चिनावल ता. रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) :
रावेर तालुक्यातील चिनावल येथील लिंगायत समाजाची अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली स्मशानभूमीची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. ज्योती संजय भालेराव यांच्या विशेष पुढाकाराने आणि कार्यतत्परतेमुळे स्मशानभूमीसाठी स्वतंत्र जागा मंजूर करण्यात आली असून, नुकतीच भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी पूर्ण करून सातबाराचा उतारा समाजाच्या सुपूर्द करण्यात आला आहे.
(ads)
चिनावल गावात लिंगायत समाज मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे. मात्र, हक्काची स्मशानभूमी नसल्यामुळे अंत्यविधीसाठी समाजाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मागील अनेक वर्षांपासून या मागणीसाठी पाठपुरावा करण्यात आला होता, मात्र तो यशस्वी होऊ शकला नव्हता. सौ. ज्योती भालेराव यांनी सरपंचपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लिंगायत समाजाने पुन्हा ही मागणी केली.
(ads)
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सरपंच सौ.ज्योती भालेराव यांनी कोणताही विलंब न लावता मासिक सभेमध्ये हा विषय मांडून मंजूर करून घेतला. त्यानंतर ग्रामसभेतही याला सर्वानुमते मंजुरी मिळवून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. नुकतीच भूमी अभिलेख विभागामार्फत या जागेची अधिकृत मोजणी करण्यात आली. याकामी ग्रामपंचायत अधिकारी श्री. दिपक बंडू कोळी व ग्रामपंचायत प्रशासनाचे मोलाचे सहकार्य लाभले.
(ads)
या ऐतिहासिक निर्णयाचे समाजातील प्रतिष्ठित नागरिक श्री. धनंजय श्रीखंडे, श्री. प्रकाश श्रीखंडे आणि श्री. किशोर आंबेकर यांच्यासह संपूर्ण लिंगायत समाजाने स्वागत केले असून सरपंचांचे आभार मानले आहेत.
प्रतिक्रिया:
"लिंगायत समाजाची स्मशानभूमीची मागणी ही अतिशय रास्त आणि मानवी दृष्टिकोनातून महत्त्वाची होती. मागील अनेक वर्षांपासून हा समाज या मूलभूत हक्कापासून वंचित होता. सरपंच म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर, कोणत्याही समाजाच्या श्रद्धेचा आणि भावनेचा सन्मान करणे हे माझे कर्तव्यच होते. त्यामुळेच प्रशासकीय पातळीवर कोणताही विलंब न लावता ही जागा मंजूर करून सातबारा उतारा सुपूर्द केला आहे. गावातील सर्व घटकांचे प्रश्न सोडवणे हीच माझी प्राथमिकता आहे."
- सौ. ज्योती संजय भालेराव, लोकनियुक्त सरपंच, चिनावल


