रावेर व यावल तालुक्यातील गारपिटीच्या नुकसानीची आमदार अमोल जावळे यांनी केली पाहणी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत नुकसानीचे पंचनामे व कार्यवाहीसाठी चर्चा

यावल /रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) 

रावेर विधानसभा क्षेत्रात दिनांक २७ डिसेंबर रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि भीषण गारपिटीमुळे केळी, हरभरा, गहू, तूर, पपई अशा विविध पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार अमोल जावळे यांनी जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि विभागीय अधिकाऱ्यांसोबत यावल तालुक्यातील भालोद, बामणोद, आमोदा, म्हैसवाडी, राजोरा, बोरावल आणि परिसरातील शेतशिवारांना भेट दिली.

पाहणी दरम्यान, आमदार अमोल जावळे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून नुकसानभरपाईसाठी पंचनामे व तत्सम कार्यवाही तात्काळ पूर्ण करण्यात यावी, अशी सूचना केली. गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाचा अहवाल तयार करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी, यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

याप्रसंगी यावल प्रभारी तहसीलदार संतोष विनंते, कृषी अधिकारी भरत वारे, विस्तार अधिकारी किशोर सपकाळे, बामणोद मंडळ अधिकारी बबीता चौधरी, अंजाळे मंडळ अधिकारी रशिद तडवी, भागातील तलाठी आणि शेतकरी बंधू उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील या पाहणीसाठी उपस्थित होते.

आमदार अमोल जावळे यांनी गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि प्रशासनाकडून तातडीने मदत मिळावी, यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे स्पष्ट केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!