निवडणूक कामात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी बीएलओंविरुद्ध जळगावात गुन्हे दाखल

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


मतदार यादी दुरुस्तीच्या अत्यंत महत्त्वाच्या कामात सातत्याने दिरंगाई व निष्काळजीपणा केल्याप्रकरणी जळगाव शहरातील सात बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) विरुद्ध अखेर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वारंवार सूचना देऊनही कामात अपेक्षित प्रगती न झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांवर थेट कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आला आहे

(ads)

गुन्हे दाखल होण्याचे काय आहे कारण ?


प्रशासनाकडून कामात हयगय करणाऱ्या बीएलओंना वेळोवेळी सूचना देण्यात आल्या होत्या. १९ सप्टेंबर, ४ ऑक्टोबर, ३१ डिसेंबर २०२५ तसेच १६ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या निवडणूक संदर्भातील बैठकीतही कामाच्या गतीबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. याशिवाय अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपवरून वारंवार संदेश पाठवून कामाची आठवण करून देण्यात आली होती. तरीही संबंधितांनी त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी ५ आणि १७ मार्च रोजी विशेष आढावा बैठक घेतली. या बैठकीत कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले. निवडणूक काम हे अत्यंत जबाबदारीचे असून यात कोणतीही ढिलाई सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला होता

(ads)

तहसीलदार शीतल राजपूत यांच्या सूचनेवरून निवडणूक नायब तहसीलदार नवीनचंद्र भावसार यांनी शहर पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवत पुढील तपास सुरू केला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये महानगरपालिकेचे लिपीक विकास सावळे, संजय रामदास सपकाळे, अलहिला स्कूलचे शिक्षक तौसिफ शेख गणी, अंगणवाडी सेविका विमल सुपडू भारसके, रावसाहेब राऊत विद्यालयाचे शिक्षक रवींद्र अशोक कोळी, मिल्लत स्कूलचे शिक्षक आरीफ खान इस्माईल खान तसेच बालविश्व विद्यालयाचे शिक्षक राहुल सुरेश धनगर यांचा समावेश आहे. 

(ads)

या कारवाईमुळे निवडणूक यंत्रणेत मोठी खळबळ उडाली असून, इतर बीएलओंमध्येही सावधगिरीचे वातावरण निर्माण झाले आहे. मतदार यादी अद्ययावत आणि त्रुटीरहित ठेवणे ही लोकशाही प्रक्रियेची पायाभूत गरज आहे. त्यामुळे या कामात कसूर करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!