आंबेडकरी चळवळी बाबतचं नेमकं आणि अचूक असं आकलन त्यांच्याकडे असल्यानं ते आंबेडकरी गीतांकडे वेगळ्या नजरेने पाहत असतात.आणि गीत लेखन देखील त्याच ताकदीने करत असतात, हे कुणाला नव्याने सांगायची गरज नाही. [ads id="ads1"]
खानदेश म्हटला, की प्रतापसिंग बोदडे, किसनराव सुरवाडे, महिपतराव तायडे,सखाराम हिरोळे यासारखी कितीतरी नावं समोर येतात ; मात्र प्रतापसिंग बोदडे यांच्या नंतरचं प्रभावी गीत लेखन करणारा गीतकार म्हणून सारंग पवार यांच्या नावाचा उल्लेख टाळता येत नाही.
सारंग पवार यांच्या एकूणच जडणघडणीकडे नजर टाकली तर त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. आंबेडकरी चळवळ आणि गीत लेखनाची परंपरा त्यांच्या कुटुंबात दिसून येते.त्यांचे मोठे बंधू आपली रेल्वेची नोकरी सांभाळून आवर्जून गीत लेखन करायचे.त्यांच्या गीत लेखनातून सारंग पवार यांनी प्रेरणा घेऊन पुढे गीत लेखन केल्याचे आढळून येते. [ads id="ads2"]
तसं पाहिलं तर त्यांचं शिक्षण बारावी, आय टी आय झालेलं.गीत लेखनाच्या उपदव्यापात नोकरी शोधायचं राहून गेलं की काय असं एकीकडे वाटतं ; मात्र आंबेडकरी गीतांच्याच उर्जेतून सारंग पवार ठामपणे उभे राहिलेले दिसतात.
माझं त्यांच्याकडे अधून मधून जाणं येणं आहे.त्यामुळे प्रत्यक्ष भेटीत त्यांचेशी एकूणच आंबेडकरी गीतांच्या आशया, विषया बद्दल नेहमी चर्चा होत असते. अलीकडे गीत लेखनातून डॉ बाबासाहेब आंबडेकर,म. फुले, राजर्षी शाहू महाराज,छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांचा विचार तळागाळात पोहचविण्यासाठी काही प्रामाणिक गीतकार शर्थीचे प्रयत्न करीत असले, तरी काही हौशी गीतकारांच्या उतावीळ पणामुळे या प्रभावी माध्यमाला गालबोट देखील लागतांना दिसत आहे, अशी खंत सारंग पवार बोलून दाखवतात.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना त्या काळी या माध्यमाशिवाय अन्य कुठलंच माध्यम प्रभावी वाटत नव्हतं. राजानंद गडपायले यांच्या जलस्यांकडे ते नेहमी याच दृष्टीने पहायचे, किंबहूना त्यांच्या समकालीन असलेल्या गितकाराना आणि गायकांना प्रोत्साहन द्यायचे, काहींच्या कार्यक्रमाना ते स्वतः उपस्थित राहिल्याचीही उदाहरणे आहेत.
आंबेडकरी गितकारांनी आणि कलावतांनी नेहमीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला अभिवादन करतांना आपल्या शब्दांना कमालीची ताकद दिली आहे.त्याचं उत्तम उदाहरण म्हणून सारंग पवार यांच्या गीतांकडे पाहता येते:
आकाश मोजतो आम्ही...भीमा तुझ्या मुळे
वादळही रोखतो आम्ही...भीमा तुझ्या मुळे
बंदूक तोफ नको रे...अणुबॉम्बही नको रे...
शब्दाने मारतो आम्ही...भीमा तुझ्या मुळे...
एकूणच भारतीय समाज व्यवस्थेतील जात वास्तव कुणाला नाकारता येत नाही.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला संविधान बहाल करतांना सशक्त लोकशाहीचा मूलमंत्र देतांना काही मूलगामी गोष्टींकडे सर्वांचे लक्ष वेधले होते.आणि मतदानाचा हक्क बहाल करून तळागाळातील माणसाला राजा बनविले. सारंग पवार यांची लेखणी त्याची आठवण करून देतांना एका गीतातून प्रखर वास्तव रेखाटते :
आम्हीच मूलनिवासी,हा देश आहे माझा...
भांडून व्यवस्थेशी, केले तुला मी राजा...
वामन कर्डक हे खरं तर आंबेडकरी लोकगीतांचे भाष्यकार, त्यांच्याशिवाय आंबेडकरी गीतांचा इतिहास कुणालाही सांगता येत नाही.वामन कर्डक आणि प्रतापसिंग बोदडे यांचं नाव आणि गाणं माहीत नाही,असं गाव आणि माणूस महाराष्ट्रात तरी शोधून सापडत नाही, त्यामुळे सारंग पवार त्यांच्या कार्याचा आपल्या गीतातून आवर्जून उल्लेख करतांना म्हणतात :
शाहू, फुले,शिवाला वंदाया तव पथाला...
गुंफूनी गेली हार ते, वामनची लेखणी...
किंवा
काव्यरुपी त्या विद्यापीठाचे
मुक्ताई खरे गाव आहे...
प्रतापसिंग हे आंबेडकरांच्या
चळवळीचे खरे नाव आहे...
सारंग पवार यांची लेखणी आत्मशोध घेतांनाही दिसून येते.अलीकडे त्याची गीत परंपरेत वाणवा दिसून येते.पवार मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत नाहीत.राजकीय गलथानपणाकडे समाजाचे लक्ष वेधून घेतांना सर्वांना ते खडे बोल सुनावताना लिहितात :
दोषी नेतेच नाही,आम्ही आहे सगळे...
भीम काळजाचे वेचा पाडलेले तुकडे...
सारंग पवार यांची गाणी सुरेश वाडकर, उत्तरा केळकर,स्वप्नील बांदोडकर,अभिजित सावन्त या सारख्या पार्श्वगायकांनी गायली आहेत,ही एका आंबेडकरी गितकाराच्या दृष्टीने मोठी गोष्ट आहे. प्रल्हाद शिंदे,आंनद शिंदे यांनीही सारंग पवार यांच्या शब्दांना सूर लावले आहेत.मात्र अलीकडे राहुल अनविकर सारखा राष्ट्रीय प्रबोधनकार त्यांची गाणी गाऊन आंबेडकरी गीत परंपरेला एक नवीन आयाम देत आहे, ही आंबेडकरी चळवळीसाठी खूपच समाधानाची गोष्ट आहे.मला अभ्यासक म्हणून त्याचा विशेष आंनद वाटतो, त्यासाठी मी सारंग पवार आणि राहुल अनविकर या दोघांचाही ऋणी आहे...
शब्दांकन - दीपध्वज कोसोदे
९४२३९५४६४०


