यावल,जळगाव जिल्हा ( सुरेश पाटील )
राळेगणसिद्धी येथील आदरणीय अण्णा हजारे संस्थापक अध्यक्ष असलेल्या स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी या संस्थेकडून स्वामी विवेकानंद जयंती निमित्त महाराष्ट्र राज्यातील अहिल्यानगर तथा अहमदनगर,कोल्हापूर आणि बीड जिल्ह्यातील स्वच्छ व पारदर्शी सामाजिक सेवा /कार्य करणाऱ्या ४ जणांना पुरस्कार जाहीर करण्यात आले, हे पुरस्कार राळेगणसिद्धी येथे १५ जून २०२५ रोजी वितरित केले जाणार असल्याची माहिती मिळाली.
सन २०२४-२५ पुरस्कारांचे मानकरी १) डॉ.राजेद्र धामणे व सौ. डॉ.सुचेता धामणे,अध्यक्ष माऊली सेवा प्रतिष्ठान,अहमदनगर.
२)श्री. संतोष गर्जे,अध्यक्ष आई संस्था (बालग्राम परिवार),गेवराई, बीड. ३) श्री.किशोर देशपांडे, अध्यक्ष सावली केअर सेंटर, कोल्हापूर. ४)श्री. सचिन खेडकर, अध्यक्ष उचल फाऊंडेशन, शेवगाव, अहमदनगर.
(ads)
आदरणीय समाजसेवक अण्णा हजारे यांनी माहिती दिली की, आयुष्याच्या सुरूवातीला विचार करीत होतो की,प्रत्येक माणूस जन्माला येताना रिकाम्या हाताने येतो आणि जातानाही रिकाम्या हाताने जातो मात्र आयुष्यभर माझं माझं म्हणत जीवन जगत असतो. मात्र आयुष्याच्या शेवटी हाताशी काहीच येत नाही. मग तो जगतो कशासाठी? त्याच्या जगण्याचा उद्देश काय? अनेकांना प्रश्न विचारत गेलो. मात्र समाधानकारक उत्तर मिळत नाही म्हणून एक दिवस विचार आला आत्महत्या का करू नये? योगायोग असा की स्वामी विवेकानंदांचे बुक स्टॉलवर पुस्तकावरील चित्र आकर्षक वाटले. म्हणून मी स्वामी विवेकानंदांची पुस्तके वाचण्यास सुरवात केली. हळूहळू मानवी जीवनाचा अर्थ कळू लागला. महात्मा गांधीजींची पुस्तके वाचली.
मानव सेवा हीच खरी माधव सेवा आहे हे कळू लागले. माणसाने आपल्या जीवनात जे कर्म करायचे आहे ते निष्काम भावनेने कोणत्याही फळाची अपेक्षा न करता रंजले गांजलेल्या लोकांची सेवा ही ईश्वराची पुजा आहे हे कळत गेले आणी वयाच्या सतराव्या वर्षी भर तारूण्यात ठरवले की आपण निष्काम भावनेने जनतेची सेवा करायची ती करत असताना आपले गाव,समाज आणि देशाची सेवा हीच ईश्वराची पुजा आहे.पण उपाशीपोटी सेवा कशी होणार म्हणून जगण्यासाठी पोटाचा प्रश्न सुटणे आवश्यक आहे त्यासाठी मी देशसेवेसाठी सैन्यात गेलो. सैन्यात देशाची सेवा करीत राहिलो. १९६२ मध्ये चीन ने आपल्या देशावर आक्रमण केले आमचे मोठ्या प्रमाणावर जवान मारले गेले.देशाची फार मोठी हानी झाली. म्हणून १९६३ मध्ये देश सेवेसाठी मी सैन्यामध्ये गेलो.पुन्हा १९६५ मध्ये पाकिस्तानने आमच्या देशावर आक्रमण केले.आमच्या वर हवाई हमले झाले.माझे सहकारी शहिद झाले.माझ्या गाडीवर २५ / ३० गोळ्या लागल्या.फक्त कपाळावर गोळ्यांचे तुकडे उडून लागले. गाडीमध्ये २५ /३० गोळ्या लागूनही मी वाचलो.माझे सहकारी धारातिर्थी पडले.माझे शेजारी बसलेल्या दोन साथीदारा पैकी एकाचे दोन्ही पाय गेले व दुसऱ्याचे दोन्ही हात गेले मी हे दृष्य प्रत्यक्ष पाहत होतो.
