रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : एका केळी उत्पादक शेतकऱ्याकडे सुमारे २० हजार रूपये लाचेची मागणी केल्याच्या आरोपावरून थेट एका पोलिसावर रावेर तालुक्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
(ads)
पोलीस हवालदार सुरेश पवार, असे केळी उत्पादक शेतकऱ्याकडे सुमारे २० हजार रूपयांच्या लाचेची मागणी केल्याच्या आरोपावरून रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांच्या फिर्यादीवरून पवार यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम सात प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार शेतकऱ्याने सुमारे एक लाख २७ हजार रूपये किमतीची केळी दिल्ली येथील व्यापाऱ्याला विकली होती. मात्र, व्यापारी शेतकऱ्याला केळीचे पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. त्यामुळे शेतकऱ्याने निंभोरा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.
(ads)
तक्रारीच्या अनुषंगाने तक्रारदार शेतकऱ्याला त्यांनी केलेल्या अर्जाची चौकशी करण्यासाठी निंभोरा पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. परंतु, त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेले हवलदार सुरेश पवार यांनी शेतकऱ्याकडे तक्रार अर्जात नमूद केलेल्या एकूण रकमेच्या १० टक्के प्रमाणे रक्कम लाच स्वरूपात मागितली. तक्रारदार शेतकऱ्याची लाच देण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी थेट जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत 7 ऑक्टोबर रोजी पोलिसाच्या विरोधात लेखी तक्रार केली. प्रत्यक्षात, पंचांसमक्ष पडताळणी केल्यावर हवालदार पवार यांनी केळी व्यापाऱ्याच्या विरोधात दिलेल्या अर्जाच्या चौकशी कामी योग्य ती मदत करण्यासाठी निंभोरा पोलीस ठाण्याच्या प्रभारींना २० हजार रूपये द्यावे लागतील, असे सांगून लाचेची मागणी केली.
(ads)
हवलदार पवार यांनी मागणी केल्याप्रमाणे तक्रारदार शेतकऱ्याकडून २० हजार रूपयांची लाच प्रत्यक्ष स्वीकारली नसली, तरी त्यांनी लाचेची मागणी केल्याचे सिद्ध झाल्याने त्यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला. सदरची कारवाई पर्यवेक्षण अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, सापळा पथकातील सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, हवालदार किशोर महाजन, संगिता पवार, राकेश दुसाने, अमोल सुर्यवंशी, भूषण पाटील यांनी यशस्वी केली. तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक ठाकूर पुढील तपास करीत आहेत.


