ऐनपूर : येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय, ऐनपूर मधील गरीब, हुशार आणि होतकरू अशा १२ विद्यार्थ्यांना सन २०२५–२६ या शैक्षणिक वर्षासाठी विविध नामांकित संस्थांकडून शिष्यवृत्ती प्राप्त झाल्या आहेत. या सर्व शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना त्यांची आर्थिक परिस्थिती व गुणवत्तेच्या आधारावर मिळाल्या आहेत. या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
(ads)
विशेष बाब म्हणजे एचडीएफसी बँक तर्फे देण्यात येणारी ‘परिवर्तन शिष्यवृत्ती’ देशभरातील केवळ ५३५ विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आली असून, त्यामध्ये महाविद्यालयाची एम.एससी. प्रथम वर्षाची विद्यार्थिनी कोळी निकिता समाधान हिची निवड झाली आहे.
तसेच भारतीय जीवन बीमा निगम (एलआयसी) कडून देशभरातून मोजक्याच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. महाविद्यालयातील गुरव दीपाशा सखाराम (एम.एससी. प्रथम वर्ष), चौधरी खुशी जीवन (तृतीय वर्ष विज्ञान), भील वैष्णवी संजय (द्वितीय वर्ष कला), पटेल नमीरा शरीफ (प्रथम वर्ष विज्ञान) आणि सूर्यवंशी ममता लक्ष्मण (प्रथम वर्ष विज्ञान) या पाच विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळाली आहे. या शिष्यवृत्तीचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थी शिक्षण घेत असताना दरवर्षी ₹२०,००० इतकी आर्थिक मदत सातत्याने मिळणार आहे.
(ads)
याशिवाय एस-डी सीड फाउंडेशन, जळगाव मार्फत देण्यात येणाऱ्या ‘मातोश्री प्रेमाबाई जैन उच्च शिक्षण शिष्यवृत्ती’साठी महाविद्यालयातील सहा विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यामध्ये पाटील सचिन कडू (तृतीय वर्ष विज्ञान), बारबन गायत्री शरद (द्वितीय वर्ष विज्ञान), पाटील नेहा राजेंद्र, पटेल नमीरा शरीफ, पाटील दीक्षा समाधान आणि पाटील सुपडू (प्रथम वर्ष विज्ञान) यांचा समावेश आहे. ही शिष्यवृत्तीही विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण होईपर्यंत मिळणार आहे.
(ads)
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.बी.अंजने यांच्या निर्देशनाखाली प्रा.प्रदीप एन.तायडे यांनी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरण्यापासून ते शिष्यवृत्तीसाठी निवड होईपर्यंत सखोल मार्गदर्शन केले. दरवर्षी नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला महाविद्यालयातील प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांना सरकारी व विविध खाजगी संस्थांकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तींबाबत माहिती दिली जाते. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक आर्थिक मदत मिळून त्यांना उच्च शिक्षण पूर्ण करण्यास मोठा हातभार लागत आहे.



