रावेर (राहुल डी गाढे) : रावेर तालुक्यात आज सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास अचानक वादळी पावसाने जोरदार तडाखा दिला.या वादळी पावसाने केळी,गहू हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.विश्राम जिन्सी परिसरात गारपीट झाली आहे.तर वादळामुळे रावेर-बऱ्हाणपूर रस्त्यावर चिंचेचे मोठे झाड पडल्याने वाहतूक खंडीत झाली आहे.वादळामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील काही घरांवरील पत्रे उडाल्याचे वृत्त आहे.काही काळ रावेर शहरातील व ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडीत झाला होता.तहसीलदार संजय तायडे परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नुकसानीची माहिती घेत आहेत.
(ads)
आज सकाळपासूनच दिवसभर ढगाळ वातावरण होते.सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास अचानक वादळी वारा सुटला व लगेचच जोरदार पावसाला सुरुवात झाली.अवघ्या काही मिनिटात पाणी वाहून निघाले.या अवकाळी वादळी पावसामुळे कापणीला आलेल्या केळी बागा मोडून पडल्या असून,गहू व हरबरा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.पिकांच्या नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता शेतकरी वर्गातून वर्तवण्यात येत आहे.
(ads)
घरांवरील पत्रेही उडाली
वादळी वाऱ्याचा तडाखा ग्रामीण भागाला जोरदार बसला आहे.रावेर तालुक्यातील केऱ्हाळा खुर्द,केऱ्हाळा बुद्रुक,जुनोने,पिंप्री,मंगरूळ,अभोडा,जिन्सी,मोहगण,पाल परिसरासह अनेक गावांच्या शेती शिवरातील केळी,गहू हरबरा मका या पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.तसेच अनेक गावात घरांवरील पत्रे उडाल्याची माहिती मिळाली आहे.रावेर बऱ्हाणपूर रस्त्यावर चिंचेचे मोठे झाड पडल्याने या रस्त्यावरील वाहतूक खंडीत झाली असून पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल या ठिकाणी थांबून झाड बाजूला करण्याचे प्रयत्न करीत आहे.
(ads)
तातडीने पंचनामे करा : आमदार जावळे यांच्या सूचना
अवकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने रावेर तालुक्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांकडून प्राप्त झाली आहे.सर्व पिकांच्या नुकसानीचे उद्या पंचनामे करून त्याचा अहवाल वरिष्ठाना पाठविण्याच्या सूचना आमदार अमोल जावळे यांनी तहसीलदार संजय तायडे यांना दिल्या आहेत.



