नकली एअरपोर्ट्स की उघड्या आकाशाखालील मृत्यूचे सापळे : वरिष्ठ पत्रकार रतनकुमार साळवे यांचा सणसणीत लेख

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


खरंतर बारामतीचं ते ठिकाण एअरपोर्टच नव्हतं. ती होती केवळ एक धावपट्टी, कदाचित मोठा हायवे! आणि ही बाब केवळ बारामतीपुरती मर्यादित नाही. आज देशभरात अशा असंख्य तथाकथित “एअरपोर्ट्स” उभे आहेत, जे नावाला विमानतळ आणि प्रत्यक्षात धोक्याचे खुले मैदान आहेत. काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानासंदर्भात घडलेल्या अपघाताने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला आहे. पण प्रश्न असा आहे की, आपण यावर गंभीरपणे बोलणार आहोत की नेहमीप्रमाणे काही दिवस चर्चा करून विसरणार?

(ads)

लाईट नाहीत, तांत्रिक यंत्रणा नाहीत, सुरक्षा व्यवस्था नाही, सीसीटीव्ही नाहीत, ॲम्ब्युलन्स नाही, अग्निशमन दल नाही, म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असलेली एकही मूलभूत सुविधा उपलब्ध नाही. अशा ठिकाणी विमान उतरवण्याची परवानगी दिली जाते, हेच मुळात धक्कादायक आहे. हा निष्काळजीपणा नाही, ही थेट गुन्हेगारी बेफिकिरी आहे.

(ads)

सामान्य माणसाला वाटतं की पायलट डोळ्यांनी पाहून विमान उतरवत असतील. पण विमान उड्डाण हे डोळ्यांवर नव्हे, तर तंत्रज्ञानावर चालतं. सुरक्षित टेकऑफ आणि लँडिंगसाठी धावपट्टी पायलटला १५ ते २० किलोमीटर अंतरावरून “दिसते”पण ती दिसते डोळ्यांनी नाही, तर अत्याधुनिक यंत्रणांमुळे. इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टिम (ILS), रनवे लाईटिंग, रेडिओ नेव्हिगेशन, एअर ट्रॅफिक कंट्रोल, हवामानाची अचूक माहिती देणारी साधनं, या सगळ्या गोष्टी एकत्र असल्या तरच विमान सुरक्षितपणे जमिनीवर उतरू शकतं.

(ads)

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) विमानतळासारख्या अधिकृत विमानतळांवर दिशा, अंतर, उंची सांगणारी यंत्रणा २४ तास कार्यरत असते. विमान नेमकं कोणत्या दिशेला आहे, किती अंतरावर आहे, कोणत्या रनवेवर उतरायचं आहे, याची क्षणोक्षणी माहिती पायलटला मिळत असते. याच यंत्रणा अपघात आणि सुरक्षित लँडिंग यांच्यातील फरक ठरवतात. मग हा प्रश्न अपरिहार्यपणे उभा राहतो, ही यंत्रणा नसलेल्या ठिकाणी विमान उतरवण्याचा निर्णय नेमका कोण घेतो?

(ads)

उत्तर एकच आहे, राजकीय दडपण, दिखाऊ विकास आणि नियमांना हरताळ

निवडणुकीच्या तोंडावर फित कापण्यासाठी, श्रेय घेण्यासाठी, “आम्ही विमानतळ आणला” असं सांगण्यासाठी काही ठिकाणी केवळ धावपट्टी तयार केली जाते आणि तिलाच एअरपोर्टचा दर्जा दिला जातो. नागरी विमान वाहतूक ही राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित बाब आहे, पण इथे ती राजकीय प्रतिष्ठेची खेळी बनवली जाते.

(ads)

आज जर एका उपमुख्यमंत्र्यांच्या विमानासंदर्भात अशी घटना घडू शकते, तर उद्या सामान्य प्रवाशांच्या बाबतीत काय होणार? हा प्रश्न कोणत्याही पक्षाचा नाही, कोणत्याही व्यक्तीचा नाही, तो मानवी जीवांचा आहे. “आज वाचलो” या मानसिकतेतून बाहेर येऊन “उद्या कोण वाचणार?” हा प्रश्न विचारण्याची हीच वेळ आहे.देशातील सर्व प्रकारच्या अपूर्ण, मानकविरहित आणि नकली धावपट्टी असलेल्या तथाकथित एअरपोर्ट्सची तात्काळ तपासणी झाली पाहिजे.

(ads)

नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA), विमानतळ प्राधिकरण (AAI) आणि संबंधित मंत्रालयाने संयुक्त ऑडिट करावे.ज्या ठिकाणी रनवे लाईटिंग, ILS, एअर ट्रॅफिक कंट्रोल, अग्निशमन आणि वैद्यकीय सुविधा नाहीत, तिथे विमानसेवा तत्काळ बंद केली पाहिजे.

(ads)

नियम मोडून परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि राजकीय हस्तक्षेप करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल झाले पाहिजेत. प्रत्येक अपघातानंतर चौकशी समित्या नेमल्या जातात, अहवाल सादर होतात, आणि काही दिवसांत सगळं विसरलं जातं,हीच आपल्या व्यवस्थेची शोकांतिका आहे. पण प्रत्येक अपघात हा इशारा असतो. तो दुर्लक्षित केला तर पुढचा अपघात केवळ वेळेचा प्रश्न ठरतो.

(ads)

आज अजितदादा पवार यांच्या विमानाच्या घटनेमुळे हा विषय चर्चेत आला आहे. पण ही चर्चा केवळ व्यक्तीभोवती फिरून थांबू नये. मुद्दा व्यक्तीचा नाही, मुद्दा व्यवस्थेचा आहे. विकासाच्या नावाखाली नकली एअरपोर्ट्स उभे करून मानवी जीव धोक्यात घालणं हे प्रगतीचं लक्षण नाही, तर प्रशासकीय अपयशाचं आणि राजकीय बेजबाबदारपणाचं प्रतीक आहे.

(ads)

विमान आकाशात उडतं, पण त्याची सुरक्षितता जमिनीवर असलेल्या व्यवस्थेवर अवलंबून असते. ही व्यवस्था कमकुवत असेल, तर आकाश कितीही स्वच्छ असलं तरी अपघात अटळ असतो. म्हणूनच आजचा स्पष्ट निष्कर्ष असा की,नियम पूर्ण करा, तंत्रज्ञान उपलब्ध करा; अन्यथा अशा नकली एअरपोर्ट्सना कायमचं बंद करा.

कारण खरा विकास फित कापण्यात नाही, तर एकाही जीवाला धोका न लावण्यात आहे.

रतनकुमार साळवे 

संपादक, दैनिक, "निळे प्रतीक"

छत्रपती संभाजीनगर 

9923502320

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!