जयसिंगपूर, ता. शिरोळ (प्रतिनिधी) –
जयसिंगपूर येथील कवितासागर प्रकाशनाचे ज्येष्ठ लेखक व उर्दू विद्यामंदिर, घोसरवाड (तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र) येथील विषय शिक्षक मुहम्मदआसिफ खलील मुजावर यांची शिक्षण विभाग जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्या मार्फत दिल्या जाणार्या डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी जिल्हा समितीमार्फत निवड झाली आहे. लवकरच त्यांना हा अत्यंत प्रतिष्टेचा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असून जिल्ह्यात त्यांच्या कार्याची सर्वत्र चर्चा आहे. (ads)
जिल्ह्यातील व तालुक्यातील शिक्षकांकडून प्राप्त स्वयंमूल्यमापन अहवालाच्या आधारे बीटस्तर, तालुकास्तर व बाह्य मूल्यमापन समितीमार्फत काटेकोर तपासणी करण्यात आली. जिल्हा निवड समितीने घेतलेल्या मुलाखतीनंतर मुजावर सरांची आदर्श शिक्षक म्हणून अंतिम निवड झाली.
मुहम्मदआसिफ खलील मुजावर हे उर्दू, गणित व सर्वांगीण शिक्षण विकास या विषयांचे विषय शिक्षक असून गेली अनेक वर्षे ते विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व भावनिक उत्कर्षासाठी समर्पितपणे कार्यरत आहेत. त्यांनी तालुका शिक्षक पुरस्कार (2021), जिल्हास्तरीय नाट्यीकरण स्पर्धांतील सलग यश, विज्ञान प्रदर्शन (2022-23) तृतीय क्रमांक, हॅकेथॉन स्पर्धा (2024-25) तृतीय क्रमांक अशी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तसेच प्रज्ञाशोध व शिष्यवृत्ती परीक्षांसाठी दिलेल्या मार्गदर्शनाचा लाभ अनेक विद्यार्थ्यांना झाला आहे.(ads)
शैक्षणिक कार्यासोबतच मुजावर सर हे एक सर्जनशील लेखक म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी उर्दू व मराठी भाषेत Magic of Maths / गणिताची जादू, Roshan Zehn / उजळलेला मेंदू, Shabadsanwad / शब्दसंवाद, भाषणसंग्रह मराठी, भाषणसंग्रह उर्दू अशी पुस्तके प्रकाशित केली आहेत. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व भाषिक विकासासाठी ही पुस्तके उपयुक्त ठरत आहेत.(ads)
मुहम्मदआसिफ खलील मुजावर यांच्या सन्मानाबद्दल ग्रेस चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष राज धुदाट, कवितासागर इंटरनॅशनल मीडिया ग्रुपचे प्रमुख डॉ. सुनील दादा पाटील, लेखिका सौ. रोजमेरी राज धुदाट, तसेच लेजिटीमेट प्रिंट-ऑन-डिमांड डिजिटल पब्लिशिंग हाउसच्या संचालिका संजीवनी बळवंत भिंगारे यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
मुहम्मदआसिफ खलील मुजावर यांच्या कार्यामुळे शिरोळ तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचा गौरव वाढला असल्याचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.