(ads)
एवढ्या मोठ्या प्रमाणावर गोळ्या लागूनही आपण वाचलो ही ईश्वराची काही तरी इच्छा आहे. म्हणून आपण वाचलो.हा आपला पुनर्जन्म आहे.आता या नवीन जन्मामध्ये जीवन जगण्यासाठी पेन्शन मिळणाऱ असल्यामुळे आणि महात्मा गांधीजी म्हणत होते की, देश बदलायचा असेल तर आपले गाव बदलणे आवश्यक आहे. तुकडोजी महाराज म्हणतात गावावरून देशाची परीक्षा ।। गावची भंगता अवदशा ।। येईल देशा ।।
हाताला काम नाही पोटाला पुरेशे अन्न नाही यामुळे माझ्या गावाची परिस्थिती बिकट होती कारण दुष्काळी भाग असल्यामुळे पर्जन्यमान दरवर्षी २५० ते ३०० मिलीमिटर पाऊस पडतो म्हणूनच मी माझ्या गावात जलसंधारणाचे प्रयोग करावयाचे ठरविले.गावच्या लोकांनी साथ दिली कारण मी गावच्या विकासाठी जीवन द्यायचे ठरविले होते.गावात ३५ दारूच्या भट्ट्या होत्या पण आधी दारूभट्ट्यांचा विषय न घेता गावातील लोकांच्या गरजा, भाकरीचा प्रश्न,तसेच हाताला काम हे महत्वाचे होते. म्हणून भाकरीचा प्रश्न सोडविण्यासाठी पाऊसाचा थेंब ना थेंब अडविला,जिरविला पावसाच्या पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन केल्यामुळे पुर्वी गावात ३०० ते ४५० एकर जमिनीला पाणी मिळत होते ते आता १२०० ते १५०० एकर जमिनीला पाणी मिळू लागले.गावाची अर्थव्यवस्था बदल गेली.त्यामुळे ज्या गावात ३५ दारूच्या भट्ट्या होत्या त्या गावातील प्रत्येक दुकानदाराने ठरविले की आपल्या दुकानात तंबाखू, बीडी, सिगारेट आदी तस्सम पदार्थ विक्रीला ठेवायचे नाही. गाव सर्वांगीण व्यसनमुक्त झाले.
जसे जसे काम होत गेले तसे लोक बदलत गेले तसा ग्रामस्थांचा विश्वास वाढत गेला आणि आज गाव पाहण्यासाठी फक्त महाराष्ट्रातून नव्हे तर देशातील विविध राज्यातून आणि विदेशातून लोक येतात आणि प्रेरणा घेत असतात.आजपर्यंत काही लाख लोकांनी गावाला भेट दिली. शैक्षणिक बदल झाल्यामुळे नवीन पिढ्यांना एक नवीन दिशा मिळाली.शिक्षणामध्ये नापास मुलांची शाळा सुरु केली.संपूर्ण इतिहासावर एक मोठे पुस्तक तयार होऊ शकेल पण लोकांना कल्पना यावी यासाठी थोडक्यात माहिती दिली.समाजसेवा करीत असताना समाजकार्य पाहून देशातून व परदेशातून मला अनेक पुरस्कार मिळाले.त्यानंतर मिळालेल्या पुरस्काराचे मानधन स्वतःसाठी न ठेवता स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी असा न्यास सन १९९८ मध्ये स्थापन केला.व ते मानधन संस्थेच्या खात्यात जमा केले.अश्या पुरस्कारांची एकूण रक्कम-१,६७,००००० रुपये ( एक कोटी सदुसष्ट लाख ) कायम ठेवून त्यावर मिळणाऱ्या व्याजातून संस्थेने आजपर्यंत सामुदायिक विवाह,आरोग्य शिबीरे, क्रीडा स्पर्धा, रक्तदान शिबीरे,शाळांना मदती,वाचनालये अशा विविध कार्यक्रमावर खर्च करण्यात आलेला आहे.
त्यानंतर मी असा विचार केला की, ही रक्कम समाजाकडून मिळालेली आहे तर मग ही रक्कम समाजालाच परत करायची की,जी व्यक्ती,संस्था समाजसेवेचे काम निष्काम कर्म म्हणून करतात अशा व्यक्तीला / संस्थेला उत्तेजनार्थ पुरस्कार म्हणून द्यावयाची आहे. ते पुरस्कार स्वामी विवेकानंद जयंती च्या दिवशी म्हणजे दि.१२ जानेवारी ह्या दिवशी प्रत्येक वर्षी घोषित करून त्या पुरस्काराचे वितरण समारंभ १५ जून रोजी करावयाचे आहे.ज्या व्यक्तीला / संस्थेला पुरस्कार दिला जाईल तो अण्णा हजारे सामाजिक सेवा गौरव पुरस्कार या नावाने दिला जाईल.या साठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर फिरून भामरागड,वरोरा,पाबळ, कोल्हापूर,अहमदनगर,बीड, जळगाव,अमरावती या सारख्या अनेक ठिकाणी भेटी देण्यात आल्या.
सन २०२४- २५ सालचा पुरस्कार संस्थेच्या निवड समितीने वरील मान्यवरांना त्यांच्या विधायक कार्यासाठी स्वामी विवेकानंद जयंती दि.१२ जानेवारी २०२५ रोजी जाहीर करताना आनंद होत आहे.पुरस्कार समारंभ दि. १५ जून २०२५ रोजी राळेगणसिद्धी येथे करण्यात येत आहे.
पुढील वर्षापासून समाजासाठी, देशासाठी समर्पित जीवन जगणाऱ्या देशभरातील व्यक्तींचा शोध घेऊन अशा व्यक्ती व संस्थाना पुरस्कार देण्यात येईल अशी माहिती सुद्धा स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी या संस्थेकडून म्हणजे आदरणीय अण्णा हजारे यांच्याकडून मिळाली आहे.



