रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर शहर स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी ठेवण्यासाठी अहोरात्र परिश्रम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रावेर नगरपालिकेच्या वतीने ड्रेस वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात नगराध्यक्षा, नासरसेविका, नगरसेवक तसेच शहरातील मान्यवर व प्रतिष्ठित नागरिकांच्या शुभहस्ते सफाई कर्मचाऱ्यांना नवीन गणवेश वितरित करण्यात आले.
(ads)
शहराच्या स्वच्छतेची खरी धुरा सांभाळणारे सफाई कर्मचारी हे नगरपालिकेचे खरे शिलेदार आहेत. पावसाची, उन्हाची किंवा थंडीची पर्वा न करता ते रोज रस्ते, गल्ल्या व सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्यासाठी निष्ठेने कार्य करतात. त्यांच्या या सेवाभावाला सलाम करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
(ads)
या वेळी नगराध्यक्षा व उपस्थित मान्यवरांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक करत, “स्वच्छ शहर हीच खरी प्रगतीची ओळख आहे आणि ती स्वच्छता राखण्याचे काम आमचे सफाई कर्मचारी प्रामाणिकपणे करत आहेत,” असे गौरवोद्गार काढले. नवीन ड्रेसमुळे कर्मचाऱ्यांमध्ये कामाविषयी अधिक आत्मसन्मान, उत्साह व ऊर्जा निर्माण होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
(ads)
या उपक्रमामुळे सफाई कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे व आनंदाचे भाव दिसून आले. रावेर शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नगरपालिकेसोबतच शहरातील नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले.



