बापाची 10 वर्षांच्‍या लेकादेखत आत्महत्या : जळगाव जिल्ह्यातील घटना

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 जळगाव तालुक्यातील ममुराबाद (Mamurabad, Jalgaon)  येथील वीटभट्टी व्यावसायिकाने त्याच्या १० वर्षीय मुलादेखत विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

सकाळपासून ते सायंपर्यंत विहिरीत शोध सुरू होता आणि चिमुरडा आपले वडील कधी पाण्यातून बाहेर येतात, म्हणून विहिरीत डोकावत राहिला.अखेर सायंकाळी पित्याचा मृतदेह बघताच चिमुरड्याने  रडायला सुरवात केली अन्‌ ग्रामस्थांचेही डोळे पाणावले. समाधान भास्कर कुंभार (वय ३८, रा. पटेल वाडा, ममुराबाद), असे मृताचे नाव आहे. [ads id="ads1"]

समाधान भास्कर कुंभार यांचा वीटभट्टीचा व्यवसाय आहे. गुरुवारी दिनांक १५ जून रोजी सकाळी साडेनऊला समाधान कुंभार विटांचे ट्रॅक्टर खाली करण्यासाठी जळगावात १० वर्षीय मुलगा वैभव याच्यासह आले तेथील काम आटोपल्यावर पिता-पुत्र गावाकडे परत निघाले. ममुराबाद येथे आल्यावर म्हाळसादेवी मंदिरजवळ समाधान कुंभार यांनी ट्रॅक्टर थांबविले. मुलाला ट्रॅक्टरवर बसवून समाधान यांनी जवळच्या विहिरीत उडी घेतली.[ads id="ads2"]

हा प्रकार समजल्यावर ग्रामस्थांसह तरुण मदतीला धावले. काहींनी जळगाव तालुका पोलिसांना (Jalgaon Taluka Police) घटना कळविली. पट्टीच्या पोहणाऱ्या तरुणांनी विहिरीत शोध सुरू केला. मात्र, समाधान यांचा ठाव ठिकाणा लागेना.

विहिरीची पाणी पातळी आणि गाळामुळे खोलवर जाऊनही काही उपयोग होईना. तब्बल सहा तासांनंतर गाळात अडकलेला मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेला.तेथे कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. मृत समाधान कुंभार यांच्या पश्चात पत्नी ज्योती, मुलगी राणी, मुलगा वैभव असा परिवार आहे. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

तो बघत राहिला वडिलांची वाट

वडिलांसोबत हिंडण्याचे कौतुक उराशी बाळगून सकाळी चिमुरडा वैभव वडील समाधान यांच्यासोबत विटाची खेप टाकण्यास जळगावला आला होता. मात्र, समाधान यांच्या डोक्यात काय सुरू आहे.

चिमुरडा वैभव याला कल्पना नसावी. गावात ट्रॅक्टर परतल्यावर पित्याने वैभवला 'तू इथंच थांब', असे म्हणत विहिरीच्या दिशेने धाव घेतली. वैभव डोळे लावून बघत असताना, अचानक वडिलांनी विहिरीत उडी घेतल्याने तोही विहिरीच्या दिशेने पळाला. त्याने हा प्रकार ग्रामस्थांना सांगितला. मदतीला गाव धावून आले. विहिरीतून मृतदेह निघेपर्यंत वैभव एकटक पित्याला बघण्यासाठी आसुसल्याचे पाहून अनेकांचा कंठ दाटून आला.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!